अर्थ मंत्रालय
पीएफआरडीएने आरोग्यसेवा खर्चाच्या नियोजनासाठी निवृत्ती बचत रक्कमेला लवचिकता मिळवून देत आयसीआयसीआय पेन्शन फंडच्या सहकार्याने ‘आयसीआयसीआय पीएफ एनपीएस स्वास्थ्य इक्विटी प्लस’ ही नाविन्यपूर्ण एनपीएस योजना आणली बाजारात
Posted On:
21 FEB 2026 6:06PM by PIB Mumbai
निवृत्ती वेतन निधी नियामक आणि विकास प्राधिकरणाने (पीएफआरडीए) आयसीआयसीआय पेन्शन फंड मॅनेजमेंट लिमिटेडच्या सहकार्याने, नॅशनल पेन्शन सिस्टम (एनपीएस) अंतर्गत 'आयसीआयसीआय पीएफ एनपीएस स्वास्थ्य इक्विटी प्लस' ही एक अनोखी पेन्शन योजना सुरू केली आहे. पीएफआरडीएच्या रेग्युलेटरी सँडबॉक्स फ्रेमवर्क अंतर्गत संकल्पनेचा दाखला म्हणून सादर केलेली ही योजना निवृत्ती निधी नियोजन आणि आरोग्यसेवा-केंद्रित आर्थिक उपाय एकत्रित करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
या योजनेमुळे ग्राहकांना अपोलो 24|7 प्लॅटफॉर्म आणि अपोलो हॉस्पिटल्स नेटवर्कमधील निवडक रुग्णालये आणि फार्मसींद्वारे ओपीडी, निदान, रुग्णालय भरती आणि औषध खरेदीसह वैद्यकीय खर्चासाठी आपल्या स्वतःच्या योगदानाच्या 25% पर्यंत रक्कम काढता येते, तर उर्वरित रक्कम निवृत्तीसाठी वाढत राहते. आंशिक पैसे काढण्याच्या संख्येवर कोणतीही मर्यादा नाही, पहिल्यांदा पैसे काढण्यासाठी किमान ₹50,000 जमा करणे आवश्यक आहे. जर वैद्यकीय खर्च एकूण निधीच्या 70% पेक्षा जास्त असेल तर आपत्कालीन निर्गमन तरतुदीद्वारे जमा निधीच्या 100% पर्यंत रक्कम काढण्याची परवानगी मिळू शकते.

पीएफआरडीएचे अध्यक्ष शिवसुब्रमण्यम रामन यांच्या उपस्थितीत हा शुभारंभ झाला. आयसीआयसीआय पेन्शन फंड मॅनेजमेंट, अपोलो हेल्थको आणि या योजनेसाठी केंद्रीय रेकॉर्डकीपिंग एजन्सी म्हणून काम करणाऱ्या के फिन टेक्नॉलॉजीजचे वरिष्ठ अधिकारीही या कार्यक्रमाला उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना रामन म्हणाले की, पीएफआरडीएचे वृद्धापकाळातील सुरक्षेचे स्वप्न जीवनातील बदलत्या असुरक्षिततेनुसार विकसित होणाऱ्या व्यापक आणि शिस्तबद्ध आर्थिक नियोजनावर आधारित आहे. त्यांनी नमूद केले की, हा उपक्रम आरोग्यसेवेच्या गरजांसाठी समर्पित बचत सेतू तयार करून विमा उपायांसाठी पूरक ठरतो आणि विकसित भारताच्या दृष्टिकोनाशी सुसंगत असा सुरक्षित आणि पारदर्शक व्यवहार सक्षम करण्यासाठी आधार प्रमाणीकरण तसेच यूपीआयसह भारताच्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांचा वापर करतो.
आयसीआयसीआय पेन्शन फंड मॅनेजमेंट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमित मोहिंद्र यांनी सांगितले की, ही योजना ग्राहकांना वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितींना तोंड देण्यासाठी लवचिकता प्रदान करून वाढत्या आयुर्मान आणि वाढत्या आरोग्यसेवा खर्चाला तोंड देते, त्याचबरोबर संरचित निवृत्ती निधी तयार करते. अपोलो हेल्थको आणि के फिन टेक्नॉलॉजीजच्या प्रतिनिधींनी यावर प्रकाश टाकला की एकात्मिक आरोग्य सेवा प्रवेश आणि मजबूत डिजिटल रेकॉर्डकीपिंगने नियमन केलेल्या चौकटीत पैसे काढण्याची अखंड, सुरक्षित आणि अनुपालन प्रक्रिया सुनिश्चित करते.

या योजनेअंतर्गत, 70% ते 100% संचित निधी इक्विटीमध्ये गुंतवला जाईल, 30% पर्यंत डेट् आणि 10% पर्यंत मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट्समध्ये गुंतवला जाईल. सदस्यांना अपोलो हेल्थकेअर नेटवर्कमध्ये प्राधान्य प्रवेश आणि इतर फायदे देखील मिळतील, ज्यामुळे एनपीएस फ्रेमवर्कमध्ये दीर्घकालीन संपत्ती निर्मिती आणि सुलभ आरोग्यसेवा सहाय्य एकत्रित होऊ शकेल.
***
शैलेश पाटील/नंदिनी मथुरे/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2231361)
अभ्यागत कक्ष : 11