अणुऊर्जा विभाग
अगदी अल्प प्रमाणातील मद्यपानानेही मुखाचा कर्करोग होण्याचा धोका -अभ्यासातून धोक्याची सूचना
‘टाटा मेमोरियल सेंटर’च्या नवीन विस्तृत अभ्यासातून निष्कर्ष
प्रविष्टि तिथि:
24 DEC 2025 10:02PM by PIB Mumbai
मुंबई, 24 डिसेंबर 2025
मुंबई येथील ‘टाटा मेमोरियल सेंटर’ च्या 'सेंटर फॉर कॅन्सर एपिडेमियोलॉजी, द ॲडव्हान्स्ड सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर (ACTREC)' यांच्यावतीने केलेल्या एका विस्तृत आणि महत्त्वपूर्ण अभ्यासातून असा निष्कर्ष निघाला आहे की, मुखाच्या कर्करोगाचा विकास अत्यल्प मद्यपानानेही होवू शकतो. अमुक एका मर्यादेपर्यंत मद्यपान केले तर मुखाचा कर्करोग होणार नाही, अशी कोणतीही सुरक्षित मर्यादा नाही, हे या व्यापक अभ्यासामध्ये दिसून आले आहे. 'बीएमजे ग्लोबल हेल्थ' या मुक्त उपलब्ध असलेल्या नियतकालिकामध्ये ऑनलाइन प्रकाशित झालेल्या एका मोठ्या तुलनात्मक अभ्यासानुसार, भारतात दररोज सुमारे एका विशिष्ट प्रमाणात मद्यपान केले किंवा अतिशय कमी प्रमाणात मद्यपान केल्यानेही तोंडाच्या श्लेष्मल त्वचेच्या कर्करोगाचा धोका 50% वाढतो, आणि स्थानिक पातळीवर तयार केलेल्या मद्यामुळे तर हा धोका सर्वाधिक असतो.
या अभ्यासाचे सविस्तर विश्लेषण बुधवार - 24 डिसेंबर, 2025 रोजी खारघर येथील ‘एसीटीआरईसी’ मध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेत सादर करण्यात आले. या पत्रकार परिषदेला ‘एसीटीआरईसी’चे संचालक डॉ. पंकज चतुर्वेदी, ‘सेंटर फॉर कॅन्सर एपिडेमियोलॉजी’चे संचालक डॉ. राजेश दीक्षित, अभ्यासाच्या प्रमुख ज्येष्ठ लेखिका डॉ. शरयू म्हात्रे आणि संशोधन चमूतील ग्रेस जॉर्ज उपस्थित होते.
या अभ्यासात असे अधोरेखित करण्यात आले की, बिअर, व्हिस्की, वाईन यांसारख्या आंतरराष्ट्रीय ब्रँड्सचे असो किंवा महुआ, ताडी, देशी दारू किंवा थर्रा यासारखे मद्य तसेच भारतात स्थानिक पातळीवर उत्पादित होत असलेले ब्रँड्सचे असो, कोणत्याही प्रकारच्या मद्यपानामुळे तोंडाच्या पोकळीमध्ये कर्करोग विकसित होण्याचा धोका वाढतो. तंबाखू चघळणे आणि मद्यपान करणे या दोन्ही सवयी नसलेल्यांच्या तुलनेत या दोन्ही सवयी असलेल्यांमध्ये तोंडाच्या कर्करोगाचा धोका चौपट वाढतो, यालाही या अभ्यासाने प्रथमच याची पुष्टी केली आहे. तोंडाच्या पोकळीमध्ये होणारा कर्करोग टाळण्यासाठी तंबाखू आणि मद्यपान या दोन्हीच्या वापरांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
संशोधकांच्या मते, मुखाचा कर्करोग हा भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक होणारा कर्करोग आहे. मुखाचा कर्करोग होत असलेल्या नवीन रूग्णांची संख्या दरवर्षी अंदाजे 1,43,759 आहे. तर या आजारामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या 79,979 होतात. देशात या आजाराचे प्रमाण सातत्याने वाढत आहे, दर 1,00,000 भारतीय पुरुषांमागे अंदाजे 15 प्रकरणे मुखाच्या कर्करोगाची आढळतात. भारतातील तोंडाच्या कर्करोगाचा मुख्य प्रकार म्हणजे गाल आणि ओठांच्या आतील मऊ गुलाबी आवरणाचा (बक्कल म्यूकोसा) कर्करोग. या आजाराने ग्रस्त असलेल्यांपैकी निम्म्याहून कमी लोक 5 वर्षे किंवा त्याहून अधिक काळ जगतात.
2010 ते 2021 या कालावधीत बुक्कल म्यूकोसा कर्करोगाचे निदान झालेल्या 1,803 व्यक्ति आणि 1,903 रोगमुक्त व्यक्तींचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला. सहभागींनी त्यांच्या अल्कोहोल सेवनाचे तपशील सांगितले, यात प्रकार, वारंवारता आणि कालावधी यांचा समावेश होता. अभ्यासाच्या निष्कर्षांवरून असे दिसून आले की, मद्यपान करणाऱ्यांना मद्यपान न करणाऱ्यांपेक्षा 68% जास्त जोखीम होती. आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक पातळीवर बनवलेल्या अल्कोहोलिक पेयांमुळे जोखीम जवळजवळ दुप्पट झाली, तर स्थानिक पातळीवर बनवलेल्या देशी दारूच्या ग्राहकांमध्ये सर्वाधिक जोखीम दिसून आली.
या विषयावर आयोजित पत्रकार परिषदेत, एसीटीआरईसी चे संचालक डॉ. पंकज चतुर्वेदी यांनी, अल्कोहोल नियंत्रण धोरण मजबूत करण्याची आणि त्याची अंमलबजावणी करण्याची हीच योग्य वेळ असल्याचे सांगितले. भारतातील अल्कोहोल नियंत्रणाची सध्याची कायदेशीर चौकट गुंतगुंतीची असून, त्यामध्ये केंद्र आणि राज्य दोन्ही कायद्यांचा समावेश आहे. भारतीय राज्यघटनेच्या सातव्या अनुसूची अंतर्गत अल्कोहोलची नोंद राज्य सूचीमध्ये करण्यात आली असून, ती राज्यांना अल्कोहोलचे उत्पादन, वितरण आणि विक्री यांचे नियमन आणि नियंत्रण करण्याचा अधिकार देते. तथापि, स्थानिक अल्कोहोल मार्केट अनियंत्रित असून, काही मद्यांमध्ये 90% पर्यंत अल्कोहोल असल्याचे त्यांनी सांगितले.
सेंटर फॉर कॅन्सर एपिडेमिओलॉजीचे संचालक डॉ. राजेश दीक्षित यांनी सांगितले की, अभ्यासाचे परिणाम असे सूचित करतात की भारतातील 10 पैकी 1 पेक्षा जास्त प्रकरणे (एकूण बुक्कल म्यूकोसा कर्करोगांपैकी सुमारे 11.5%) अल्कोहोलशी संबंधित कारणांमुळे असून, अरुणाचल प्रदेश, मेघालय, आसाम, तेलंगणा आणि मध्य प्रदेश यासारख्या काही राज्यांमध्ये त्याचे प्रमाण 15% पेक्षा जास्त आहे. या राज्यांमध्ये हा आजार अधिक प्रमाणात दिसून येतो. गुजरातसारख्या राज्यांमध्ये, जिथे मद्यविक्रीवर बंदी आहे, त्या ठिकाणी अल्कोहोलशी संबंधित मुखकर्करोगाचा धोका खूपच कमी आहे, यावर त्यांनी भर दिला.
अभ्यासाच्या प्रमुख वरिष्ठ लेखक डॉ. शरयू म्हात्रे आणि संशोधन पथकाचे ग्रेस जॉर्ज यांनी अभ्यास अहवाल सादर केला. अल्कोहोल आणि तंबाखूच्या वापराशी संबंधित वाढत्या जोखमींवर प्रकाश टाकत त्यांनी प्रभावी जागरूकता मोहीम आणि प्रतिबंधात्मक उपायांच्या तातडीच्या गरजेवर भर दिला.
* * *
पीआयबी मुंबई | शैलेश पाटील/सुवर्णा बेडेकर/राजश्री आगाशे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2208341)
आगंतुक पटल : 19
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English