नागपूर : 19 फेब्रुवारी 2026
ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स-अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था) नागपूरने बुधवार दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी "प्रयोगशाळेपासून जीवनापर्यंत: अनुभूती देणारे संशोधन" या संकल्पनेवर आधारित आपला पहिला संशोधन दिवस साजरा केला. हा कार्यक्रम, राष्ट्रीय आरोग्य प्राधान्यांशी सुसंगत एक सशक्त संशोधन संस्कृती विकसित करण्याच्या संस्थेच्या बांधिलकीचा एक महत्त्वाचा टप्पा ठरला.

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, नवी दिल्ली येथील माजी प्राध्यापक आणि न्यूरोलॉजी विभागाचे प्रमुख पद्मश्री पुरस्कार विजेते डॉ. कामेश्वर प्रसाद हे या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आपल्या बीजभाषणात, त्यांनी वैद्यकीय पुराव्यांच्या विकसित होत असलेल्या पद्धतींवर भाष्य करताना प्रयोगशाळेतील संशोधनापासून रुग्णसेवेपर्यंतच्या प्रवासावर भर दिला. एम्स नागपूरचे कार्यकारी संचालक डॉ. प्रशांत पी. जोशी यांनी आपल्या स्वागतपर भाषणात सांगितले की संशोधन केवळ प्रयोगशाळेपुरते मर्यादित न राहता ते रुग्णांना थेट लाभ देणाऱ्या उपचारांमध्ये रूपांतरीत झाले पाहिजे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था बिलासपूरचे अध्यक्ष सन्माननीय अतिथी डॉ. एन.के. अरोरा यांनी "संशोधन का?" या मूलभूत प्रश्नावर मार्गदर्शन करताना, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना भारतातील विशिष्ट आरोग्य समस्यांवर प्रणालीबद्ध संशोधन आणि नवोन्मेष करण्याचे आवाहन केले.

स्पर्धांसाठी विविध श्रेणींमध्ये 100 हून अधिक प्रवेशिका आल्या होत्या. 13-14 फेब्रुवारी 2026 रोजी सर्धेसाठी आलेल्या पोस्टर्सचे मूल्यांकन करण्यात आले आणि निवडक प्रवेशिका 16 फेब्रुवारी 2026 रोजी तज्ज्ञांच्या पॅनेलसमोर सादर करण्यात आल्या. डॉ. विजयगीता यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाचा समारोप झाला. त्यांनी संशोधन दिन यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांच्या सामूहिक प्रयत्नांचे कौतुक केले.
पुरस्कार वितरण सोहळ्यात संस्थेतील सर्व स्तरांवरील वैज्ञानिक संशोधनाचा गौरव करण्यात आला. सामुदायिक औषध (कम्युनिटी मेडिसिन) विभागाला सर्वोत्कृष्ट विभाग संशोधनासाठी पहिला पुरस्कार देण्यात आला, त्यानंतर शरीरक्रियाविज्ञान (फिजिओलॉजी) तसेच प्रसूतीशास्त्र (ऑबस्टेट्रीक्स) आणि स्त्रीरोगशास्त्र या विभागांनाही पुरस्कार प्रदान करण्यात आला.
वैयक्तिक गटात डॉ. जया प्रसाद त्रिपाठी (सामुदायिक औषध) यांनी सर्वोत्कृष्ट वैद्यकीय संशोधनासाठी पहिला पुरस्कार मिळवला. डॉ. अरविंद गांधी (सामुदायिक औषध) आणि डॉ. टी. एस. गुगाप्रिया (शरीरशास्त्र) यांनी सर्वोत्कृष्ट वैद्यकीय विद्याशाखा संशोधनासाठी पहिला पुरस्कार मिळवला.
डॉ. विनू विज (शरीरशास्त्र) यांना सर्वोत्कृष्ट प्रकाशनासाठी पहिला पुरस्कार मिळाला, त्यानंतर डॉ. शंतनू पांडे (सामुदायिक औषध), डॉ. सीतांशू बारिक (ऑर्थोपेडिक्स) आणि डॉ. विजय बिडकर (नाक, कान, घसा!) यांना पुरस्कार मिळाले. डॉ. अबिन वर्गीस यांना सर्वोत्कृष्ट नर्सिंग प्राध्यापक संशोधन पुरस्काराने, तर गिगिनी जॉर्ज यांना सर्वोत्कृष्ट नर्सिंग ट्यूटर संशोधन पुरस्कार मिळाला.
कार्यक्रमात भविष्यातील वैद्यकीय संशोधनाची झलक सर्वोत्तम पोस्टर सादरीकरण मध्ये दिसून आली. पदव्युत्तर गटात डॉ. अनुवा कपूर, डॉ. ग्लोरी घई आणि डॉ. ज्वालिन शिफानी मॉर्गन तसेच पदवीपूर्व गटात मीनाक्षी बिरासम, प्रिन्स आरएसआर आर्यन आणि सिमरन शर्मा यांना गौरवण्यात आले.
डॉ. प्रियंका यादव (सामुदायिक औषध), डॉ. सौम्या घोषाल (ट्रॉमा आणि आपत्कालीन), डॉ. स्मिता आर. सोर्टे (शरीरशास्त्र) आणि डॉ. शीतल मस्के (शरीरशास्त्र) यांची बेस्ट फंडेड कन्सेप्टस अंतर्गत दखल घेण्यात आली.
सोनाली काकडे/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर