आयुष मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

अखिल भारतीय आयुर्वेद संस्था, गोवा, यांच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून रुग्णांसाठी विशेष आरोग्यदेखभाल सेवा उपक्रमाचे उदघाटन


कर्करोग संशोधन केंद्र, केंद्रीय संशोधन प्रयोगशाळा, औषधनिर्माण सुविधा आणि इतर सुविधांसाठी अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेच्या गोवा कॅम्पसचा विस्तार करण्याची गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची घोषणा

आयुष मंत्रालय सातत्याने देशभरात आयुर्वेद संबंधी आवश्यक पायाभूत सुविधा बळकट करत आहे - केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव

Posted On: 08 MAR 2026 2:18PM by PIB Mumbai

 

महिला दिनानिमित्त अखिल भारतीय आयुर्वेद संस्था गोवा येथे आज  रुग्णांची देखभाल व्यवस्था अधिक मजबूत करण्यासह विशेष आयुर्वेदिक सेवांचा विस्तार करण्याच्या उद्देशाने अनेक विशेष आरोग्यसेवा सुविधांचे उदघाटन करण्यात आले.

 या सुविधांचे उद्घाटन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते झाले. यावेळी आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)  प्रतापराव जाधव; आयुष मंत्रालयाचे सचिव राजेश कोटेचा; अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेचे संचालक (स्वतंत्र प्रभार) प्रा. वैद्य पी. के. प्रजापती, या संस्थेच्या अधिष्ठाता  प्रा. (डॉ.) सुजाता कदम आणि संस्थेचे इतर वरिष्ठ प्राध्यापक उपस्थित होते.

महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित या विशेष कार्यक्रमात आरोग्यसेवांची पोहोच सर्वदूर पोहचवणे आणि रुग्णांना प्रगत उपचार पद्धती उपलब्ध करुन देण्यासाठी एक अर्थपूर्ण उपक्रम म्हणून नव्याने उदघाटन केलेल्या सुविधांचे लोकार्पण करण्यात आले.

अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेतील 100 पदवीपूर्व जागांपैकी निम्म्या म्हणजे 50% जागा गोव्यातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात येणे ही अभिमानाची बाब आहे, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यावेळी म्हणाले.  अखिल भारतीय आयुर्वेद संस्था आधुनिक आरोग्यसेवेसोबत पारंपारिक औषध पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी वचनबद्ध आहे. या संस्थेत या सुविधांच्या उद्घाटनामुळे रुग्णसेवेत लक्षणीय वाढ होईल आणि लोकांसाठी विशेष आयुर्वेदिक उपचारांची उपलब्धता वाढेल." असे त्यांनी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कर्करोग संशोधन केंद्र, केंद्रीय संशोधन प्रयोगशाळा, औषधनिर्माण सुविधा आणि इतर सुविधांसाठी अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेच्या गोवा कॅम्पसचा विस्तार करण्याची घोषणा केली. यासाठी या संस्थेला अतिरिक्त 50 एकर जागा देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

या कार्यक्रमाला संबोधित करताना आयुष मंत्रालयाचे  राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)  प्रतापराव जाधव यांनी आयुर्वेदाचा लाभ सर्वदूर पोहोचवण्यासाठीच्या केंद्रसरकारच्या संकल्पाला अधोरेखित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली, आयुष मंत्रालय देशभरातील आयुर्वेद पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले. अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेमधील नवीन सुविधांमुळे सर्वांगीण आरोग्यसेवा वितरणाला पाठिंबा मिळेल आणि एकात्मिक उपचार पद्धतींद्वारे रुग्णांना लाभ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

वैद्य राजेश कोटेचा, सचिव, आयुष मंत्रालय यांनी आयुर्वेदाला मिळत असलेल्या वाढत्या जागतिक मान्यतेवर प्रकाश टाकत सांगितले की, “अखिल भारतीय आयुर्वेद संस्था, गोवा आयुर्वेद शिक्षण, संशोधन आणि रुग्णसेवा बळकट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.  या संस्थेत या नव्या सुविधांची भर पडल्यामुळे संस्थेची विशेष आरोग्यसेवा देण्याची क्षमता अधिक वाढेल तसेच पुराव्याधारित आयुर्वेद आणि समन्वित वैद्यकशास्त्राला चालना मिळेल.”

अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेचे, प्रा. (वैद्य) पी. के. प्रजापती, संचालक (स्वतंत्र कार्यभार) यांनीही या नव्या सुविधांचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की,   या संस्थेत विशेष विभागांचे उद्घाटन रुग्णकेंद्रित आयुर्वेदीय आरोग्यसेवा अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल आहे. या सुविधांमुळे आम्हाला सर्वसमावेशक उपचार देणे, प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेला प्रोत्साहन देणे आणि रुग्णांना उपलब्ध होणाऱ्या सेवांची गुणवत्ता वाढवणे शक्य होईल.”

या संस्थेच्या अधिष्ठाता प्रा. (डॉ.) सुजाता कदम  यांनी नव्याने सुरू झालेल्या विभागांचे शैक्षणिक आणि वैद्यकीय महत्त्व अधोरेखित करत सांगितले की, “या विशेष सुविधांच्या समावेशामुळे  अखिल भारतीय आयुर्वेद संस्था, गोवा   येथे वैद्यकीय प्रशिक्षण, संशोधन आणि रुग्णसेवा मोठ्या प्रमाणात बळकट होईल. आयुर्वेदाच्या तत्त्वांसह प्रगत निदान व उपचार सेवा एकत्रित करून आम्ही सर्वसमावेशक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा आणि आमच्या विद्यार्थी व संशोधकांचा शैक्षणिक अनुभव समृद्ध करण्याचा प्रयत्न करीत आहोत.”

नव्याने सुरू करण्यात आलेल्या विभागांमध्ये पुढील सुविधा समाविष्ट आहेत:

  • सुश्रुत शस्त्रक्रिया कक्ष संकुल – आयुर्वेदीय शस्त्रक्रिया आणि रुग्णसेवा अधिक सक्षम करण्यासाठी तयार केलेली आधुनिक शस्त्रक्रिया सुविधा.
  • भौतिक उपचार विभाग – शारीरिक उपचार आणि पुनर्वसनाची आवश्यकता असलेल्या रुग्णांसाठी उपचार व पुनर्वसन सेवा देण्यासाठी सुसज्ज.
  • कौमारभृत्य पंचकर्म विभाग – मुलांसाठी पंचकर्म उपचारांवर केंद्रित विशेष विभाग, आयुर्वेदाच्या माध्यमातून सर्वांगीण बालआरोग्यसेवा प्रोत्साहित करण्यासाठी.
  • बीएमडी (हाडांच्या खनिज घनतेचे मापन) विभाग – हाडांच्या आरोग्याचे मूल्यांकन व व्यवस्थापन सुलभ करण्यासाठी स्थापन केलेला विभाग, ज्यामुळे अस्थिसुषिरता आणि संबंधित आजारांचे लवकर निदान व प्रतिबंध शक्य होईल.

या उपक्रमांमुळे समन्वित आणि पुराव्याधारित आयुर्वेदीय आरोग्यसेवेच्या माध्यमातून रुग्णसेवा अधिक सक्षम करण्यासाठी     अखिल भारतीय आयुर्वेद संस्था, गोवा येथील  सातत्यपूर्ण बांधिलकी दिसून येते. संस्था सर्वांसाठी सुलभ आणि उच्च दर्जाची उपचार सेवा उपलब्ध करून देण्यासोबतच प्रतिबंधात्मक आणि सर्वांगीण वैद्यकशास्त्राच्या तत्त्वांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करीत आहे.

या सुविधांच्या उद्घाटनामुळे आरोग्य पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी आणि समाजाच्या हितासाठी आयुर्वेदावर आधारित उपचारांचा विस्तार करण्यासाठी आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.

***

शैलेश पाटील/भक्ती सोनटक्के/नितीन गायकवाड/परशुराम कोर

Follow us on social media: @PIBPanaji   Image result for facebook icon /PIBPanaji    /pibpanaji  pibgoa[at]gmail[dot]com  /PIBPanaji    /pibpanaji


(Release ID: 2236579) अभ्यागत कक्ष : 84
Read this releasein: English