संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पाचव्या त्रिदल -सेवा माजी सैनिक दिन संचलनाचे  मुंबईत  मरीन ड्राइव्ह येथे आयोजन

Posted On: 11 JAN 2026 5:15PM by PIB Mumbai

 

मुंबई, 11 जानेवारी, 2026

14 जानेवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या वार्षिक माजी सैनिक दिनाच्या निमित्ताने  आज रविवार 11 जानेवारी 2026 रोजी सकाळी ८ ते 11 दरम्यान मुंबईत मरीन ड्राइव्ह येथे पाचव्या त्रिदल-सेवा माजी सैनिक दिन संचलनाचे आयोजन करण्यात आले होते . या कार्यक्रमाला पश्चिम नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर  कमांडिंग-इन-चीफ, व्हाइस अॅडमिरल कृष्णा स्वामिनाथन, एव्हीएसएम, व्हीएसएम यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून संचलनाला हिरवा झेंडा दाखवला. लष्कर, नौदल आणि हवाई दलातील वरिष्ठ अधिकारी तसेच इतर मान्यवरही यावेळी उपस्थित होते.

शौर्यपदक विजेते, 80 आणि 90 वर्षांवरील ज्येष्ठ माजी सैनिकांसह 500 हून अधिक माजी सैनिकांनी या संचलनामध्ये सहभाग घेतला. माजी सैनिक दिनाच्या निमित्ताने  शहर पातळीवर संचलन आयोजित करणारे देशातील एकमेव शहर म्हणून मुंबईची ओळख यामुळे पुन्हा अधोरेखित झाली. हे संचलन मरीन ड्राइव्हवरील एनसीपीए टोकापासून सुरू होऊन सुमारे दोन किलोमीटरचा मार्ग पार करत पुन्हा  एनसीपीए येथे समाप्त झाले. या ठिकाणी सत्कार समारंभही आयोजित करण्यात आला.

सुयोग्य वेशभूषेत आणि पदके परिधान केलेले माजी सैनिक मरीन ड्राइव्हच्या सागरी मार्गावर उभ्या असलेल्या कुटुंबीयांपासून नागरिक व प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त दाद मिळवत होते. देशभक्तीपर घोषणा, अनौपचारिक संवाद आणि टाळ्यांचा कडकडाट यामुळे वातावरण भारावून गेले. लष्करी वाद्यवृंद, एनसीसी आणि एससीसी छात्रसैनिक तसेच सेवारत समुदायातील सदस्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमात रंगत आणि प्रेरणा निर्माण झाली. ऐक्याचे प्रतीक म्हणून प्रमुख पाहुण्यांनी माजी सैनिक, वीर नारी आणि माजी सैनिकांसोबत काही अंतर चालत सहभाग नोंदवला.

त्रिदल-सेवा माजी सैनिक दिन भारताच्या माजी सैनिकांच्या योगदानाचे स्मरण करतो तसेच भारतीय लष्कराचे पहिले भारतीय कमांडर-इन-चीफ फील्ड मार्शल के. एम. करिअप्पा यांच्या 14 जानेवारी 1953 रोजी झालेल्या निवृत्तीचे औचित्य साधतो. नागरिक आणि सैनिक यांच्यातील नाते अधिक दृढ करणे, माजी सैनिकांच्या बलिदानाविषयी जनजागृती करणे आणि युवकांना सशस्त्र दलात सामील होण्यासाठी किंवा राष्ट्रीय सेवेची प्रेरणा देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.

हे संचलन नेव्ही फाउंडेशन मुंबई चॅप्टर (एनएफएमसी) यांनी प्रमुख संस्था म्हणून आयोजित केले  असून पश्चिम नौदल कमांड मुख्यालयाचे सक्रिय सहकार्य लाभले. या कार्यक्रमातील उल्लेखनीय सहभागींमध्ये 92 वर्षांचे कॅप्टन राज मोहींद्रा (निवृत्त), कमांडर विजय वढेरा (निवृत्त), वीर चक्र पुरस्कार विजेते कमांडर अनूप वर्मा, लेफ्टनंट कमांडर फारूक तारापोर, अर्जुन पुरस्कार विजेते व आशियाई क्रीडा स्पर्धा पदक विजेते यांच्यासह अनेक सन्मानित माजी सैनिकांचा समावेश होता.

***

सुषमा काणे/नितीन गायकवाड/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2213458) अभ्यागत कक्ष : 55
Read this releasein: English