वस्त्रोद्योग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एनआयएफटी आंतरराष्ट्रीय परिषद 2026 चा समारोप; समावेशक डिझाइन, हस्तकला वारसा आणि जागतिक सहकार्यावर भर

प्रविष्टि तिथि: 23 JAN 2026 9:33PM by PIB Mumbai


नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (एनआयएफटी) या संस्थेच्या 'समावेशक भविष्यासाठी डिझाइन' या संकल्पनेवर आधारित एनआयएफटी आंतरराष्ट्रीय परिषद 2026 च्या दुसऱ्या दिवसाचा समारोप शुक्रवार, 23 जानेवारी 2026 रोजी मुंबई कॅम्पसमध्ये यशस्वीरित्या केला. दुसऱ्या दिवशी मुख्य भाषणे, तांत्रिक सत्रे, आमंत्रित शोधनिबंध आणि एका महत्त्वपूर्ण पॅनल चर्चेच्या विचारपूर्वक तयार केलेल्या कार्यक्रमाद्वारे समानता, सुलभता, उपयुक्तता आणि समावेशक नवोन्मेष या विषयावरील महत्त्वाच्या संवादांना अधिक गहनता देण्यात आली.

दोन दिवसीय परिषदेचा एक भाग म्हणून, भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या विकास आयुक्त (हस्तकला) कार्यालयाने, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (एनआयएफटी) च्या सहकार्याने, एक हस्तकला प्रात्यक्षिक तसेच जागरूकता कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात देशभरातील विविध हस्तकला समूहांमधील कुशल कारागिरांनी थेट प्रात्यक्षिके सादर केली. या प्रात्यक्षिकात भारताचा समृद्ध हस्तकला वारसा, स्थानिक ज्ञान परंपरा आणि शाश्वत पद्धतींचे प्रदर्शन करण्यात आले.
या उपक्रमात भारतातील विविध हस्तकला समूहांमधील 32 हातमाग आणि हस्तकला कारागिरांनी सहभाग घेतला. यात कुशल विणकर आणि कुशल कारागिरांना सहभागी होण्याची संधी मिळाली. गोंड चित्रकला, पैठणी साडी विणकाम, इकत वस्त्रे, महेश्वरी वस्त्रे, ॲप्लिक आणि कच्छ बांधणी यांसारख्या हस्तकलांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कारागिरांनी आपली कौशल्ये सादर केली. यामधून समावेशक भविष्य घडवण्यात स्थानिक कारागिरांचे महत्त्व, सांस्कृतिक सातत्य आणि कारागीर-नेतृत्व असलेल्या शाश्वत डिझाइनचे महत्त्व अधोरेखित झाले.

आपल्या मुख्य भाषणात, एनआयएफटीच्या अधिष्ठाता, प्रा. (डॉ.) नूपुर आनंद यांनी सुलभतेला एक मुख्य डिझाइन तत्त्व म्हणून रुजवण्याची गरज अधोरेखित केली. अपंगत्वाकडे संधी म्हणून पाहत, इंद्रिय संवेदनशील आणि वयोवृद्धांसाठी अनुकूल नवोन्मेषाला चालना द्यावी असे आवाहन त्यांनी केले. समावेशक भविष्य घडवण्यासाठी डिझाइनमधील प्रतिष्ठा, नैतिक जबाबदारी आणि मानवकेंद्रित शिक्षणाचे महत्त्व यावर त्यांनी भर दिला.
दिवसाची सुरुवात सिंथेग्रेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मँचेस्टर मेट्रोपॉलिटन विद्यापीठाचे जागतिक प्रमुख जलज होरा यांच्या मुख्य भाषणाने झाली. मानवी सर्जनशीलता वाढवण्यासाठी फॅशनमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचे अर्थपूर्ण समावेशन करण्याच्या गरजेवर त्यांनी प्रकाश टाकला. यानंतर, एनसीपीईडीपीचे कार्यकारी संचालक अरमान अली यांचे भाषण झाले. अरमान अली यांनी सार्वत्रिक डिझाइनला एक मूलभूत तत्त्व म्हणून महत्त्व दिले आणि विशेषतः डिजिटल आणि आर्थिक प्रवेशाच्या बाबतीत, दिव्यांग व्यक्तींच्या वंचनेमुळे होणाऱ्या सामाजिक आणि आर्थिक परिणामांकडे लक्ष वेधले. एनआयएफटीच्या परिषदेच्या अध्यक्षा प्रा. डॉ. रूपा अग्रवाल यांच्या प्रेरणादायी समारोपीय सत्राने परिषदेची सांगता झाली, ज्यामुळे दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाची यशस्वी समाप्ती झाली.

***

अंबादास यादव/श्रद्धा मुखेडकर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2218029) आगंतुक पटल : 6
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , हिन्दी