पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
पुणे येथील भारतीय प्राणिशास्त्रीय सर्वेक्षण, पश्चिम प्रादेशिक केंद्र येथे पश्चिम घाट प्राणी संग्रहालय, संग्रहसाठा व प्रेक्षागृहाच्या कामाचा प्रारंभ
पुण्यात प्राणी जैवविविधतेचे केंद्र उभारणीच्या मार्गावर
Posted On:
22 FEB 2026 1:15PM by PIB Mumbai
पुणे, 22 फेब्रुवारी 2026
आज पुणे येथील भारतीय प्राणिशास्त्रीय सर्वेक्षणाच्या पश्चिम प्रादेशिक केंद्रात पश्चिम घाट प्राणी संग्रहसाठा, संग्रहालय आणि प्रेक्षागृहाच्या पायाभरणीचा समारंभ डॉ. धृती बॅनर्जी, महासंचालक, भारतीय प्राणिशास्त्रीय सर्वेक्षण (झेडएसआय) यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाला.

प्रस्तावित पश्चिम घाट प्राणी संग्रहसाठा आणि प्रेक्षागृह हे अत्याधुनिक वैज्ञानिक पायाभूत सुविधा केंद्र असून पश्चिम घाटातील समृद्ध व वैशिष्ट्यपूर्ण जैवविविधतेचे दस्तऐवजीकरण, संवर्धन आणि अभ्यास यासाठी समर्पित असेल. पश्चिम घाट हा जगातील मान्यताप्राप्त जैवविविधता प्रमुख स्थळांपैकी एक आहे.

संग्रहसाठ्याबाबत
पश्चिम घाट परिसरातून संकलित करण्यात आलेल्या लाखो अमूल्य प्राणी नमुन्यांचे सुरक्षित जतन करण्यासाठी हा संग्रहसाठा उभारण्यात येत आहे. विविध प्राणी गटांतील प्रतिनिधिक नमुने येथे संग्रहित केले जाणार आहेत, त्यामध्ये: कीटक, मृदुकाय प्राणी, मासे, उभयचर, सरपटणारे प्राणी, पक्षी, सस्तन प्राणी इत्यादींचा समावेश असेल. “आधुनिक जतन सुविधांसह या संग्रहसाठ्याची रचना करण्यात येणार असून मूळ नमुन्यांचे दीर्घकालीन संवर्धन सुनिश्चित केले जाईल. हे नमुने वर्गीकरणशास्त्र आणि प्रणालीबद्ध संशोधनासाठी अत्यंत महत्त्वाचे आधारस्तंभ ठरतात,” असे डॉ. धृती बॅनर्जी, महासंचालक, झेडएसआय यांनी या प्रसंगी सांगितले. त्यांनी पुढे नमूद केले की, नव्या पायाभूत सुविधांची रचना अशी करण्यात येत आहे की प्राणी जैवविविधता विषयात शिक्षण व कारकिर्द करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे एक महत्त्वपूर्ण केंद्र ठरेल.

संग्रहसाठ्याचे वैज्ञानिक आणि शैक्षणिक महत्त्व
पश्चिम घाट प्राणी संग्रहसाठा पुढील बाबींमध्ये उपयुक्त ठरेल: वर्गीकरणशास्त्र आणि प्रणालीबद्ध संशोधनासाठी भक्कम पाया उपलब्ध करून देणे; जैवविविधता मूल्यांकन आणि संवर्धन धोरण निर्मितीसाठी संदर्भ केंद्र म्हणून कार्य करणे; दुर्मिळ, स्थानिक आणि संकटग्रस्त प्रजातींचे वैज्ञानिक दस्तऐवजीकरण सुलभ करणे; प्राणी जैवविविधतेची माहिती जागतिक स्तरावर उपलब्ध व्हावी यासाठी सर्वसमावेशक डिजिटल डेटाबेस विकसित करणे; विद्यार्थी, संशोधक आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी शैक्षणिक व प्रदर्शन सुविधा उपलब्ध करणे; संग्रहालयातील नमुन्यांच्या माध्यमातून विज्ञान प्रसार, जनजागृती आणि जैवविविधता संवर्धनाला चालना देणे.

जगातील प्रमुख जैवविविधता प्रमुख स्थळांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पश्चिम घाटामध्ये अनेक स्थानिक आणि संकटग्रस्त प्रजाती आढळतात. “हा प्राणी संग्रहसाठा राष्ट्रीय जैवविविधता दस्तऐवजीकरण कार्यक्रमांना मोठी बळकटी देईल आणि संवर्धन नियोजनासाठी ठोस वैज्ञानिक पुरावे उपलब्ध करून देईल,” असे डॉ. बसुदेव त्रिपाठी, वैज्ञानिक-ई व प्रभारी अधिकारी, झेडएसआय, पश्चिम प्रादेशिक केंद्र, पुणे यांनी सांगितले.
हे केंद्र वन्यजीव न्यायवैज्ञानिक सहाय्य सुविधा म्हणूनही कार्य करेल. जप्त करण्यात आलेल्या विविध वन्यजीव प्राणी व त्यांच्याशी संबंधित वस्तूंची ओळख पटविणे व मार्गदर्शन सेवा प्रदान करून वन्यजीव कायद्याची अंमलबजावणी आणि संवर्धन कृतींना सहाय्य केले जाईल. महाराष्ट्र पोलीस, वन विभाग, सीमाशुल्क विभाग इत्यादी अंमलबजावणी यंत्रणांना याचा लाभ होईल.
संशोधन, संवर्धन, शिक्षण आणि न्यायवैज्ञानिक तज्ज्ञता यांचा एकाच छताखाली समन्वय साधत पश्चिम घाट प्राणी संग्रहसाठा भारतातील जैवविविधता दस्तऐवजीकरण आणि संवर्धन प्रयत्नांना मोठी चालना देईल.
या उपक्रमामुळे पुणे प्राणी जैवविविधता संशोधन आणि वैज्ञानिक उत्कृष्टतेचे अग्रगण्य केंद्र म्हणून उदयास येण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. भविष्यातील पिढ्यांसाठी देशाच्या नैसर्गिक वारशाचे संरक्षण करण्याच्या राष्ट्रीय बांधिलकीला यामुळे अधिक बळकटी मिळेल.
संपर्क:
प्रभारी अधिकारी,
भारतीय प्राणिशास्त्रीय सर्वेक्षण, पश्चिम प्रादेशिक केंद्र,
आकुर्डी, पीसीएनटी पोस्ट, पुणे-411 044, महाराष्ट्र
020-25655213
020-27652564
wrc@zsi.gov.in
https://zsi.gov.in
@zsiwrcpune
https://www.facebook.com/profile.php?id=100089571687180

Old Museum and Building of Zoological Survey of India, Western Regional Centre, Pune
* * *
पीआयबी मुंबई | नेहा कुलकर्णी/नितीन गायकवाड/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2231458)
अभ्यागत कक्ष : 38