पर्यटन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

गोव्यातील एनआयडब्ल्यूएस–आयआयटीएम  येथे भारतीय वायुसेनेच्या अधिकाऱ्यांसाठी साहसी जलक्रीडा प्रशिक्षण संपन्न

Posted On: 07 MAR 2026 12:41PM by PIB Mumbai

 

पणजी, गोवा 7 मार्च 2026 :

गोव्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वॉटरस्पोर्ट्स (एनआयडब्ल्यूएस) – इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टुरिझम अ‍ॅण्ड ट्रॅव्हल मॅनेजमेंट (आयआयटीएम) यांनी भारतीय वायुसेनेच्या साहसी क्रीडा महासंचालनालयातर्फे (डीएएफए) नामनिर्देशित अधिकाऱ्यांसाठी विशेष साहसी जलक्रीडा प्रशिक्षण कार्यक्रमांची मालिका यशस्वीरीत्या आयोजित केली.

या प्रशिक्षण कार्यक्रमांचा उद्देश वायुसेनेच्या अधिकाऱ्यांमध्ये साहसी कौशल्ये, जलसुरक्षा जागरूकता आणि कार्यात्मक ज्ञान वाढवणे हा होता. विविध जलक्रीडा प्रकारांमध्ये तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात आले. या उपक्रमांतर्गत भारतीय वायुसेनेच्या अधिकाऱ्यांनी जीवनरक्षण तंत्र, पॉवरबोट हाताळणी, नौकानयन (मूलभूत व मध्यम स्तर), विंडसर्फिंग (मूलभूत व मध्यम स्तर), स्कूबा डायव्हिंग तसेच पर्सनल वॉटरक्राफ्ट (जेट-स्की) संचालन या जलक्रीडा प्रकारांचे  संरचित प्रशिक्षण घेतले.

हा प्रशिक्षण कार्यक्रम 2 ते 6 फेब्रुवारी 2026 या कालावधीत गोव्यातील एनआयडब्ल्यूएस–आयआयटीएम  कॅम्पस येथे आयोजित करण्यात आला. प्रमाणित आणि अनुभवी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सहभागी अधिकाऱ्यांना सैद्धांतिक तसेच प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले.

या अभ्यासक्रमामध्ये मोटरयुक्त आणि मोटररहित जलक्रीडा उपकरणांचे सुरक्षित संचालन, तसेच व्यक्तिगत सुरक्षितता, उपकरणांची सुरक्षितता आणि पर्यावरणीय जबाबदारी यांवर विशेष भर देण्यात आला.

भारतीय वायुसेनेचे  साहसी क्रीडा महासंचालनालय दरवर्षी अशा प्रशिक्षण कार्यक्रमांच्या आयोजनासाठी एनआयडब्ल्यूएस सोबत नियमित सहकार्य करते. या अभ्यासक्रमांमध्ये विंग कमांडर, लेफ्टनंट कर्नल, कर्नल, फ्लाइट लेफ्टनंट, सार्जंट आणि ज्युनिअर वॉरंट ऑफिसर अशा विविध पदांवरील अधिकारी व जवान सहभागी होतात. या प्रशिक्षणामुळे त्यांची साहसी क्षमता, नेतृत्व कौशल्ये आणि कठीण परिस्थितीत काम करण्याची क्षमता अधिक विकसित होते.

व्यावसायिक प्रशिक्षणाबरोबरच या कार्यक्रमामुळे सहभागी अधिकाऱ्यांना गोव्याची किनारी परिसंस्था, स्थानिक संस्कृती आणि खाद्यसंस्कृतीचा अनुभव घेण्याची संधी देखील मिळाली. त्यामुळे हा कार्यक्रम व्यावसायिकदृष्ट्या समृद्ध करणारा आणि सांस्कृतिकदृष्ट्या आकर्षक ठरला.

सद्य प्रशिक्षण मालिकेअंतर्गत आयोजित मध्यम स्तरावरील विंडसर्फिंग अभ्यासक्रमाचा आज समारोप झाला असून भारतीय वायुसेनेच्या 12 अधिकाऱ्यांनी हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केला. सहभागी अधिकाऱ्यांनी प्रशिक्षणाबाबत अत्यंत सकारात्मक अभिप्राय देत उच्च दर्जाचे मार्गदर्शन, काटेकोर सुरक्षा नियम आणि प्रत्यक्ष अनुभवावर आधारित प्रशिक्षण याबद्दल एनआयडब्ल्यूएसच्या प्रशिक्षकांचे कौतुक केले.

डीएएफए आणि एनआयडब्ल्यूएस यांच्यातील सातत्यपूर्ण सहकार्यामुळे भारतीय वायुसेनेच्या अधिकाऱ्यांमध्ये साहसी जलक्रीडा, जलसुरक्षा जागरूकता आणि कौशल्यविकास वाढविण्यास मोठी मदत होत आहे.

***

शैलेश पाटील/हेमांगी कुलकर्णी/परशुराम कोर

Follow us on social media: @PIBPanaji   Image result for facebook icon /PIBPanaji    /pibpanaji  pibgoa[at]gmail[dot]com  /PIBPanaji    /pibpanaji


(Release ID: 2236300) अभ्यागत कक्ष : 49
Read this releasein: English