आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एम्स नागपूरने जागरूकता आणि शैक्षणिक उपक्रमांच्या मालिकेद्वारे 'जागतिक मूत्रपिंड दिन' केला साजरा


लोकजागरूकता आणि लवकर निदान हे मूत्रपिंडाच्या आजाराला तोंड देण्यासाठी महत्त्वाचे घटक, जागतिक किडनी दिनानिमित्त एम्स नागपूर येथे तज्ञांनी दिला सल्ला 

Posted On: 13 MAR 2026 3:34PM by PIB Mumbai

 

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था  (एम्स) नागपूर येथील मूत्रपिंड विषयक आजार विभागाने मूत्रपिंडाच्या आरोग्याला प्रोत्साहन देण्यासाठी साजऱ्या केल्या जाणाऱ्या जागतिक मूत्रपिंड दिनाचा भाग म्हणून 10 मार्च 2026 रोजी जागरूकता आणि शैक्षणिक उपक्रमांची मालिका आयोजित केली. सकाळच्या सत्रात एम्स नागपूरचे कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. डॉ. प्रशांत पी. जोशी प्रमुख पाहुणे म्हणून तर, एम्स नवी दिल्लीच्या नेफ्रोलॉजी विभागाचे प्राध्यापक आणि प्रमुख प्रा. डॉ. दीपांकर भौमिक सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.

डॉ. जोशी यांनी आपल्या मार्गदर्शनात मूत्रपिंडाच्या आजाराच्या वाढत्या प्रमाणावर प्रकाश टाकताना जनजागृती आणि लवकर निदानाचे महत्त्व अधोरेखित केले. मूत्रपिंडाच्या आजाराचे निदान बहुतेकदा आजार बळावल्यावर होते, जे फक्त "हिमखंडाचे टोक" आहे, असे मत डॉ. भौमिक यांनी व्यक्त केले. समाजात मोठ्या प्रमाणात रुग्ण विनानिदान राहतात, याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. मूत्रपिंडाच्या आजाराची प्रारंभिक लक्षणे आणि वेळेवर तपासणीचे महत्त्व याबाबत त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. 

दुपारच्या सत्रात कार्डिओ-किडनी-मेटाबॉलिक (सीकेएम) सिंड्रोम या विषयावर एक पॅनेल चर्चा झाली, ज्याचे सूत्रसंचालन डॉ. आनंद चेल्लाप्पन यांनी केले. चर्चेच्या सुरुवातीला प्रा. प्रशांत पी. जोशी यांनी भारतातील जीवनशैलीशी संबंधित विकारांच्या विशेषतः मधुमेह आणि लठ्ठपणा यांच्या वेगाने वाढणाऱ्या प्रमाणाकडे लक्ष वेधले. त्यांनी या आजारांसदर्भात प्रतिबंधात्मक धोरणांची तातडीची गरज अधोरेखित केली.

पॅनेलमधील तज्ज्ञांनी असेही नमूद केले की अलीकडील राष्ट्रीय आकडेवारीनुसार अनेक भारतीयांमध्ये शरीराचा वजन आणि उंचीशी संबंधित निर्देशांक (BMI) सामान्य असतानाही मेटाबॉलिक धोका जास्त असतो. या स्थितीला “थिन–फॅट पॅराडॉक्स” असे म्हटले जाते, ज्यामध्ये व्यक्ती दिसायला सडपातळ असली तरी शरीरात अंतर्गत चरबी जास्त असते आणि त्यामुळे मेटाबॉलिक आजारांचा धोका वाढतो.

तज्ज्ञांनी हृदय आणि मूत्रपिंडाचे आरोग्य जपण्यासाठी मेटाबॉलिक जोखमीचे घटक लवकर ओळखणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. त्यांनी सीकेएम सिंड्रोमच्या व्यवस्थापनासाठी वैद्यकीय तज्ज्ञ, मूत्रपिंड आजार विषयक तज्ञ,हृदयरोग तज्ञ आणि एंडोक्रायनोलॉजिस्ट यांच्या समन्वयाने बहुविभागीय दृष्टिकोन आवश्यक असल्याचेही स्पष्ट केले.

चर्चेच्या शेवटी संतुलित आहार, कॅलरीयुक्त अन्नाऐवजी पौष्टिक अन्नाची निवड, नियमित शारीरिक व्यायाम आणि दीर्घकालीन जीवनशैलीतील सकारात्मक बदल यांसह योग्य वैद्यकीय उपचारांच्या माध्यमातून प्रतिबंधात्मक उपायांवर विशेष भर देण्यात आला.

***

निलिमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2239730) अभ्यागत कक्ष : 75
Read this releasein: English