सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
‘अर्ली इंटरव्हेन्शन’मधील प्रगतीवर आंतरराष्ट्रीय परिषद : दिव्यांग सक्षमीकरणासाठी सरकारची वचनबद्धता अधोरेखित
दिव्यांगांच्या सक्षमीकरणाबाबत जागरूकता वाढवण्यासाठी एनआयईपीआयडी, सिकंदराबाद आणि एवायजेएनआयएसएचडी, मुंबई यांचा संयुक्त पुढाकार
Posted On:
23 JAN 2026 5:26PM by PIB Mumbai
दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेली राष्ट्रीय संस्था – नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर द एम्पॉवरमेंट ऑफ पर्सन्स विथ इंटेलेक्चुअल डिसॅबिलिटीज (दिव्यांगजन) (एनआयईपीआयडी), सिकंदराबाद आणि अली यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हिअरिंग डिसॅबिलिटीज (दिव्यांगजन) (एवायजेएनआयएसएचडी), मुंबई यांनी दिव्यांग व्यक्ती सक्षमीकरण विभागाच्या अधिपत्याखाली “अर्ली इंटरव्हेन्शनमधील अलीकडील प्रगती : दिव्यांग दृष्टिकोन” या विषयावर दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले.

ही परिषद युनिसेफ इंडिया आणि टाटा पॉवर यांच्या संयुक्त सहकार्याने 22 आणि 23 जानेवारी 2026 रोजी आयआयटी मुंबईच्याच्या परिसरात आयोजित करण्यात आली होती.
दिव्यांग व्यक्ती सक्षमीकरण विभागाचे संयुक्त सचिव राजीव शर्मा यांनी परिषदेचे मुख्य भाषण केले. त्यांनी लवकर ओळख (अर्ली आयडेंटिफिकेशन) आणि लवकर हस्तक्षेप (अर्ली इंटरव्हेन्शन) यांचे महत्त्व स्पष्ट करत देशभरात अर्ली इंटरव्हेन्शन सेवा बळकट करण्यासाठी विभागाने राबवलेल्या उपाययोजना आणि उपक्रमांची माहिती दिली.
माजी अतिरिक्त महासंचालक (आरोग्य सेवा) आणि एलएचएमसीच्या माजी प्राचार्या तसेच ‘प्रोफेसर ऑफ एक्सलन्स’ डॉक्टर सुनीता मंडल यांनी उद्घाटनपर भाषण केले. महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांनी महाराष्ट्रात अर्ली इंटरव्हेन्शन आणि लवकर ओळखीसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

आयआयटी बॉम्बेचे उपसंचालक (एटीआर) प्रा. (डॉ.) मिलिंद अत्रे यांनी अर्ली इंटरव्हेन्शनमध्ये कृत्रिम प्रज्ञा आणि तंत्रज्ञानाच्या भूमिकेवर प्रकाश टाकला.
युनिसेफ महाराष्ट्र फील्ड ऑफिसचे प्रमुख संजय सिंह यांनी देशभरात तळागाळापर्यंत अर्ली इंटरव्हेन्शन सेवा अधिक मजबूत करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
एनआयईपीआयडीचे संचालक डॉ. बी. व्ही. राम कुमार यांनी स्वागतपर भाषण केले आणि देशभरात अर्ली इंटरव्हेन्शन सेवा देण्यात एनआयईपीआयडीच्या भूमिकेवर भर दिला. अमेरिका, युनायटेड किंगडम, कॅनडा, श्रीलंका, मालदीव आणि नेपाळ येथील तज्ज्ञ वक्त्यांच्या सहभागाचे त्यांनी कौतुक केले.

एनआयईपीआयडीने महाराष्ट्र शासनाच्या आस्था,सेंटर ऑफ एक्सलन्स आणि एसओएल्स एआरसी यांच्याशी सामंजस्य करार (एमओयू) केले आहेत. या भागीदारीमुळे दिव्यांग व्यक्तींसाठी समावेशक शिक्षण आणि व्यावसायिक कौशल्य विकास अधिक बळकट होणार आहे. एनआयईपीआयडी- दिशा यांसारख्या तंत्रज्ञानाधारित साधनांच्या माध्यमातून लवकर हस्तक्षेप, क्षमताविकास आणि विविध शिक्षण गरजा असलेल्या मुलांचे मुख्य प्रवाहातील शिक्षण व उपचार सेवांमध्ये प्रभावी समावेशन सुनिश्चित केले जाणार आहे.
एनआयईपीआयडीचे उपसंचालक (प्रशासन) डॉ. श्रावण रेड्डी यांनी आभारप्रदर्शन केले.
***
सुवर्णा बेडेकर/गजेंद्र देवडा/परशुराम कोर
Follow us on social media:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2217961)
अभ्यागत कक्ष : 50