खते विभाग
खत क्षेत्रात भारताची आत्मनिर्भरतेकडे मोठी झेप : जानेवारी महिन्यात स्फुरद आणि पालाशयुक्त (P&K) खतांचे 15.76 लाख मेट्रिक टन इतके विक्रमी उत्पादन
धोरणात्मक आंतरराष्ट्रीय करार आणि सुधारणांमुळे देशांतर्गत विक्रमी उत्पादनाला वेग
सरकारच्या उद्योगस्नेही भूमिकेमुळे आणि वेेळेत अनुदान दिले गेल्यामुळे मजबूत कृषी पुरवठा साखळीची सुनिश्चिती
Posted On:
06 FEB 2026 3:18PM by PIB Mumbai
भारताच्या कृषी क्षेत्राने एक महत्त्वाचा यशदायी टप्पा गाठला. जानेवारी 2026 मध्ये स्फुरद आणि पालाशयुक्त (P&K) खतांचे—विशेषतः डाय-अमोनियम फॉस्फेट (DAP) आणि नत्र-स्फुरद-पालाशयुक्त (NPKs: Nitrogen - Phosphorus - Potassium) मिश्र खतांचे देशांतर्गत उत्पादन 15.76 लाख मेट्रिक टन या विक्रमी पातळीवर पोहोचले आहे. देशातील हे आतापर्यंतचे सर्वाधिक मासिक उत्पादन आहे. हे यश खत अर्थव्यवस्थेत भारत वेगाने आत्मनिर्भरतेच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे निदर्शक ठरले आहे.
केंद्र सरकारची दूरदृष्टी आणि उद्योगस्नेही धोरणांमुळे हे ऐतिसासिक यश मिळवता आले असल्याचे रसायन आणि खते मंत्रालयाच्या अखत्यारीतील खत विभागाने म्हटले आहे. धोरणात्मक संरचनात्मक सुधारणा आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देणाऱ्या उपाययोजनांमुळे खाजगी आणि सार्वजनिक अशा दोन्ही क्षेत्रांतील उत्पादन क्षमतेत मोठी वाढ झाली असल्याचेही विभागाने नमूद केले आहे.
धोरणात्मक जागतिक संबंध आणि देशांतर्गत स्थैर्य
जागतिक बाजारपेठेतील अस्थिरता आणि व्यावसायिक वाहतुकीच्या अडथळ्यांपासून देशांतर्गत उत्पादनाला सुरक्षित ठेवण्यासाठी सरकारने साधनसंपत्तीने समृद्ध असलेल्या देशांशी दीर्घकालीन पुरवठा करार केले आहेत. या आंतरराष्ट्रीय करारांमुळे कच्च्या मालाचा अविरत ओघ सुरु राहील याची सुनिश्चिती झाली असून, यामुळे देशांतर्गत खत निर्मिती संस्थांना पूर्ण क्षमतेने काम करणे शक्य झाले आहे.
पोषक तत्त्व आधारित अनुदानाच्या माध्यमातून (NBS) आर्थिक पाठबळ
पोषक तत्त्व आधारित अनुदान (NBS - Nutrient Based Subsidy) धोरणाची प्रभावी अंमलबजावणी हा, उत्पादनातील या वाढीमागाली महत्वाचा कारक घटक ठरला आहे. अनुदानाची देयके वेळेवर मिळाल्यामुळे उत्पादन कंपन्यांना आवश्यक आर्थिक स्थैर्य लाभले आहे. या आर्थिक शिस्तीमुळे उत्पादकांना खर्चावर प्रभावी नियंत्रण ठेवता येत असून, जुन्या प्रकल्पांचा विस्तार करण्यासाठी तसेच नवीन प्रकल्प उभारण्यासाठीही चालना मिळाली आहे.
उत्पादनातील या वाढ शेतकऱ्यांना वेळेवर खते उपलब्ध करून देणारी आणि त्याद्वारे भारताच्या अन्न सुरक्षेला बळकटी देणारी ठरली आहे. यासोबतच देशाला खत क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्याच्या प्रवासातील हा एक मैलाचा दगड ठरला आहे.
***
शैलेश पाटील/तुषार पवार/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2224680)
अभ्यागत कक्ष : 8