विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
गोव्यातील राष्ट्रीय सागरी विज्ञान संस्थेचा 61 वा वर्धापन दिन साजरा
Posted On:
01 JAN 2026 10:05PM by PIB Mumbai
पणजी, 1 जानेवारी 2026
वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या अखत्यारीतील गोव्यातील राष्ट्रीय सागरी विज्ञान संस्थेचा (CSIR–NIO), 61 वा वर्धापन दिन आज 01 जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरा झाला. संस्थेच्या हीरक महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून दोना पॉला इथल्या संस्थेच्या प्रेक्षागृहात हा कार्यक्रम झाला. आरोग्यदायी महासागरासाठी अंतराळ तंत्रज्ञान ही यावर्षीच्या वर्धापन दिनाची संकल्पना होती. या निमित्ताने प्रवाळ परिसंस्थेचे दर्शन घडवणारे मरीन अॅक्वेरियम, संशोधन जहाजांच्या प्रतिकृती, समुद्र विज्ञानाअंतर्गत वापरली जाणारी उपकरणे आणि महासागराविषयी विज्ञानकथांच्या लघुपटांचा अंतर्भाव असलेले प्रदर्शनही मांडण्यात आले होते. हा उपक्रम पर्यटक आणि नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरला.

अहमदाबाद येथील इस्रोच्या स्पेस ॲप्लिकेशन सेंटरचे संचालक नीलेश देसाई हे प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमात सहभागी झाले होते. महासागरीय संशोधनाच्या प्रगतीसाठी अंतराळ तंत्रज्ञानाचा वापर या विषयावर त्यांनी व्याख्यान दिले. आपल्या व्याख्यानातून त्यांनी इस्रोच्या आजवरच्या वाटचालीचा आढावा घेतला. संशोधनासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणांशी संबंधित नवोन्मेष तसेच महासागरीय संशोधनातील पृथ्वी निरीक्षणाचे महत्त्व त्यांनी आपल्या व्याख्यानातून अधोरेखित केले. संयुक्त राष्ट्र संघाने आखून दिलेल्या ध्येय उद्दिष्टांनुसार सुरक्षित, स्वच्छ उत्पादक आणि अंदाज मांडता येईल अशा महासागरीय परिसंस्थेचे लक्ष्य साध्य करण्यासाठी तसेच नील अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी अंतराळ तंत्रज्ञानाची भूमिका अत्यंत महत्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले. ओशिअनसॅट-3 आणि आगामी ओशिअनसॅट-3A या मोहिमांच्या परिणामकारतेविषयी देखील त्यांनी सांगितले. परस्पर सहकार्याने राष्ट्रीय महासागरीय अनुप्रयोग उपयोगांचे संरेखन आणि निर्मिती करण्याचे आवाहनही त्यांनी केली.

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या संशोधन सल्लागार मंडळाचे अध्यक्ष तसेच भोपाळ इथल्या भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेचे माजी संचालक पद्मश्री प्रा. विनोद सिंग यांनीही ऑरगॅनिक सिंथेसिस आणि मानवी कल्याणावरील त्याचे परिणाम याविषयावरील आपले विचार उपस्थितांसमोर मांडले. औषध निर्मिती आणि संशोधनामध्ये मूळ स्वरुपातील रसायनशास्त्राची भूमिका अत्यंत महत्वाची असून, मानवी आरोग्य आणि कल्याणात त्याचे चिरंतन योगदान असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली.
राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे संचालक प्रा. सुनील कुमार सिंग यांनी स्वागतपर भाषण केले. गेल्या सहा दशकांतील महासागर संशोधनातील संस्थेच्या योगदानाचा आढावा तसेच सागरी विज्ञानातील उदयोन्मुख क्षेत्रांच्या भविष्यातील वाटचालीची रूपरेषा त्यांनी उपस्थितांसमोर मांडली.

इस्रोच्या स्पेस ॲप्लिकेशन सेंटरच्या उपसंचालिका डॉ. रश्मी शर्मा यांनीही उपस्थितांशी संवाद साधला. त्यांनी अंतराळशास्त्र आणि समुद्र विज्ञानातील वाढता सामायिकपणा अधोरेखित केला.
मुख्य शास्त्रज्ञ इलंगोवन यांनी या कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शनाची जबाबदारी पार पाडली, तर मुख्य शास्त्रज्ञ डॉ. ज्युडिथ गोन्साल्विस यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
यानिमित्ताने आयोजित प्रदर्शनाला भेट दिलेल्या नागरिकांनी प्रवाळ परिसंस्था, जहाजांच्या प्रतिकृती आणि समुद्र विज्ञानाशी संबंधित विविध उपकरणांची माहिती जाणून घेतली.

* * *
पीआयबी पणजी | निलिमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
Follow us on Social Media:
@PIBPanaji
/PIBPanaji
/pib_goa
pibgoa[at]gmail[dot]com
/PIBGoa
(Release ID: 2210654)
अभ्यागत कक्ष : 53