रसायन आणि खते मंत्रालय
रसायन आणि पेट्रोकेमिकल्स विभागातर्फे कोल्हापूर येथे औद्योगिक सुरक्षा प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन
प्रविष्टि तिथि:
08 JAN 2026 8:03PM by PIB Mumbai
मुंबई, 8 जानेवारी 2026
भारत सरकारच्या रसायन आणि खते मंत्रालयाच्या रसायन आणि पेट्रोकेमिकल्स विभागाने रसायन आणि पेट्रोकेमिकल्स क्षेत्रातील प्रामुख्याने मोठ्या अपघातांची जोखीम (एम ए एच) असलेल्या युनिट्ससाठी, औद्योगिक सुरक्षा पद्धती, जोखीम व्यवस्थापन आणि नियामक अनुपालन मजबूत करण्याच्या उद्देशाने 18 आणि 19 डिसेंबर 2025 दरम्यान कोल्हापूर येथे 'रसायन आणि पेट्रोकेमिकल्स औद्योगिक सुरक्षा' या विषयावर दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

प्रमुख पाहुणे असणारे सीआयपीईटीचे महासंचालक प्रा. (डॉ.) शिशिर सिन्हा यांच्या उपस्थितीत (ऑनलाइन माध्यमातून) या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन सत्राला एनडीआरएफ, पुणे येथील 5 व्या युनिटचे सहाय्यक कमांडंट प्रवीण बी. धट यांनी सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहून शोभा वाढवली.
उपस्थितांना संबोधित करताना मान्यवरांनी औद्योगिक अपघात टाळण्यासाठी, विशेषतः उच्च-जोखमीच्या रासायनिक आणि पेट्रोकेमिकल प्रकल्पांमध्ये, कठोर सुरक्षा नियमांचे पालन, सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब आणि सज्जता या अत्यंत महत्त्वपूर्ण बाबी विशद केल्या.
या प्रशिक्षण कार्यक्रमात रासायनिक आणि पेट्रोकेमिकल उद्योग, सरकारी संस्था आणि नियामक संस्थांमधील 100 हून अधिक प्रतिनिधींनी सहभाग घेतला. तांत्रिक सत्रांमध्ये उष्णता-उत्सर्जक रासायनिक रिॲक्टरमधील सुरक्षा खबरदारी; हॅझॅन, हॅझॉप, हिरा आणि लोपा यांसारख्या धोके ओळखणाऱ्या कार्यप्रणाली आणि जोखीम मूल्यांकन पद्धती; प्रक्रिया सुरक्षा व्यवस्थापन ; वैयक्तिक संरक्षक उपकरणांचा वापर; रासायनिक लेबलिंग आणि सुरक्षा डेटा शीट्स; घातक कचरा व्यवस्थापन; पर्यावरणीय नियम; आणि आपत्कालीन तयारीच्या उपायांसह आग आणि स्फोट सुरक्षा यांसारख्या प्रमुख क्षेत्रांचा समावेश होता.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ , ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स , राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, एक्सेल इंडस्ट्रीज लिमिटेड, घरडा केमिकल्स लिमिटेड, लक्ष्मी ऑर्गेनिक्स लिमिटेड, एशियन पेंट्स, एस.एम.एस. एन्वायरोकेअर लिमिटेड आणि कॉलेज ऑफ फायर इंजिनिअरिंग अँड सेफ्टी मॅनेजमेंट, कोल्हापूर येथील तज्ञांनी संवादात्मक सत्रांद्वारे व्यावहारिक माहिती, केस स्टडीज आणि सर्वोत्तम औद्योगिक पद्धती सामायिक केल्या.
या कार्यक्रमाचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे 19 डिसेंबर 2025 रोजी कॉलेज ऑफ फायर इंजिनिअरिंग अँड सेफ्टी मॅनेजमेंट, कोल्हापूर यांनी कोल्हापूर महानगरपालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी आणि अग्निशमन विभागाच्या पथकासोबत संयुक्तपणे आयोजित केलेला आपत्कालीन सज्जता प्रात्यक्षिक सराव आणि मॉक ड्रिल, ज्यामध्ये औद्योगिक युनिट्ससाठी घटनास्थळी आणि घटनास्थळाबाहेरील आपत्कालीन प्रतिसाद नियोजनाचे प्रदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या समारोप सत्रात सहभागींचा अभिप्राय आणि प्रश्नोत्तरांचे संवादात्मक सत्र समाविष्ट होते.
उद्योग प्रतिनिधी आणि नियामक प्राधिकरणांनी या उपक्रमाचे खूप कौतुक केले आणि रसायने व पेट्रोकेमिकल उद्योगांमध्ये सुरक्षा नियमांचे पालन आणि आपत्कालीन तयारीची संस्कृती मजबूत करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली.




निलीमा चितळे/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2212601)
आगंतुक पटल : 19
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English