अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आरबीआय पणजीने गोव्यातील नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी वित्तीय साक्षरता आणि सायबर फसवणूक जागरूकता कार्यक्रमांचे केले आयोजन

Posted On: 24 DEC 2025 7:56PM by PIB Mumbai

गोवा, 24 डिसेंबर 2025

 

सायबर फसवणुकीबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) च्या देशव्यापी 'आरबीआय कहता है' मोहिमेच्या संदर्भात, आरबीआय पणजी प्रादेशिक कार्यालयाने डिसेंबर 2025 मध्ये गोव्यात विविध जागरूकता कार्यक्रमांचे आयोजन केले होते, ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिक, महिला, शालेय विद्यार्थी आणि महाविद्यालयीन तरुणांसह समाजातील विविध घटकांचा समावेश होता.

पणजीमध्ये ज्येष्ठ नागरिक आणि महिला ज्यांना सायबर गुन्हेगारांकडून मोठ्या प्रमाणात लक्ष्य केले जात आहे, त्यांच्यासाठी या मोहिमेचा एक भाग म्हणून, एक विशेष सायबर फसवणूक जागरूकता कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाला आरबीआयचे कार्यकारी संचालक  विवेक दीप आणि आरबीआय पणजीचे प्रादेशिक संचालक प्रभाकर झा आणि गोवा पोलिसांच्या सायबर क्राइम सेलचे पोलिस निरीक्षक दीपक पेडणेकर उपस्थित होते जे अतिथी वक्ते देखील होते.

गोव्यात ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना लक्ष्य केल्या जाणाऱ्या सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटना अधोरेखित करत प्रभाकर झा यांनी विविध लोकसंख्या गटांसाठी तयार केलेल्या आरबीआयच्या सक्रिय वित्तीय  साक्षरता उपक्रमांबाबत माहिती दिली.

अज्ञान, भीती आणि लोभ हे सायबर फसवणुकीचे तीन महत्त्वाचे घटक असल्याचे नमूद करत  आरबीआयचे कार्यकारी संचालक विवेक दीप यांनी ज्येष्ठ नागरिक विशेषतः असुरक्षित का आहेत हे स्पष्ट  करताना मर्यादित तांत्रिक साक्षरता, आर्थिक स्थिरता आणि वाढता सोशल मीडिया वापर यासारख्या घटकांचा उल्लेख केला.

दीपक पेडणेकर यांनी "डिजिटल अरेस्ट ", तोतयागिरी घोटाळे आणि फिशिंग सारख्या सामान्य सायबर फसवणुकीच्या प्रकारांचा उल्लेख केला आणि सायबर स्वच्छ आचरणाचे पालन करण्यावर भर दिला.

या कार्यक्रमात उदयोन्मुख सायबर फसवणुकीच्या प्रकारांबद्दल, फसवणूक करणाऱ्यांकडून टाकला जाणारा  सामान्य मनोवैज्ञानिक दबाव  आणि सायबर स्वच्छता राखण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. डिजिटल प्लॅटफॉर्म वापरताना दक्षतेच्या गरजेबद्दल सहभागींना देखील सावध करण्यात आले आणि राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंद  पोर्टल आणि सायबर गुन्हे हेल्पलाइनद्वारे सायबर फसवणुकीच्या घटनांची त्वरित तक्रार करण्यास प्रोत्साहित करण्यात आले.

या उपक्रमाला पूरक म्हणून, आरबीआय पणजीच्या वित्तीय समावेशन आणि विकास विभागाने उत्तर आणि दक्षिण गोव्यातील विद्यार्थ्यांसाठी वित्तीय  जागरूकता शिबिरे आयोजित केली, जी शालेय आणि महाविद्यालयीन तरुणांपर्यंत पोहोचली. प्रारंभिक  टप्प्यात आर्थिक साक्षरतेचा मजबूत पाया तयार करण्यावर या कार्यक्रमांचा भर होता , ज्यामध्ये जबाबदार आर्थिक वर्तन, डिजिटल बँकिंग साधनांचा सुरक्षित वापर, भारतीय चलनी नोटांची सुरक्षा वैशिष्ट्ये आणि खराब किंवा फाटलेल्या नोटांच्या देवाणघेवाणीच्या प्रक्रियांचा समावेश होता. विद्यार्थ्यांना सामान्य फसवणूक तंत्रांबद्दल देखील सावध  करण्यात आले आणि ओटीपी, पासवर्ड आणि यूपीआय पिन सारख्या वैयक्तिक आर्थिक माहितीचे संरक्षण करण्याचा सल्ला देण्यात आला. एकात्मिक लोकपाल योजनेची ओळख करून देऊन जागरूकता आणखी वाढविण्यात आली, ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे हक्क आणि त्यांच्यासाठी उपलब्ध असलेल्या तक्रार निवारण यंत्रणा समजून घेण्यास सक्षम बनविण्यात आले.

‘आरबीआय कहता है’ हा भारतीय रिझर्व्ह बँकेचा एक उपक्रम आहे जो बँकांमधील ग्राहक सेवेची गुणवत्ता वाढवण्याच्या उद्देशाने असलेल्या नियमांबद्दल जनतेला शिक्षित करतो.

 

* * *

पीआयबी मुंबई | शैलेश पाटील/सुषमा काणे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2208271) अभ्यागत कक्ष : 30
Read this releasein: English