सांस्कृतिक मंत्रालय
नेहरू विज्ञान केंद्रात ‘सक्रिय सर्जनशील कल्पना व नवोन्मेष’ ( CiiA-5) या नवोन्मेष प्रदर्शनाचे आयोजन
Posted On:
04 FEB 2026 3:13PM by PIB Mumbai
मुंबई, 4 फेब्रुवारी 2026
मुंबईतील नेहरू विज्ञान केंद्रात दि 5 ते 7 फेब्रुवारी 2026 दरम्यान ‘सक्रिय सर्जनशील कल्पना व नवोन्मेष’ ( CiiA-5) या नवोन्मेष प्रदर्शन व पुरस्काराच्या पाचव्या आवृत्तीचे आयोजन केले जाणार आहे. भारतातील प्रतिभाशाली विद्यार्थी नवोन्मेषक व उदयोन्मुख स्टार्टअप्स त्यात सहभागी होणार आहेत. गेल्या काही वर्षांत, तळागाळातील आणि संस्थात्मक नवोपक्रमांना प्रोत्साहन देऊन तसेच त्यांच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार करून देशातील नवोपक्रम परिसंस्था मजबूत करणारे महत्वाचे राष्ट्रीय व्यासपीठ म्हणून CiiA उदयास आले आहे.

CiiA-5 नवोपक्रम प्रदर्शनाचे औपचारिक उद्घाटन गुरुवार, 5 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता नेहरू विज्ञान केंद्र, एडविन मोझेस मार्ग , वरळी, मुंबई येथे प्रमुख पाहुण्या, प्रतिष्ठित शास्त्रज्ञ तसेच वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) व्यवसाय विकास गटाच्या प्रमुख डॉ. शैलजा डोनेमपुडी यांच्या हस्ते होईल.
प्रदर्शनाच्या या महत्वाच्या आवृत्तीत पॅनेलवर समाविष्ट असलेल्या देशभरातील 150 हून अधिक संस्थांकडून प्राप्त झालेल्या 656 अर्जांमधून निवडलेल्या सर्वोत्तम 100 नवोपक्रम प्रकल्पांचा समावेश आहे. निवडलेल्या नवोपक्रमांमध्ये अभियांत्रिकी, औषधनिर्माण विज्ञान, जैव-विज्ञान, रासायनिक तंत्रज्ञान आणि स्टार्ट-अपनी शोधलेल्या तंत्रज्ञानाधारित उपायांसह विविध उच्च-प्रभावशाली क्षेत्रांचा समावेश आहे. भारताच्या नवोपक्रम प्रतिभेचा वाढता आवाका, गुणवत्ता आणि प्रासंगिकता यातून नक्कीच प्रतिबिंबित होईल .
उद्योग व शैक्षणिक क्षेत्रांना एकत्र आणणारा चैतन्यपूर्ण अभिसरण मंच म्हणून CiiA-5 काम करते. यामध्ये MSMEs, FMCG कंपन्या, उद्योग तज्ञ, सल्लागार, मनुष्यबळ विकास विभागातील तसेच इतर निर्णयक्षम अधिकाऱ्यांना एकत्र आणण्याचे कार्य केले जाते. उद्योगांमधील सहयोग, पथदर्शी प्रकल्प, तंत्रज्ञान प्रमाणीकरण आणि नवोपक्रमांचे वास्तविक जगात उपयोजन या उपक्रमामुळे सुलभ होत आहे. एका मजबूत संस्थात्मक नवोपक्रम संरचनेत उद्योगांना सहभागी करून अनेक विशिष्ट समस्यांचे निराकरण करण्यास या उपक्रमाची मदत होत आहे .
हा कार्यक्रम नेहरू विज्ञान केंद्र, संस्कृती मंत्रालय, शिक्षण मंत्रालय, एआयसीटीई या भारत सरकारच्या विविध संस्था तसेच रोटरी क्लब ऑफ बॉम्बे वरळी आणि इतर भागीदार संस्थांच्या सहकार्याने आयोजित केला जात आहे. मुंबईतील नेहरू विज्ञान केंद्रात आयोजित केलेले हे प्रदर्शन आत्मनिर्भर भारत आणि विकसित भारताच्या राष्ट्रीय दृष्टिकोनाशी सुसंगत आहे.
सीआयआयए-5 नवोपक्रम प्रदर्शन 5 ते 7 फेब्रुवारी 2026 पर्यंत सकाळी 10 ते संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत जनतेसाठी खुले राहील. विद्यार्थी, शिक्षक आणि इच्छुक अभ्यागतांसाठी विशेष परवानगीने मोफत प्रवेश दिला जाईल.
नेहा कुलकर्णी /उमा रायकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2223080)
अभ्यागत कक्ष : 61