संरक्षण मंत्रालय
गोवा मेरीटाइम कॉन्क्लेव्ह 2026 मध्ये हिंद महासागर प्रदेशातील सागरी सुरक्षेच्या सामायिक दृष्टिकोनाला बळकटी
Posted On:
21 FEB 2026 6:57PM by PIB Mumbai
पणजी-गोवा, दिनांक : 21.02.2026
गोव्यातील नेव्हल वॉर कॉलेज येथे 21 फेब्रुवारी 2026 रोजी पाचवी गोवा मेरीटाईम कॉन्क्लेव्हचे (GMC-26) यशस्वीरित्या आयोजन झाले. त्यामध्ये हिंद महासागर क्षेत्रातील 15 देशांचे नौदल प्रमुख आणि सागरी क्षेत्रातील वरिष्ठ नेत्यांचा सहभाग होता. हिंद महासागर प्रदेशातील (IOR) सामायिक सागरी सुरक्षा आव्हानांचा सामना करण्यासाठी सहकार्यात्मक यंत्रणा मजबूत करण्याच्या प्रादेशिक भागीदारांच्या सामूहिक वचनबद्धतेचा या कॉन्क्लेव्हमध्ये पुनरुच्चार करण्यात आला.
"आयओआरमधील सामायिक सागरी सुरक्षा आव्हाने - बहुआयामी धोके कमी करण्यासाठी प्रगतीपथावर असलेले प्रयत्न (एलएसओई)" या प्रमुख विषयावर भारतीय नौदलाने आयोजित केलेल्या जीएमसी-26 द्वारे रचनात्मक सागरी संवादाचा आयोजक आणि या प्रदेशात सहकार्यात्मक सुरक्षा व्यवस्थेच्या उभारणीस चालना देणारा घटक म्हणून भारत सातत्याने भूमिका बजावत असल्याचे अधोरेखित झाले. पंतप्रधानांच्या 'महासागर - संपूर्ण प्रदेशाची सुरक्षा आणि वाढीमध्ये परस्पर आणि समग्र प्रगती' या दृष्टिकोनाला अनुसरून आयोजित केल्या गेलेल्या या परिषदेच्या रुपाने कृतीयोग्य परिणाम आणि सहकार्यात्मक अंमलबजावणीच्या चौकटी हा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून चर्चा करण्यासाठी रचनात्मक व्यासपीठ उपलब्ध करून दिले गेले.
माजी नौदल प्रमुख अॅडमिरल अरुण प्रकाश (निवृत्त) यांनी त्यांच्या बीजभाषणात, काळानुसार बदलत असलेल्या सागरी सुरक्षा वातावरणात रिअल-टाइम माहितीची देवाणघेवाण, संस्थात्मक समन्वय यंत्रणा आणि शाश्वत क्षमता विकास यासारख्या समन्वयित प्रादेशिक प्रतिसादांची आवश्यकता स्पष्ट केली. बेकायदेशीर, चोरटी आणि अनियंत्रित पद्धतीने (आययूयू) होणारी मासेमारी, तस्करी करणाऱ्यांचे नेटवर्क आणि आंतरराष्ट्रीय सागरी गुन्ह्यांसह इतर आव्हानांना तोंड देणे ही हिंद महासागर प्रदेशातील देशांनी आपली सामूहिक आणि सामायिक जबाबदारी मानण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.
माजी राष्ट्रीय सागरी सुरक्षा समन्वयक निवृत्त व्हाइस ॲडमिरल जी. अशोक कुमार यांच्या संयोजनाखाली झालेल्या पहिल्या सत्रात, आययूयू मासेमारी, अंमली पदार्थांची तस्करी आणि इतर बेकायदेशीर सागरी कारवायांना आळा घालण्यासाठी सागरी माहितीच्या रिअल-टाइम देवाणघेवाणीसाठी आणि कार्यकारी समन्वयासाठी यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर लक्ष केंद्रित केले गेले. या सत्रातील वक्ते भारतीय नौदलाचे रिअर ॲडमिरल टीव्हीएन प्रसन्ना आणि मालदीवचे कर्नल अमानुल्ला अहमद रशीद होते. सागरी क्षेत्र जागरूकता नेटवर्क मजबूत करणे, माहिती विनिमय प्रणालींची परस्पर कार्यक्षमता वाढवणे आणि विविध अधिकारक्षेत्रांमध्ये जलद आणि समन्वित प्रतिसाद सक्षम करण्यासाठी संरचित संस्थात्मक दुव्यांची आवश्यकता यासारख्या आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या मुद्द्यांवर वक्त्यांनी प्रकाश टाकला.
दुसऱ्या सत्रात हिंद महासागर क्षेत्रातील सागरी संस्थांमध्ये क्षमता बांधणी आणि कौशल्य वृद्धीसाठी सहयोगी मार्गांची तपासणी करण्यात आली. रिअर ॲडमिरल श्रीनिवास मद्दुला आणि नॅशनल मेरीटाईम फाउंडेशनचे वरिष्ठ फेलो कॅप्टन (आयएन) रणेंद्र एस सावन यांनी आपले विचार मांडले, तर माजी नौदल प्रमुख आणि नॅशनल मेरीटाईम फाउंडेशनचे अध्यक्ष आणि निवृत्त ॲडमिरल करमबीर सिंग यांनी सत्राचे सूत्रसंचालन केले. त्यानंतर झालेल्या चर्चेत दीर्घकालीन सागरी लवचिकता सुनिश्चित करण्यासाठी प्रादेशिक प्रशिक्षण संसाधनांचे एकत्रीकरण, व्यावसायिक देवाणघेवाण कार्यक्रमांचा विस्तार आणि संस्थात्मक चौकटी मजबूत करण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. हिंद महासागर क्षेत्रात शाश्वत सागरी स्थैर्य हे समन्वित क्षमता विकास आणि संरचित सहकार्यावर अवलंबून आहे, हे या सत्राने अधोरेखित केले.
परिषदेचा समारोप नौदल प्रमुख आणि प्रतिनिधी मंडळ प्रमुखांच्या भाषणाने झाला. आपल्या भाषणात त्यांनी गतिमान सागरी धोके कमी करण्यासाठी सहयोगी प्रयत्नांना गती देण्याबाबत आपला राष्ट्रीय दृष्टिकोन मांडला.
हिंदी महासागर क्षेत्रातील सामायिक सागरी सुरक्षेसाठी सर्व भागीदार राष्ट्रांनी दाखवलेल्या सहभागाबद्दल आणि त्यांच्या कायमस्वरूपी वचनबद्धतेबद्दल अॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी, सीएनएस यांनी त्यांचे मनापासून कौतुक केले. समयोचित सागरी धोक्यांच्या युगात ‘ महासागर ‘ दृष्टिकोनाचा अवलंब करून तंत्रज्ञान, अखंड माहितीची देवाणघेवाण आणि केंद्रित परिचालनाचा वापर करून आपण सामायिक जागरूकतेपासून समन्वित कृतीकडे वाटचाल केली पाहिजे यावर त्यांनी भर दिला.
प्रादेशिक सागरी भागीदारी मजबूत करणे, सहकार्य यंत्रणा संस्थात्मक करणे आणि सामूहिक क्षमता वाढवणे यावर या चर्चेत प्रभावी एकरूपता दिसून आली.
पाचव्या आवृत्तीत, गोवा सागरी परिषदेने हिंद महासागर क्षेत्रात समावेशक, सल्लागार आणि कृती-केंद्रित सागरी सहकार्याला चालना देण्याच्या भारताच्या वचनबद्धतेची पुष्टी केली. GMC-26 ने पुन्हा एकदा संरचित सहकार्य, रिअल-टाइम माहितीची देवाणघेवाण आणि समन्वित क्षमता विकास उपक्रमांद्वारे सागरी परिस्थिती सुरक्षित, संरक्षित आणि स्थिर राखण्याचा संकल्प केला.




***
शैलेश पाटील/नंदिनी मथुरे/मंजिरी गानू/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर
Follow us on social media:
@PIBPanaji
/PIBPanaji
/pibpanaji
pibgoa[at]gmail[dot]com
/PIBPanaji
/pibpanaji
(Release ID: 2231309)
अभ्यागत कक्ष : 35