अर्थ मंत्रालय
डीजीटीएस आणि मुंबई सीमा शुल्क विभागातर्फे 'अतिथी' ॲप, आरबीआय चलन नियम आणि 'बॅगेज रुल्स 2026' बाबत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन
Posted On:
28 FEB 2026 6:22PM by PIB Mumbai
मुंबई, 28 फेब्रुवारी 2026
करदाता सेवा संचालनालय (DGTS), मुंबई विभागीय एकक आणि विमानतळ आयुक्तालय, मुंबई सीमा शुल्क क्षेत्र–III यांनी संयुक्तपणे 27 फेब्रुवारी 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका सर्वसमावेशक परिसंवाद आणि वेबिनारचे आयोजन केले. डिजिटल सीमा शुल्क सुलभता, परकीय चलन नियमन आणि नवीन बॅगेज रुल्स 2026 बाबत हितधारक आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांमध्ये जनजागृती वाढवणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.
या परिसंवादामध्ये आंतरराष्ट्रीय प्रवाशांशी संबंधित - डिजिटल सीमा शुल्क सुलभतेसाठी 'अतिथी' (ATITHI) ॲप, चलन आयात आणि निर्यातीबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेची (RBI) मार्गदर्शक तत्त्वे आणि नवीन बॅगेज रुल्स 2026 अंतर्गत सुधारित सामानाचे नियम, या तीन महत्त्वाच्या क्षेत्रांचा समावेश करण्यात आला.

अतिथी (ATITHI) ॲप: सीमा शुल्क मंजुरी आणि डिजिटल सुलभता
सिस्टिम्स महासंचालनालयाचे अतिरिक्त संचालक वैभव बजाज यांनी अतिथी (Automated Traveller Helpdesk for Incoming Tourists & Homebound Indians) ॲपवर सविस्तर सादरीकरण केले. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाच्या डिजिटल रूपांतरण उपक्रमांतर्गत विकसित केलेला हा मंच प्रवाशांना भारतात येण्यापूर्वी किंवा आल्यानंतर सामानाची आणि चलनाची ऑनलाइन घोषणा करण्याची सुविधा देतो.
हे ॲप डिजिटल सीमा शुल्क भरणे, विमान कर्मचारी, समूह आणि पाळीव प्राण्यांसाठीची घोषणा तसेच तात्पुरती आयात/निर्यात प्रमाणपत्रे मिळवणे सोपे करते, ज्यामुळे विमानतळांवरील प्रत्यक्ष मानवी हस्तक्षेप लक्षणीयरीत्या कमी होतो. हा उपक्रम पारदर्शक, नागरिक-केंद्रित सीमा शुल्क प्रशासनाला चालना देतो आणि आगमन कक्षातील गर्दी कमी करण्यास मदत करतो.
आरबीआय (RBI) मार्गदर्शक तत्त्वे: निर्यात, आयात आणि चलन अनुपालन
भारतीय रिझर्व्ह बँक, मुंबईच्या उपमहाव्यवस्थापक सविता श्रीकांत यांनी फेमा (FEMA) अंतर्गत विहित चलन निर्यात आणि आयात मर्यादा, प्रवासादरम्यान सोबत असलेल्या चलन आणि सामानाच्या माहितीची घोषणा सादर करण्याच्या आवश्यकता आणि प्रवाशांसाठीच्या अनुपालन जबाबदाऱ्यांबद्दल माहिती दिली. या सत्राने कायदेशीर नियमांचे पालन करण्यासोबतच, आंतरराष्ट्रीय प्रवास सुरळीत पार पडावा यासाठी परवानगी असलेली चलन मर्यादा आणि नियामक प्रक्रियांबाबत स्पष्टता प्रदान केली.
या कार्यक्रमात नवीन बॅगेज रुल्स 2026 वर एका तांत्रिक सत्राचेही आयोजन करण्यात आले होते. 'नॅशनल अकॅडमी ऑफ कस्टम्स, इनडायरेक्ट टॅक्सेस अँड नार्कोटिक्स' (NACIN) चे सहाय्यक संचालक आर. एन. झा यांनी प्रवाशांच्या अद्ययावत हक्क-सवलती, सुधारित मूल्यांकन निकष आणि सुलभता व अंमलबजावणी यांचा समतोल राखण्याच्या उद्देशाने कार्यपद्धतीत केलेल्या बदलांचे सविस्तर वर्णन केले.
मुंबई सीमा शुल्क क्षेत्र–III चे प्रधान आयुक्त आलोक झा यांनी विमानतळावरील कामकाज सुरळीत चालण्यासाठी आणि स्वयंस्फूर्त नियमांचे पालन वाढवण्यासाठी सार्वजनिक जागरूकता अत्यंत महत्त्वाची आहे,यावर भर दिला.
परिसंवादादरम्यान, मुंबई सीमा शुल्क क्षेत्र–III च्या विमानतळ आयुक्तालयाने पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि प्रवाशांची सोय वाढवण्यासाठी विमानतळावर राबविल्या जाणाऱ्या सर्वोत्तम पद्धतींचे प्रदर्शन केले.
यामध्ये आगमन आणि प्रस्थान टर्मिनलवर 24×7 मदत कक्ष, टच-स्क्रीन किओस्क आणि क्यूआर-आधारित रिअल-टाइम फीडबॅक प्रणाली, वेळेत निवारण करण्यासाठी समर्पित तक्रार निवारण यंत्रणा, जलद प्रवासी प्रक्रियेसाठी पासपोर्ट स्कॅनर आणि तपासणीदरम्यान पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी रेड चॅनेलवर CAPIT मिरर स्क्रीन यांचा समावेश आहे. 1 फेब्रुवारी 2026 पासून, रिअल-टाइम फीडबॅक प्रणालीद्वारे 81 प्रवाशांच्या प्रतिक्रिया नोंदवल्या गेल्या आहेत, जे सेवा सुधारण्याच्या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांचे निदर्शक आहेत.

दैनंदिन पर्यवेक्षकीय देखरेख असलेल्या अनिवार्य बॉडी-वोर्न कॅमेरा (BWC) सारख्या तंत्रज्ञान-आधारित देखरेख उपाययोजना, APIS आणि PNR विश्लेषण वापरून प्रगत प्रवासी प्रोफाइलिंग आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांद्वारे केल्या जाणाऱ्या अचानक तपासणीमुळे उत्तरदायित्व आणि दक्षता अधिक मजबूत झाली आहे.
बॅगेज रुल्स 2026 आणि स्क्रिनिंग प्रक्रियेवरील विशेष प्रशिक्षण, वर्तन आणि प्रवासी-हाताळणी कार्यशाळा, तसेच Atithi BO (जानेवारी 2026) आणि Atithi 2.0 (फेब्रुवारी 2026) अंतर्गत क्षमता बांधणी सत्रांमुळे संस्थात्मक सज्जता अधिक दृढ झाली आहे.
सार्वजनिक पोहोच उपक्रमांमध्ये बॅगेज रुल्स 2026 बाबत सार्वजनिक सूचना जारी करणे, टर्मिनल-2 वर जनजागृती भित्तीपत्रके आणि डिजिटल स्टँडीज लावणे, नियोजित प्रसारमाध्यम संवाद आणि अधिकृत X हँडल (@MumCustomsZone3) द्वारे माहितीचा सक्रिय प्रसार करणे यांचा समावेश आहे. सीआयएसएफ, एमआयएएल, बीसीएएस आणि विमान कंपन्यांशी नियमित समन्वय साधल्यामुळे विमानतळावरील कामकाज सुरळीत चालते आणि नियमपालनात वाढ होते; ज्याला ट्रान्झिट झोन आणि इतर संवेदनशील क्षेत्रांमधील आकस्मिक तपासणीद्वारे अधिक पाठबळ मिळते.
या एकत्रित उपक्रमांमुळे भारतातील सर्वात वर्दळीच्या आंतरराष्ट्रीय प्रवेशद्वारांपैकी एक असलेल्या ठिकाणी डिजिटल सुलभता, भक्कम तक्रार निवारण, वाढीव पारदर्शकता आणि कार्यक्षम प्रवासी प्रक्रिया सुनिश्चित करण्याप्रति मुंबई सीमा शुल्क विभागाची वचनबद्धता अधोरेखित होत आहे.
* * *
पीआयबी मुंबई | माधुरी पांगे/शैलेश पाटील/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2233981)
अभ्यागत कक्ष : 37