अणुऊर्जा विभाग
azadi ka amrit mahotsav

एनपीसीआयएलने काइगा केंद्र - 5 आणि 6 साठी प्रथम काँक्रीट ओतणीसह बांधकामास सुरुवात केली

प्रविष्टि तिथि: 01 MAR 2026 9:38PM by PIB Mumbai


भारत अणुऊर्जा महामंडळ लि. (एनपीसीआयएल) ने आज काइगा केंद्र -5 आणि 6 साठी आवश्यक सर्व वैधानिक आणि नियामक मंजुरी प्राप्त केल्यानंतर प्रथम काँक्रीट ओतणी (एफपीसी) हा महत्त्वपूर्ण टप्पा साध्य केला. या प्रसंगी अणुऊर्जा आयोगाचे  (एईसी) अध्यक्ष आणि अणुऊर्जा विभागाचे (डीएई) सचिव डॉ. अजित कुमार मोहंती;  एनपीसीआयएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) भुवन चंद्र पाठक आणि एनपीसीआयएलचे वरिष्ठ अधिकारी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
एफपीसी हा अणुऊर्जा प्रकल्पातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो, जो बांधकामाच्या औपचारिक सुरुवातीचे प्रतीक आहे आणि प्रकल्प पूर्वतयारी टप्प्यातून बांधकाम टप्प्यात प्रवेश केल्याचे दर्शवतो. प्रकल्पाचा कालावधी  एफपीसीपासून मोजला जातो. काइगा केंद्र - 5 आणि 6 प्रकल्पातील पहिले केंद्र एफपीसीपासून सुमारे 60 महिन्यांत अणुभट्टी कार्यान्वित होण्याची अवस्था म्हणजेच अणुभट्टीची स्वयंपूर्ण अणुशृंखला अभिक्रिया सुरू होण्याचा टप्पा साध्य करेल, अशी अपेक्षा आहे.
प्रथमच, काइगा- 5 आणि 6 प्रकल्पासाठी अभिनव अंमलबजावणी धोरण अवलंबण्यात आले असून काही मोजक्या मोठ्या अभियांत्रिकी, खरेदी व बांधकाम (ईपीसी) पॅकेजद्वारे (जसे की उत्खनन कामे, अणु बेट, टर्बाइन बेट आणि अणु उपकरण प्रणाली) प्रकल्पाची अंमलबजावणी केली जात आहे, ज्यामुळे प्रकल्पाची जलद अंमलबजावणी आणि समन्वयाशी संबंधित अडचणी कमी होतील.
काइगा केंद्र -5 आणि 6 या अत्याधुनिक, स्वदेशी 700 एमडब्ल्यू दाबयुक्त जड पाणी अणुभट्ट्या (पीएचडब्ल्यूआर) असून त्यामध्ये प्रगत सुरक्षा वैशिष्ट्यांचा समावेश आहे आणि त्या जगातील सर्वात सुरक्षित अणुऊर्जा प्रकल्पांपैकी आहेत. अशाच प्रकारच्या तीन दाबयुक्त जड पाणी अणुभट्ट्या म्हणजे काकरापार अणुऊर्जा केंद्र -3 आणि 4 (केएपीएस-3 आणि 4) आणि राजस्थान अणुऊर्जा प्रकल्प केंद्र -7 (आरएपीपी-7) या अनुक्रमे गुजरात आणि राजस्थान राज्यांमध्ये यशस्वीपणे कार्यरत आहेत. या प्रकल्पासाठी लागणारे घटक आणि उपकरणे देशांतर्गत औद्योगिक भागीदारांकडून पुरवली जात आहेत आणि कामे भारतीय कंत्राटदारांकडून केली जात आहेत, ज्यामुळे सरकारच्या आत्मनिर्भर भारत उपक्रमांना बळकटी मिळत आहे.
सध्या काइगा केंद्रावर 220 एमडब्ल्यू  क्षमतेची चार केंद्र कार्यरत असून एकूण स्थापित क्षमता 880 एमडब्ल्यू आहे. केंद्र -5 आणि 6 पूर्ण झाल्यानंतर या केंद्राची एकूण स्थापित क्षमता 2,280 एमडब्ल्यू पर्यंत वाढेल.
हा प्रकल्प स्थानिक नागरिकांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगार आणि व्यवसाय संधी निर्माण करेल, प्रदेशातील तसेच परिसरातील आर्थिक विकासाला चालना देईल आणि आसपासच्या भागातील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा घडवून आणेल, अशी अपेक्षा आहे.
काइगा केंद्राचा विस्तार हा देशाच्या विकसित भारत आणि निव्वळ शून्य उत्सर्जन उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी स्वच्छ ऊर्जा पुरवण्याच्या एमपीसीआयएलच्या बांधिलकीचे प्रतीक आहे, तसेच अणुसुरक्षा आणि पर्यावरण संवर्धनाच्या सर्वोच्च मानकांचे पालन करण्याचे द्योतक आहे. 

***

सुषमा काणे/नितीन गायकवाड/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2234320) आगंतुक पटल : 59
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English