संरक्षण मंत्रालय
गोवा सागरी परिषद 2026 हिंद महासागर क्षेत्रातील 14 देशांच्या प्रतिनिधींना एकत्र आणून प्रादेशिक सागरी सुरक्षा सहकार्य मजबूत करेल
Posted On:
18 FEB 2026 6:16PM by PIB Mumbai
गोवा, 18 फेब्रुवारी 2026
गोव्यातील नौदल युद्ध महाविद्यालयात 21 फेब्रुवारी 2026 रोजी होणाऱ्या पाचव्या गोवा सागरी परिषदेत (जीएमसी-26) हिंद महासागर क्षेत्रातील 14 देशांचे नौदल प्रमुख आणि वरीष्ठ प्रतिनिधी सागरी सुरक्षेशी संबंधित आव्हाने आणि प्रादेशिक सहकार्य यंत्रणेचे बळकटीकरण याविषयी विचारमंथन करणार आहेत.
‘हिंद महासागर क्षेत्रातील समान सागरी सुरक्षा आव्हाने – वेगाने वाढणारे धोके कमी करण्यासाठीच्या प्रयत्नांची दिशा’ ही यावर्षीच्या परिषदेची संकल्पना आहे. सागरी सुरक्षेला असलेल्या नवनव्या धोक्यांचा एकत्रितपणे सामना करण्याची वाढती गरज यातून प्रतिबिंबित होते.

गोव्यातील नौदल युद्ध महाविद्यालयाचे कमांडंट रिअर ऍडमिरल अर्जुन देव नायर आज, 18 फेब्रुवारी रोजी वार्ताहरांशी बोलताना म्हणाले की जीएमसी-26 परिषद पहिल्यांदाच गोव्यातील नौदल युद्ध महाविद्यालयाच्या चोला भवन या नवीन शैक्षणिक संकुलात होत आहे. “परिषदेच्या स्थळाद्वारे सागरी सुरक्षेशी संबंधित विद्वत्तापूर्ण व संस्थात्मक चौकटीतील चर्चेचे महत्त्व अधोरेखित होत आहे. ही परिषद भारताच्या सागरी वारशाचे आणि लष्करी शिक्षणाला व्यावसायिक स्वरुप देण्याची तसेच प्रादेशिक सागरी संबंधांना महत्त्व देण्याची वचनबद्धता यांचे प्रतीक आहे,” असे ते म्हणाले.
“गेल्या काही वर्षांमध्ये परिषदेत चर्चांच्या पलिकडे जाऊन सहकार्याची व्यवहार्य यंत्रणा, माहितीचे आदानप्रदान आणि सर्वांच्या सागरी आव्हानांचा एकत्रितपणे सामना करण्यासाठी क्षमता बांधणी यावर भर दिला जात आहे. हिंद महासागर क्षेत्रातील वाढत्या सागरी सुरक्षा धोक्यांच्या संदर्भात जीएमसी-26 परिषदेला विशेष महत्त्व आहे. आर्थिक सुरक्षा, पर्यावरणीय समतोल आणि क्षेत्रिय स्थैर्य यांना बाधा आणणारी बेकायदेशीर, अनोंदणीकृत व अनियमित मासेमारी, अमली पदार्थांची तस्करी आणि सागरी क्षेत्रातील इतर अवैध कृत्ये यांचा सागरी सुरक्षा धोक्यांमध्ये समावेश आहे,” असे रिअर ऍडमिरलनी सांगितले. या समस्यांबाबत सर्व संबंधितांमध्ये जागरुकता निर्माण करणे आणि त्यांचा एकेकट्याने सामना करण्याऐवजी एकत्रित प्रयत्नांना प्रोत्साहन देणे हा परिषदेचा उद्देश असल्याचे ते म्हणाले.

ही परिषद महासागर या पंतप्रधानांच्या संकल्पनेशी निगडीत आहे. महासागर म्हणजे हिंद महासागर क्षेत्रातील सुरक्षा व विकासासाठी परस्परपूरक व सर्वंकष प्रगती. यामध्ये समुद्र म्हणजे शांतता, विकास व भागीदारी यासाठी समान क्षेत्र या संकल्पनेला महत्त्व आहे.
2017 मध्ये हिंद महासागर क्षेत्रातील 10 देशांच्या सहभागातून गोवा सागरी परिषदेला सुरुवात झाली. क्षेत्रिय सागरी आव्हानांवर मात ही त्यावेळच्या परिषदेची संकल्पना होती. त्यानंतरच्या काळात समुद्रविषयक चर्चा व क्षमता बांधणी यासाठीच्या विश्वासार्ह द्वैवार्षिक परिषदेत याचे रुपांतर झाले.
* * *
पीआयबी मुंबई | सुषमा काणे/सुरेखा जोशी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBPanaji
/PIBPanaji
/pib_goa
pibgoa[at]gmail[dot]com
/PIBGoa
(Release ID: 2229757)
अभ्यागत कक्ष : 79