अणुऊर्जा विभाग
टीआयएफआरमध्ये आयोजित दुसऱ्या डीएई परिषदेत भारताच्या अणुविज्ञान आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानातील प्रगतीचे दर्शन
Posted On:
27 JAN 2026 8:07PM by PIB Mumbai
मुंबई, 27 जानेवारी 2026
टीआयएफआर अर्थात टाटा मूलभूत संशोधन संस्थेने मुंबईत 14 ते 18 जानेवारी 2026 या कालावधीत दुसऱ्या डीएई परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेत डीएईची (अणुऊर्जा विभाग) विविध युनिट्स, संस्था आणि अनुदान-सहाय्यित संस्थांमधील शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, संशोधक आणि तज्ज्ञ यांच्यासह सुमारे 1,000 प्रतिनिधी सहभागी झाले होते. 'अणुऊर्जेच्या नव्या क्षितिजांच्या माध्यमातून शाश्वत भविष्यासाठी नवोन्मेषी उपायांची निर्मिती करणे', ही डीएईसी 2026 परिषदेची संकल्पना होती.

काळजीपूर्वक आखलेला कार्यक्रम आणि अंमलबजावणीद्वारे, डीएईसी 2026 ने अणुऊर्जा विभागाच्या संशोधन आणि विकास, औद्योगिक आणि शैक्षणिक संस्थांमधील अनुभवी शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांना, तसेच आघाडीच्या तरुण योगदात्यांना एकाच संवादात्मक मंचावर एकत्र आणले.
टीआयएफआरचे संचालक प्रोफेसर जयराम एन. चेंगळूर यांनी स्वागतपर भाषण केले. त्यांनी अत्याधुनिक आण्विक तंत्रज्ञान सक्षम करण्यासाठी संशोधन आणि विकासातील आंतरविद्याशाखीय दृष्टिकोनाच्या महत्त्वावर प्रकाश टाकला.

आपल्या उद्घाटनपर भाषणात, भाभा अणुसंशोधन केंद्राचे संचालक विवेक भसीन यांनी अणुविज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील भारताच्या सामर्थ्यावर जोर दिला आणि अणुऊर्जा अभियानाला आधार देणारा मूलभूत स्तंभ म्हणून प्रगत अणुभट्टी तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक संशोधनावर केंद्रित असलेल्या एका धोरणात्मक आराखड्याची रूपरेषा मांडली.
डीएईसी2026 मध्ये ऊर्जा सुरक्षा आणि पुढील पिढीच्या अणुभट्ट्या, आयसोटोप निर्मिती, क्वांटम तंत्रज्ञान, फ्युजन संशोधन, लेझर-चालित पार्टिकल एक्सलेटर आणि अणुविज्ञानाची आरोग्यसेवा क्षेत्रातील उपयोजने यांसारख्या विविध विषयांवर विचारमंथन करण्यात आले.

अणुऊर्जा आयोगाचे सदस्य डॉ. अनिल काकोडकर यांनी आपले विचार मांडले. तंत्रज्ञानविषयक आघाडी प्रदीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी मूलभूत विज्ञान, मोठ्या विज्ञान सुविधा आणि मनुष्यबळ विकासातील सातत्यपूर्ण गुंतवणूक आवश्यक असते, यावर त्यांनी भर दिला.
अणुविज्ञान आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानातील प्रगती समाजाच्या गरजा प्रभावीपणे पूर्ण करेल आणि सर्वसमावेशक वाढीस हातभार लावेल, हे सुनिश्चित करण्यासाठी संस्थात्मक समन्वय आणि उद्देशपूर्ण संपर्क वाढवणे, महत्त्वपूर्ण आहे, यावर अणुऊर्जा आयोगाचे सदस्य डॉ. रवी भूषण ग्रोव्हर यांनी भर दिला.

डीएईसी2026 मध्ये विविध मंचांवर बोलताना, अणुऊर्जा विभागाचे सचिव आणि अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. अजित कुमार मोहंती यांनी अणुविज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भारताच्या ऊर्जा सुरक्षा, आरोग्यसेवा आणि शाश्वतता या क्षेत्रांतील दीर्घकालीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी एकात्मिक वैज्ञानिक प्रयत्नांच्या महत्त्वावर भर दिला. विद्यार्थी, तरुण संशोधक आणि व्यावसायिक यांना स्वदेशी संशोधन व विकास आणि उद्योगातील उदयोन्मुख प्रवाहांविषयी निरंतर अवगत ठेवण्याची आणि त्यांना सातत्याने सहभागी करून घेण्याची गरज मोहंती यांनी अधोरेखित केली.

या परिषदेत हायड्रोजन उत्पादन आणि साठवणूक तंत्रज्ञान तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग यावर तज्ज्ञमंडळ चर्चा आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये भारताच्या स्वच्छ ऊर्जा संक्रमण, डिजिटल परिवर्तन आणि विकसित भारतासाठी आवश्यक असलेल्या उदयोन्मुख उपायांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. या नवोन्मेषी उपायांनी अणुऊर्जा विभागाच्या तंत्रज्ञानाचा सामाजिक आणि औद्योगिक प्रभाव अधोरेखित केला. यातून आत्मनिर्भर भारताला बळकटी देणाऱ्या तंत्रज्ञानाची महत्त्वपूर्ण भूमिका पुन्हा एकदा समोर आली.

* * *
पीआयबी मुंबई | निलिमा चितळे/सोनाली काकडे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2219342)
अभ्यागत कक्ष : 41