अणुऊर्जा विभाग
इंडिया एआय समिट 2026 मध्ये राष्ट्रीय कर्करोग ग्रीड आणि इंडिया एआय ने कर्करोगावरील उपचारांसाठी विश्वासार्ह कृत्रिम बुद्धिमत्ता उपाययोजनांवर दिला भर
इंडिया एआय - एनसीजी CATCH (कॅन्सर एआय अँड टेक्नॉलॉजी चॅलेंज) ग्रांट विजेत्यांचाही केला गौरव
ऑन्कोलॉजीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा उत्तरदायी स्वरुपात विस्तार करावा असे चर्चासत्रात सहभागी झालेल्या दिग्गजांचे आवाहन
Posted On:
27 FEB 2026 8:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली/मुंबई, 27 फेब्रुवारी 2026
नवी दिल्लीतील भारत मंडपम इथे अलिकडेच पार पडलेल्या इंडिया एआय समिट 2026 मध्ये, नवोन्मेषाकडून प्रभावाकडे : कर्करोग उपचारांसाठी विश्वासार्ह कृत्रिम बुद्धिमत्तेचा विस्तार (From Innovation to Impact: Scaling Trusted AI for Cancer Care) या विषयावरच्या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. नॅशनल कॅन्सर ग्रिड तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारितील इंडिया एआय मिशन, या संस्थांनी संयुक्तपणे या सत्राचे आयोजन केले होते.
या सत्राच्या निमित्ताने सरकार, क्लिनिकल ऑन्कोलॉजी, संशोधन, शैक्षणिक क्षेत्र, जागतिक आरोग्य क्षेत्र, समाजसेवी संस्था आणि तंत्रज्ञान विषयक परिसंस्थेतील आघाडीची आणि दिग्गज व्यक्तिमत्वे एकत्र आली होती. या सत्रादरम्यान सर्व वक्त्यांनी भारतातील कर्करोग विषयक उपचार क्षेत्राअंतर्गत, वैद्यकीयदृष्ट्या प्रमाणित आणि उत्तरदायी स्वरुपात कृत्रिम बुद्धिमत्ताधारीत उपाययोजनांचा कशा रितीने विस्तार करता येईल यासंबंधीच्या मुद्यांवर चर्चा केली. या कार्यक्रमादरम्यान इंडिया एआय - एनसीजी कॅन्सर एआय अँड टेक्नॉलॉजी चॅलेंज (CATCH) ग्रँट अर्थात कर्करोग - कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञानविषयक आव्हाने यासंदर्भातील आव्हानात्मक स्पर्धा उपक्रमाच्या विजेत्यांचा गौरवही केला गेला. यासोबतच कॅच कंपेन्डिअम या, वास्तविक जगात कर्करोगावरील उपचारांच्या विविध टप्प्यांवर प्रत्यक्षात अमलात आणण्यासाठी सज्ज असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ताधारीत उपाययोजनांच्या दस्तऐवजीकरणाच्या संकलनाचे प्रकाशनही करण्यात आले.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे संयुक्त सचिव विजय नेहरा आणि इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव एस. कृष्णन यांनी या सत्राला संबोधित केले. या दोघांनीही भक्कम स्वरुपातील सार्वजनिक डिजिटल पायाभूत सुविधांचे महत्व अधोरेखित केले. कृत्रिम बुद्धिमत्तााधारीत उपाययोजनांमध्ये नवोन्मेष असायला हवाच, पण त्यासोबतच अशा उपाययोजना वास्तव जगतातील आरोग्य व्यवस्थेअंतर्गत अमलात आणता येण्याजोग्या असणेही गरजेचे असते ही बाबही त्यांनी नमूद केली.
नॅशनल कॅन्सर ग्रिडचे निमंत्रक आणि टाटा स्मारक रुग्णालयाचे संचालक डॉ. सी. एस. प्रमेश यांनीही उपस्थितांसमोर आपले विचार मांडले. येत्या काही वर्षांमध्ये, डिजिटल साधने आणि कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे, आरोग्य सेवा वितरणाच्या पद्धतींमध्ये परिवर्तनकारी बदल घडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कॅच कंपेन्डिअम या, वास्तविक जगात कर्करोगावरील उपचारांच्या विविध टप्प्यांवर प्रत्यक्षात अमलात आणण्यासाठी सज्ज असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ताधारीत उपाययोजनांच्या दस्तऐवजीकरणाच्या संकलनाच्या प्रकाशनाचा क्षण, या सत्राचे वैशिष्ट्य ठरले. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, आरोग्य मंत्रालय, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि नॅशनल कॅन्सर ग्रिडच्या वरिष्ठ नेत्यांच्या हस्ते हे प्रकाशन पार पडले. या संकलनामध्ये तपासणी, निदान, वैद्यकीय निर्णय घेण्यासाठीची मदत, रुग्णांशी संवाद आणि उपचारांमधील समन्वय अशा विविध क्षेत्रांशी संबंधित 28 उच्च प्रभावाची क्षमता असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ताधारीत उपाययोजनांची माहिती मांडलेली आहे. या संकलनाच्या माध्यमातून भारतातील ऑन्कोलॉजी विषयक परिसंस्थेतील नवोन्मेष आणि उत्तरदायी स्वरुपातील विस्ताराच्या अनुषंगाने, विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य असणे किती महत्त्वाचे आहे ही बाब ठळकपणे अधोरेखित केली आहे.
आरोग्य संशोधन विभागाचे सचिव आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. राजीव बहल यांनीही आपली मते मांडली. अत्यंत काटेकोर आणि शिस्तबद्ध रितीने पुराव्यांचे संकलन करणे, मूल्यमापन करणे तसेच, संबंधित उपाययोजना उत्तरदायी वृत्तीने अमलात आणणे यासाठीचा मानक आराखडा आखण्याची गरज त्यांनी अधोरेखीत केली. कृत्रिम बुद्धिमत्ताधारीत उपाययोजनांच्या प्रमाणिकरणाची प्रक्रिया किती कठोरपणे राबवली जाईल आणि त्यांचे आरोग्य व्यवस्थेसोबत किती नियोजनपूर्वक एकत्रीकरण घडवून आणले जाईल, यावरच कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा प्रभाव अवलंबून असल्याचे त्यांनी नमूद केले.
कॅच ग्रँट विषयी
इंडिया एआय आणि एनसीजी कॅन्सर एआय अँड टेक्नॉलॉजी चॅलेंज ग्रँट हा उपक्रम इंडिया एआय, नॅशनल कॅन्सर ग्रिड आणि कोइता डिजिटल ऑन्कोलॉजी सेंटर या संस्थांचा संयुक्त उपक्रम आहे. या उपक्रमाला ॲक्सिस बँकेच्या वतीने, त्यांच्या कॉरपोरेट सामाजिक उत्तरदायित्वाअंतर्गत पाठबळ लाभले आहे.
[https://www.ncgindia.org/ncg-catch-grant]
नॅशनल कॅन्सर ग्रिड (NCG) बद्दल:
नॅशनल कॅन्सर ग्रिड म्हणजे 400 पेक्षा जास्त कर्करोग केंद्र, संशोधन संस्था आणि रुग्णांशी संबंधित गटांचा अंतर्भाव असलेले व्यापक जाळे. याअंतर्गत परस्पर सहकार्य, प्रशिक्षण, कर्करोगावरील संशोधन आणि तंत्रज्ञानाधारित उपक्रमांच्या माध्यमातून भारतातील कर्करोगसंबंधीच्या उपचारांचे मानकीकरण करण्यासाठी तसेच रुग्णांच्या स्थितीगतीसंबंधीच्या फलनिष्पत्तीत सुधारणा घडवून आणण्यासाठीचे प्रयत्न केले जातात.
[https://www.ncgindia.org/]
* * *
पीआयबी मुंबई | सुषमा काणे/तुषार पवार/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2233730)
अभ्यागत कक्ष : 61