अणुऊर्जा विभाग
azadi ka amrit mahotsav

स्तनाच्या कर्करोगावरील उपचारांना बळकटी देण्यासाठी टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये टोमोसिंथेसिस आणि कृत्रिम बुद्धिमत्तेने सुसज्ज, प्रगत डिजिटल मॅमोग्राफी मशीन

Posted On: 27 JAN 2026 8:19PM by PIB Mumbai

मुंबई, 27 जानेवारी 2026

 

मुंबईतील टाटा मेमोरियल रुग्णालयाने सोमवार, 26 जानेवारी 2026 रोजी होमी भाभा ब्लॉक येथे टोमोसिंथेसिस आणि कृत्रिम बुद्धिमत्तेने (एआय) सुसज्ज असलेल्या अत्याधुनिक डिजिटल मॅमोग्राफी यंत्राचे उद्घाटन केले. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त मुख्य सचिव आणि मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे (आयएएस) यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता, टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे संचालक डॉ. सी. एस. प्रमेश आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे रेडिओडायग्नोसिस विभागाचे प्रमुख डॉ. सुयश कुलकर्णी, संस्थेतील वरिष्ठ प्राध्यापक आणि कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना, अश्विनी भिडे यांनी सार्वजनिक आरोग्य सेवा बळकट करण्यासाठीच्या टाटा मेमोरियल रुग्णालयाच्या अविरत प्रयत्नांची प्रशंसा केली.

सुलभ आणि उच्च-गुणवत्तेच्या कर्करोग उपचारांच्या महत्वावर भर देत, त्या म्हणाल्या की, नव्याने उद्घाटन झालेले उपकरण रुग्णांच्या सेवेसाठी आणि व्यापक सार्वजनिक हितासाठी समर्पित आहे.

टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता यांनी भारतातील महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाच्या वाढत्या प्रकरणांवर प्रकाश टाकला, आणि नियमित तपासणीद्वारे लवकर निदान झाले, तर उपचारांचे परिणाम आणि दीर्घकाळ जगण्याची शक्यता, यात  लक्षणीय सुधारणा दिसून येते, यावर भर दिला. नव्याने सुरू करण्यात आलेल्या डिजिटल मॅमोग्राफी प्रणालीमुळे स्तनाच्या कर्करोगाचे लवकर आणि अचूक निदान करण्याची रुग्णालयाची क्षमता आणखी वाढेल, असे त्यांनी नमूद केले.

टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे संचालक डॉ. सी. एस. प्रमेश म्हणाले की, या प्रगत इमेजिंग उपकरणाच्या सहाय्याने रुग्णालयाच्या स्तनाच्या कर्करोगाची तपासणी आणि निदान, सेवांना लक्षणीयरीत्या बळकटी मिळेल, यामुळे लवकर निदान आणि उपचारांचे परिणाम, यात सुधारणा होईल. कर्करोगाचा प्रतिबंध, लवकर निदान आणि सर्वसमावेशक रुग्ण सेवा यासाठी टाटा मेमोरियल रुग्णालयाच्या वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला.

टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या रेडिओडायग्नोसिस विभागाचे प्रमुख डॉ. सुयश कुलकर्णी यांनी स्पष्ट केले की, ही प्रगत प्रणाली उच्च-रिझोल्यूशन इमेजिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांचे संयोजन करते, त्यामुळे डॉक्टरांना अधिक अचूकता आणि कार्यक्षमतेने कर्करोगाचा  संभाव्य भाग ओळखायला सहाय्य होते. ते पुढे म्हणाले की हे तंत्रज्ञान स्तनाच्या दाट ऊतींमधील कर्करोगाच्या पेशी शोधण्यासाठी उपयुक्त आहे. यामुळे अतिरिक्त इमेजिंगची गरज कमी होते, परिणामी जलद निदान आणि वेळेवर उपचार करणे शक्य होते.

उपस्थितांना संबोधित करताना, संस्थेतील विविध विभाग प्रमुखांनी प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञानाचा अवलंब आणि उच्च दर्जाची, रुग्ण-केंद्रित कर्करोग सेवा प्रदान करून महिलांसाठीच्या आरोग्य सेवेत सुधारणा करण्याच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.

टाटा मेमोरियल हॉस्पिटल, ही भारतातील कर्करोग निदान, उपचार, संशोधन आणि शिक्षण, देणारी अग्रणी संस्था असून, देशभरातील आणि परदेशातील रुग्णांना सेवा देत आहे.

 

* * *

पीआयबी मुंबई | निलिमा चितळे/राजश्री आगाशे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2219353) अभ्यागत कक्ष : 45
Read this releasein: English