संरक्षण मंत्रालय
एक भारत श्रेष्ठ भारत – II महाराष्ट्र शिबिराचा कामठी येथे समारोप
Posted On:
18 DEC 2025 9:29PM by PIB Mumbai
नागपूर, 18 डिसेंबर 2025
राष्ट्रीय एकात्मतेला चालना देण्याबाबत पंतप्रधान कार्यालयाच्या निर्देशांनुरूप आणि केंद्र सरकारच्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या(एनसीसी) कार्यादेशानुसार 'एक भारत श्रेष्ठ भारत – II महाराष्ट्र शिबिर' 08 ते 19 डिसेंबर 2025 दरम्यान एनसीसी अधिकारी प्रशिक्षण अकादमी (ओटीए), कामठी येथे यशस्वीरित्या आयोजित करण्यात आले. एनसीसी ग्रुप मुख्यालय, नागपूर यांच्या नेतृत्वाखाली 4 महाराष्ट्र बटालियन एनसीसीने, आयोजित केलेल्या या शिबिरात देशाच्या विविध भागांतील एनसीसी छात्रसैनिक एकत्र आले. यामुळे विविधतेत एकता या तत्त्वाला चालना मिळाली आणि युवांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना अधिक दृढ झाली.

A66L.jpeg)
या शिबिराचा उद्देश भारतातील विविध सांस्कृतिक, भाषिक आणि भौगोलिक पार्श्वभूमीच्या युवांना एकत्र आणून राष्ट्रीय एकात्मता मजबूत करणे आणि विविधतेत एकता वृद्धिंगत करणे, हा होता.

LTC7.jpeg)
या शिबिरात 600 एनसीसी छात्रसैनिकांनी भाग घेतला. त्यात महाराष्ट्र संचालनालयाचे 450 मुलगे आणि मुली, तसेच तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि अंदमान आणि निकोबार संचालनालयांचे 150 वरिष्ठ विभाग आणि वरिष्ठ शाखा छात्रसैनिक, यांचा समावेश होता. कोल्हापूर, मुंबई 'अ' आणि 'ब', संभाजीनगर, पुणे, नागपूर आणि अमरावती गटांतील छात्रसैनिकांनी यजमान संचालनालयाचे प्रतिनिधित्व केले. या शिबिराला 35 एनसीसी आणि सशस्त्र दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. यामुळे शिबीर सुरक्षित, शिस्तबद्ध आणि सुरळीतरित्या पार पडले.
AARO.jpeg)

या शिबिराचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे राष्ट्रीय एकात्मता जागरूकता कार्यक्रम होय. महाराष्ट्र संचालनालयाच्या सर्व सात गटांनी राज्याचा इतिहास, संस्कृती, कलाप्रकार, सण, अर्थव्यवस्था, भूगोल आणि उल्लेखनीय व्यक्तिमत्त्वांवर सविस्तर सादरीकरण केले. पाहुण्या संचालनालयांनी तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि अंदमान आणि निकोबार बेटांचा समृद्ध वारसा, सादरीकरणे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे सादर केला.
HW7I.jpeg)

आंतर-सांस्कृतिक कार्यक्रम 18 डिसेंबर 2025 रोजी आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाने पारंपरिक नृत्य, संगीत, लोककला आणि चालीरीतींच्या माध्यमातून छावणी परिसराला भारताच्या विविधतेतील एकतेचे एक चैतन्यमय प्रदर्शन घडवले.
जागरूकता आणि प्रेरणा अधिक संवर्धित करण्यासाठी छात्रसैनिकांनी अनेक शैक्षणिक आणि लष्करी भेटींमध्ये भाग घेतला. सोनेगाव येथील हवाई दल तळावर, छात्रसैनिकांना भारतीय हवाई दलाच्या कामकाजाची ओळख करून देण्यात आली. यात आयएएफ गरुड कमांडोंसोबत संवाद साधणे आणि हेलिकॉप्टर व मालवाहू विमानांच्या कामकाजाची माहिती मिळवणे यांचा समावेश होता.
सीताबर्डी किल्ल्याच्या ऐतिहासिक ट्रेकमुळे लष्करी वारशाविषयी जाणीवजागृती झाली, तसेच शारीरिक क्षमता आणि सांघिक भावनेला प्रोत्साहन मिळले.
गार्डस ब्रिगेडच्या भेटीमुळे छात्रांना लढाऊ माहिती सत्रे, परेड प्रात्यक्षिके, ड्रोन परिचालन आणि रेजिमेंटल संग्रहालयाला भेट याद्वारे लष्करी प्रशिक्षण आणि कार्यप्रणालीची एक समृद्ध ओळख झाली.
BWIL.jpeg)
या शिबिरात वादविवाद, तात्काळ भाषण, पोस्टर बनवणे, रेखाचित्र आणि प्रादेशिक व सांस्कृतिक विषयांवर आधारित रांगोळी यांसारख्या स्पर्धांच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्व विकास आणि सर्जनशीलतेवरही लक्ष केंद्रित करण्यात आले. क्रिकेट, व्हॉलीबॉल, खो-खो आणि इतर मैदानी खेळांच्या स्पर्धांनी छात्रांची ऊर्जा, शिस्त आणि खिलाडूवृत्तीचे दर्शन घडवले.
छात्रांना महाराष्ट्राचा वारसा आणि खाद्यसंस्कृतीची ओळख करून देण्यात आली, ज्यात मिसळ पाव, वडा पाव, तर्री पोहे, सावजी आणि पुरणपोळी यांसारख्या पारंपरिक पदार्थांचा समावेश होता, तसेच तमिळ परंपरांच्या सांस्कृतिक पैलूंचीही ओळख करून देण्यात आली. या शिबिराने महाराष्ट्राचे शौर्य आणि द्वीपकल्पीय चोलांच्या गौरवशाली वारशाच्या संगमाचे प्रतीक म्हणून 'एक भारत श्रेष्ठ भारत' या भावनेला अधिक दृढ केले.
दहा सदस्यांच्या 'एक्स्पा' संघाच्या भेटीने शिबिराची शोभा अधिकच वाढली, त्यांनी दोन दिवसांत कौशल्य विकास, संघबांधणी आणि व्यक्तिमत्त्व विकास सत्रांचे आयोजन केले. पाहुण्या संचालनालयातील एक आणि महाराष्ट्रातील दोन छात्रांचा समावेश असलेल्या एका अनोख्या 'बडी ट्रिपलेट सिस्टीम'मुळे दीर्घकाळ टिकणाऱ्या मैत्रीचे नाते निर्माण झाले, सांस्कृतिक देवाणघेवाण वाढली आणि राष्ट्रीय एकात्मता अधिक दृढ झाली.
सांगता समारंभात बोलताना, ईबीएसबी – II चे शिबिर कमांडंट, ग्रुप कॅप्टन खुशाल व्यास म्हणाले, “एक भारत श्रेष्ठ भारत शिबिराने आमचा हा विश्वास दृढ केला आहे की, आपल्या देशातील तरुण हेच एकात्म भारताचे खरे शिल्पकार आहेत. छात्रांनी दाखवलेला उत्साह आणि सलोखा हा राष्ट्रीय एकात्मतेच्या सामर्थ्याचा पुरावा आहे.”
'एक भारत श्रेष्ठ भारत – II महाराष्ट्र' शिबिराचा समारोप मोठ्या उत्साहात झाला, ज्यात सर्व सहभागींना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली आणि आपापल्या एनसीसी युनिट्समध्ये एकतेची भावना पुढे नेण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली. हे शिबिर कायमस्वरूपी आठवणी, मैत्रीचे घट्ट बंध आणि 'एक भारत, श्रेष्ठ भारत' या भावनेला अनुसरून एकता, सलोखा आणि राष्ट्रीय अभिमानाप्रती छात्रांमधील नवीन वचनबद्धता यासह शिबिराची सांगता झाली.
निलीमा चितळे/सोनाली काकडे/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2206297)
अभ्यागत कक्ष : 49