अणुऊर्जा विभाग
टाटा स्मारक केंद्र आणि कर्करोग उपचार, संशोधन आणि शिक्षणासाठी प्रगत केंद्र (एसीटीआरईसी) यांच्या अभ्यासातून निघालेल्या निष्कर्षांनुसार कर्करोगावरील आधुनिक औषधे विशेषतः मस्तक आणि मानेच्या कर्करोगावरील उपचार पद्धती भारतात आणि जागतिक स्तरावरही सर्वसामान्यांना परवडण्यासारखी नाही
Posted On:
02 MAR 2026 10:33PM by PIB Mumbai
मुंबई, 2 मार्च 2026
टाटा स्मारक केंद्र आणि कर्करोग उपचार, संशोधन आणि शिक्षणासाठी प्रगत केंद्र (एसीटीआरईसी) यांनी मस्तक आणि माने संबंधीच्या जर्नलमध्ये एक महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय अभ्यास प्रकाशित केला असून त्यामधील निष्कर्षानुसार अनेक कर्करोगावरील अनेक आधुनिक औषधे, विशेषतः इम्युनोथेरपी, भारतासह जगभरातील बहुतेक लोकांसाठी अत्यंत महाग आणि परवडण्यासारखी नाहीत.
"डोके आणि मानेच्या कर्करोगावरील उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या लक्ष्यित आणि रोगप्रतिकारक थेरपी औषधांमधील परवडण्याच्या निर्देशकांतील असमानता” या विषयावरील अभ्यासात भारतासह अमेरिका आणि इंग्लड मधील कर्करोगावरील आधुनिक औषधांच्या किमतींचा तौलनिक अभ्यास करण्यात आला. पेम्ब्रोलिझुमॅब आणि निव्होलुमॅब सारखी इम्युनोथेरपी औषधे सर्वत्र अत्यंत महाग आहेत, ज्यामुळे बहुतेक कुटुंबांना ती परवडणारी नाहीत,असे त्यात आढळून आले.
तंबाखूचे सेवन, सुपारी आणि मद्यपान यामुळे भारतात प्रचलित असलेले डोके आणि मानेच्या कर्करोगाचे अनेकदा उशिरा निदान होते. अनेक रुग्ण उपचारांसाठी वैयक्तिक बचतीवर अवलंबून असतात. ही नवीन औषधे काही रुग्णांना आयुष्यवाढीचा फायदा देतात; मात्र त्यांची मर्यादित परिणामकारकता त्यांच्या उच्च किमतीचे समर्थन करत नाही, असे अभ्यासात नमूद केले आहे
प्रमुख निष्कर्षांमध्ये :
भारतात पेम्ब्रोलिझुमॅब च्या सहा महिन्यांच्या कोर्ससाठी सरासरी मासिक उत्पन्नाच्या 80 पट रक्कम मोजावी लागते तर निव्होलुमॅब साठी 20 पट रक्कम लागते.
पाकिस्तान आणि बांग्लादेशमध्ये देखील हे दर असेच न परवडण्याजोगे आहेत.
अगदी अमेरिका आणि इंग्लंड मध्ये देखील या दरांमुळे लक्षणीय आर्थिक ताण सोसावा लागतो.
भारतात एका पेम्ब्रोलिझुमॅब रुग्णावर होणाऱ्या खर्चाच्या निधीतून कमी किमतीच्या टार्गेटेड थेरपीद्वारे सुमारे18 ते 22 रुग्णांवर उपचार करता येऊ शकतात
टाटा स्मारक केंद्राचे प्रमुख लेखक डॉ. अर्जुन सिंग म्हणाले:
इम्युनोथेरपी केवळ महाग नाही - तर ती बहुतांश कुटुंबांच्या आवाक्याबाहेर आहे. भारतात सहा महिन्यांच्या उपचारांचा खर्च कित्येक वर्षांच्या उत्पन्नाइतका असू शकतो. वैद्यकीय प्रगती ही समस्या नव्हे तर औषधांच्या किमती त्यांच्या प्रत्यक्ष लाभापेक्षा कितीतरी अधिक आहेत ही आहे.
एसीटीआरईसीचे वरिष्ठ लेखक आणि संचालक डॉ. पंकज चतुर्वेदी म्हणाले:
जेव्हा बहुतांश लोक उपचारांसाठी त्यांच्या वैयक्तिक खर्चातून रक्कम
उभारतात, तेव्हा ते कुटुंब गरिबीच्या गर्तेत जाते. मस्तक आणि मानेच्या कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणात घट करण्यासाठी प्रतिबंध, लवकर निदान आणि पुरेशी आणि सहज उपलब्ध असलेली उपचारपद्धती हाच सर्वात महत्त्वाचा मार्ग आहे. केवळ महागडी औषधे समस्या सोडवू शकत नाहीत.
संशोधकांनी मजबूत पुराव्यांच्या आधारे महागड्या औषधांचा विवेकी वापर करण्याचा आग्रह धरला आहे, ज्यामुळे रुग्णांना फायदा होण्याची शक्यता जास्त आहे त्यांना प्राधान्य दिले पाहिजे, असे त्यांचे म्हणणे आहे. ते किफायतशीर आणि स्थानिक परिस्थितीनुसार योग्य अशा उपचारांवरील संशोधनाची गरज अधोरेखित करतात; उच्च दर्जाच्या जेनेरिक आणि बायोसिमिलर औषधांच्या प्रसारासोबत कठोर गुणवत्ता तपासणीची अंमलबजावणी करण्याचे, तसेच प्रभावी नियामक देखरेखीचे आवाहन करतात.
भारतात आयुषमान भारतसारख्या आरोग्य सेवांशी निगडित योजनांचा विस्तार, कर्करोग उपचार सुविधांमध्ये करण्यात येणाऱ्या गुंतवणुकीच्या संदर्भात आणि अनेक कर्करोग औषधांवरील सीमाशुल्क रद्द करण्याच्या निर्णयाच्या अनुषंगाने, या निष्कर्षांना अधिक महत्त्व प्राप्त होते. असे असले तरी किंमतीत मोठ्या प्रमाणावर सुधारणा होणे आवश्यक असून त्यामध्ये भक्कम वाटाघाटी, उत्तम विमा संरक्षण आणि तंबाखू सेवन, सुपारी आणि मद्यपान यावरील नियंत्रणाद्वारे प्रतिबंध आणि वेळीच निदान होणे या घटकांना अतिशय महत्त्व आहे.
पूर्ण अभ्यास हेड अँड नेक-Head & Neck (2026) मध्ये उपलब्ध आहे.
सोनाली काकडे/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2234801)
अभ्यागत कक्ष : 21