अणुऊर्जा विभाग
azadi ka amrit mahotsav

कैगा अणुऊर्जा प्रकल्पातील युनिट-5 आणि 6 च्या बांधकामासाठी ‘फर्स्ट पोर ऑफ कॉंक्रिटला अणुऊर्जा नियामक मंडळाची मंजुरी

प्रविष्टि तिथि: 01 MAR 2026 3:35PM by PIB Mumbai

 

अणुऊर्जा नियामक मंडळाने कैगा अणुऊर्जा प्रकल्पातील युनिट-5 आणि 6 च्या बांधकामासाठी ‘फर्स्ट पोर ऑफ कॉंक्रिट’ करण्यास 24 फेब्रुवारी 2026 रोजी परवानगी दिली आहे.

अणुऊर्जा नियामक मंडळाने निर्धारित केलेल्या सुरक्षा निकषांच्या आधारे कैगा अणुऊर्जा प्रकल्प स्थळी उभारण्यात येणाऱ्या 2x700 मेगावॅट क्षमतेच्या प्रेसराइज्ड हेवी वॉटर रिअॅक्टर युनिट्सच्या रचनेचे सुरक्षा परीक्षण समाधानकारकरीत्या पूर्ण झाल्यानंतर ही परवानगी दिली आहे. एईआरबी कडून करण्यात आलेली ही तपासणी त्यांच्या स्थापित बहु-स्तरीय परीक्षण प्रक्रियेनुसार करण्यात आली. 23 फेब्रुवारी 2026 रोजी एईआरबीच्या मंडळाने सुरक्षा परीक्षणांच्या निष्कर्षांचा आढावा घेतल्यानंतर या युनिट्ससाठी ‘फर्स्ट पोर ऑफ कॉंक्रिट’ मंजूर केला.

24 फेब्रुवारी 2026 रोजी देण्यात आलेल्या ‘फर्स्ट पोर ऑफ कॉंक्रिट’ परवानगीबाबत एईआरबीचे अध्यक्ष ए. के. बालासुब्रमण्यम यांनी सांगितले की, कैगा-5 आणि 6 साठी एईआरबीने दिलेली परवानगी ही विस्तृत परीक्षण प्रक्रियेनंतर देण्यात आली असून, सुरक्षा आणि नियामक निकषांचे पूर्ण पालन सुनिश्चित करण्यात आले आहे. मंजूर डिझाइन, सुरक्षा विश्लेषण आणि आवश्यक गुणवत्ता हमी निकषांचे पालन करून अणुऊर्जा प्रकल्पाच्या बांधकामाचा मार्ग यामुळे मोकळा झाला आहे.

700 मेगावॅट क्षमतेचे पीएचडब्लूआर रिअॅक्टर हे देशात विकसित केलेल्या स्वदेशी डिझाइनवर आधारित असून त्यांची निर्मिती न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांनी केली आहे. या डिझाइनमध्ये एईआरबीने निर्धारित केलेल्या निकषांनुसार अनेक प्रगत सुरक्षा वैशिष्ट्यांचा समावेश करण्यात आला असून त्यात आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था यांच्या विद्यमान सुरक्षा मानकांचाही विचार करण्यात आला आहे.

कैगा-5 आणि 6 मधील 700 मेगावॅट पी एच डब्ल्यू आर युनिट्सचे डिझाइन गुजरात राज्यातील काकरापार अणुऊर्जा केंद्र येथील युनिट-3 आणि 4 प्रमाणेच आहे. या युनिट्सना एईआरबीने जुलै 2025 मध्ये नियमित कार्यान्वयनासाठी परवाना दिला होता. याशिवाय, राजस्थानमधील रावतभाटा येथील प्रकल्पस्थळी 700 मेगावॅट क्षमतेची आणखी दोन पी एच डब्ल्यू आर युनिट्स आरएपीपी -7 आणि 8 सध्या कार्यान्वयनपूर्व चाचणी प्रक्रियेत आहेत. एईआरबी ने यापूर्वी 30 जानेवारी 2026 रोजी आरएपीपी युनिट-7 ला कार्यान्वयन चाचणीसाठी 100 टक्के क्षमतेपर्यंत वीज निर्मिती करण्यास परवानगी दिली होती.

कैगा अणुऊर्जा प्रकल्प कर्नाटक राज्यातील उत्तर कन्नड जिल्ह्यात स्थित असून येथे 220 मेगावॅट क्षमतेची चार प्रेसराइज्ड हेवी वॉटर रिअॅक्टर युनिट्स आधीपासून कार्यरत आहेत.

फर्स्ट पोर ऑफ कॉंक्रिट साठी देण्यात आलेली ही परवानगी म्हणजे प्रकल्पस्थळावरील उत्खनन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अणुऊर्जा प्रकल्पाच्या प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात झाल्याचे प्रतीक आहे.

 

***

नेहा कुलकर्णी/राज दळेकर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2234218) आगंतुक पटल : 78
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English