भूविज्ञान मंत्रालय
आरोग्यसेवेच्या आघाडीवर प्रगती: भारताद्वारे एम्स नवी दिल्ली आणि अंटार्क्टिकावरील मैत्री संशोधन केंद्राला परस्परांशी टेली-रोबोटिक अल्ट्रासाऊंडद्वारे जोडण्याचे प्रात्यक्षिक
Posted On:
16 FEB 2026 9:46PM by PIB Mumbai
गोवा, 16 फेब्रुवारी 2026
टेली-रोबोटिक अल्ट्रासोनोग्राफी (TRUS) प्रणालीद्वारे एम्स नवी दिल्लीला थेट अंटार्क्टिकावरील भारताच्या मैत्री संशोधन केंद्राशी यशस्वीरित्या जोडण्याचे प्रात्यक्षिक दाखवून दूरवर आरोग्यसेवा पोहोचवण्याच्या प्रयत्नांमध्ये महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे. या प्रात्यक्षिकाद्वारे एम्स नवी दिल्लीच्या तज्ञ चिकित्सकांनी दूरस्थपणे घेतलेल्या रिअल-टाइम अल्ट्रासाऊंड प्रतिमा मैत्री केंद्रावर पोहोचवणे शक्य झाले, ही बाब अत्यंत तीव्र वातावरणात दूरस्थ आरोग्यसेवेतील ऐतिहासिक पाऊल ठरले आहे.
भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागर संशोधन केंद्राने (एनसीपीओआर), एम्स नवी दिल्ली, आयआयटी दिल्ली समवेत आयहब फाउंडेशन फॉर कोबोटिक्स (आयएचएफसी) आणि राजीव गांधी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या सहकार्याने हा उपक्रम हाती घेतला होता.
या कामगिरीबद्दल माहिती देताना, एनसीपीओआरचे संचालक डॉ. थंबन मेलोथ म्हणाले की, अंटार्क्टिका संशोधन केंद्रावर अशा टेलीरोबोटिक निदान प्रणालीची केली गेलेली ही जगभरातील पहिलीच ज्ञात अंमलबजावणी आहे. "अत्यंत कडाक्याची थंडी, दीर्घकाळ जगापासून अलग राहणे आणि मर्यादित ऑन-साइट वैद्यकीय पायाभूत सुविधांमुळे अंटार्क्टिकावर आरोग्यसेवा पोहोचविणे हे अत्यंत निराळे आव्हान आहे. आपत्कालीन परिस्थितीत, स्थानिक व्यवस्थापन किंवा सुटकेचा निर्णय घेण्यासाठी वेळीच इमेजिंग करणे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट ठरते. टेलीरोबोटिक अल्ट्रासोनोग्राफी उपक्रमाने ही उणीव भरून काढली. एम्स नवी दिल्लीच्या दूरस्थ नियंत्रणासह अंटार्क्टिकसारख्या वातावरणात मैत्री स्थानकावर उच्च-दर्जाची, रिअल-टाइम अल्ट्रासाऊंड तपासणी करण्याच्या व्यवहार्य असल्याचे थेट प्रात्यक्षिकामुळे सिद्ध झाले," असे ते म्हणाले.

कोविड-19 च्या महासाथीच्या काळात एम्स नवी दिल्लीमध्ये या तंत्रज्ञानाचा क्लिनिकल पाया घातला गेला, तिथे सुरक्षित आणि अचूक रिमोट इमेजिंगमध्ये टेली-रोबोटिक अल्ट्रासाऊंड तंत्र अग्रेसर ठरले. या कौशल्याच्या आधारे, भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या राष्ट्रीय आंतरविद्याशाखीय सायबर-फिजिकल सिस्टम्स (एनएम-आयसीपीएस) अंतर्गत तंत्रज्ञान नवोन्मेष केंद्र, आयएचएफसी द्वारे आयआयटी दिल्ली येथे या प्रणालीची अभियांत्रिकी रचना विकसित करण्यात आली.
आयआयटी दिल्लीतील संशोधकांनी आयएचएफसीच्या माध्यमातून टेलिऑपरेशन, नेटवर्किंग आणि नियंत्रण प्रणाली डिझाइन केल्या होत्या, त्यामुळे अंटार्क्टिकावर बँडविड्थच्या मर्यादा असतानाही विश्वासार्ह रिअल-टाइम कामगिरी शक्य झाली. मैत्री स्थानकावर एनसीपीओआर द्वारे प्रणाली बसविण्याची व्यवस्था करण्यात आली, त्यामुळे उपकरणे आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षित वाहतक, मजबूत संपर्क आणि मोहिमेच्या नियमांना धरून राहणे सुनिश्चित झाले.
राजीव गांधी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील पल्मोनोलॉजीचे क्लिनिकल प्रमुख डॉ. विकास डोगरा यांनी भारतीय अंटार्क्टिका कार्यक्रमाशी दशकाहून अधिक काळ असलेला त्यांचा संबंध आणि त्यातून त्यांना अत्यंत एकाकी अवस्थेतील क्लिनिकल आव्हानांच्या प्रत्यक्ष झालेल्या जाणीवेच्या आधारे अंटार्क्टिकावर टेली-रोबोटिक अल्ट्रासाऊंड कार्यान्वित करण्याची कल्पना मांडली होती.
"अंटार्क्टिक स्थितीत तांत्रिक व्यवहार्यतेची पडताळणी करणे, एम्स आणि मैत्री स्टेशनमधील अखंड रिअल-टाइम कनेक्टिव्हिटी प्रदर्शित करणे आणि ध्रुवीय मोहिमांमध्ये प्रगत टेलि-सक्षम वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या भविष्यातील एकात्मिकतेवर माहितीपूर्ण संवाद सुरू करणे हा या प्रात्यक्षिकाचा उद्देश होता," असे अंटार्क्टिक ऑपरेशन्सचे वैज्ञानिक आणि गट संचालक डॉ. शैलेंद्र सैनी यांनी सांगितले.
गेल्या अनेक दशकांपासून, एम्स नवी दिल्लीद्वारे सातत्याने वैद्यकीय कौशल्य, सल्ला सहाय्य आणि मोहिमेसाठी प्रशिक्षित डॉक्टर पुरविण्यासह एनसीपीओआरने भारतीय अंटार्क्टिक कार्यक्रमाद्वारे अंटार्क्टिकावर भारताचे वैज्ञानिक अस्तित्व कायम राखले आहे.
जर ऑपरेशनल शाश्वतता स्थापित झाल्यास, टीआरयुएस प्लॅटफॉर्म अंटार्क्टिक मोहिमांमध्ये वैद्यकीय निर्णय क्षमतेत लक्षणीय वाढ करू शकेल, त्यामुळे भारतातील तज्ञ चिकित्सकांना रिअल-टाइम अल्ट्रासाऊंड तपासणी करणे, पुराव्यांच्या आधारे निर्वासन निर्णयांना पाठिंबा देणे आणि प्रत्यक्ष साइटवर क्लिनिकल आत्मविश्वास वाढवणे शक्य होईल.
* * *
पीआयबी पणजी | अंबादास यादव/मंजिरी गानू/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2228917)
अभ्यागत कक्ष : 15