युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या ऑलिंपिक पदकांच्या संख्येत वाढ करण्यासाठी अस्मिता लीग ही उत्प्रेरक शक्ती - रक्षा खडसे


देशभरात 250 ठिकाणी धावण्याच्या शर्यतींच्या तीन प्रकारांमध्ये अस्मिता अ‍ॅथलेटिक्स लीगचे आयोजन

छत्रपती संभाजीनगर येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणात आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा

प्रविष्टि तिथि: 08 MAR 2026 2:10PM by PIB Mumbai

 

उन्हाळी ऑलिंपिक खेळ आणि इतर बहुआयामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताची पदक संख्या वाढवायची असेल तर क्रीडा क्षेत्रात महिलांच्या सहभागात मोठ्या प्रमाणात वाढ होणे अत्यावश्यक आहे, असे केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा निखिल खडसे यांनी सांगितले आहे.

 

 अस्मिता (Achieving Sports Milestone by Inspiring Women Through Action) कार्यक्रमांतर्गत देशभरातील 250 ठिकाणी आयोजित राष्ट्रव्यापी अ‍ॅथलेटिक्स लीगच्या उद्घाटन कार्यक्रमात खडसे बोलत होत्या. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम छत्रपती संभाजीनगरमधील गारखेडा येथील विभागीय क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आला होता.

केंद्रीय राज्यमंत्र्यांनी अस्मिता उपक्रमांतर्गत योग, वुशु, किकबॉक्सिंग आणि भारोत्तोलन लीगचे उद्घाटनही केले. याशिवाय, त्यांनी भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे (एसएआय) छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र (एनसीपी) यांनी माय-भारत, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आणि महाराष्ट्र राज्य क्रीडा विभाग यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या सायक्लोथॉन आणि वॉकेथॉनला हिरवा झेंडा दाखवला. तंदुरुस्ती, क्रीडा सहभाग आणि महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

 

 आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताच्या पदकांची संख्या वाढवण्यासाठी अस्मिता ही उत्प्रेरक आहे असे सांगून खडसे म्हणाल्या:

 “आंतरराष्ट्रीय महिला दिन आपल्याला आठवण करून देतो की महिलांचे हक्क, प्रतिष्ठा आणि समान संधी ही केवळ सामाजिक गरज नाही तर राष्ट्र उभारणीचा पाया आहे. महिलांना संधी दिली तरच संपूर्ण समाज सक्षम होतो. हाच उद्देश लक्षात घेऊन 2021 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अस्मिता उपक्रम सुरू केला.”

“अस्मिता आपल्याला ग्रामीण, आदिवासी आणि शालेय स्तरावरील तसेच तळागाळातील प्रतिभा ओळखण्यास मदत करत आहे. जेव्हा सहभाग वाढतो तेव्हा प्रतिभा समूहाचा विस्तार होतो, स्पर्धात्मकता वाढते आणि अखेर पदकांची संख्या देखील वाढते. जर अधिकाधिक महिला खेळात सहभागी झाल्या तर प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपली कामगिरी निश्चितच सुधारेल. त्या अर्थाने, अस्मिता हा उपक्रम ऑलिंपिकसारख्या स्पर्धांमध्ये भारताच्या पदकांच्या शक्यता वाढवण्यासाठी उत्प्रेरक म्हणून काम करते,” असेही त्या म्हणाल्या.

 

आतापर्यंत, अस्मिता लीगमध्ये 33 क्रीडा प्रकारांमध्ये सुमारे 3 लाख महिलांचा सहभाग दिसून आला असून 2,600 लीगचे आयोजन करण्यात आले आहे. 2025-26 च्या हंगामात, सुमारे 1.59 लाख महिलांनी 1,287 लीगमध्ये भाग घेतला आहे.

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित अस्मिता अ‍ॅथलेटिक्स लीगमध्ये मुलींसाठी 100 मीटर, 200 मीटर आणि 4000 मीटर धावस्पर्धा तीन वयोगटात घेण्यात आली : 13 वर्षांखालील, 13-18 वर्ष आणि 18 वर्षांखालील. देशभरातील 250 ठिकाणी आयोजित केलेल्या या एकदिवसीय स्पर्धेत जवळपास 2 लाख मुलींनी भाग घेतला.

हा कार्यक्रम माय भारत, खेलो इंडिया सेंटर्स (केआयसी), एसएआय इकोसिस्टम आणि एनसीओई, राज्य आणि जिल्हा क्रीडा संघटना तसेच जिल्हा युवा अधिकारी (डीवायओ) यांच्या सहकार्याने राबविण्यात आला.

 

 "प्रत्येक जिल्हा क्रीडा क्षेत्रात सक्रिय व्हावा, प्रत्येक मुलगी आत्मविश्वासाने पुढे जावी आणि फिटनेस ही राष्ट्रीय सवय बनवावी. खेलो इंडिया, फिट इंडिया, माय भारत आणि अस्मिता यांच्या माध्यमातून आपण एक मजबूत, तंदुरुस्त आणि अधिक सक्षम भारत निर्माण करत आहोत. पंतप्रधानांच्या दृष्टिकोनातून, भारताची क्रीडा परिसंस्था सतत अधिक समावेशक आणि महिला-केंद्रित होत आहे," असेही खडसे म्हणाल्या.

***

शैलेश पाटील/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2236585) आगंतुक पटल : 111
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English