रेल्वे मंत्रालय
भारतीय रेल्वेने नवीन मार्ग सुरू केल्यामुळे आणि प्रवाशांसाठी सुधारित सुविधा निर्माण केल्यामुळे पश्चिम विभागातील संपर्क यंत्रणेला बळकटी
अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील 132 स्थानकांमध्ये सुधारणा करणार; 17 स्थानकांवरील कामे पूर्ण
प्रविष्टि तिथि:
12 DEC 2025 6:35PM by PIB Mumbai
भारतीय रेल्वेच्या वतीने महाराष्ट्रभर नवीन लोह मार्गांचे बांधकाम आणि स्थानक पुनर्विकास उपक्रमांच्या बाबतीत लक्षणीय प्रगतीचे काम सातत्याने सुरू आहे. याअंतर्गत बारामती–फलटण–लोणंद या नवीन मार्गाच्या प्रकल्पाची उल्लेखनीय प्रगती, पुणे जंक्शनवरील पायाभूत सुविधांमधील सुधारणा आणि अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत सुरू असलेल्या मोठ्या कामांचा समावेश आहे.
बारामती–फलटण–लोणंद (64 किमी) हा नवीन मार्ग प्रकल्प दोन टप्प्यांमध्ये राबवला जात आहे. लोणंद–फलटण विभाग (38 किमी) हा याअंतर्गतचा पहिला टप्पा आहे. या टप्प्यासाठी, 2002 मध्ये तपशीलवार अंदाजित खर्चाला मंजुरी दिली होती. आता त्यानंतर हा मार्ग पूर्ण होऊन कार्यान्वित झाला आहे. तर फलटण–बारामती विभाग (26 किमी) हा दुसरा टप्पा 2016 मध्ये मंजूर करण्यात आला होता. या टप्प्याच्या मार्गिकेच्या बाबतीत सुरुवातीला विरोध झाला होता. त्यानंतर राज्य सरकार आणि भागधारकांशी सल्लामसलत करून मार्गाचे पुनरावलोकन करण्यात आले. त्यानंतर मार्गिकेविषयी अंतिम निर्णय घेतला गेला आणि जमीन अधिग्रहणाच्या कामाला सुरुवात केली गेली. यासोबतच जमीन अधिग्रहणासाठी सप्टेंबर 2022 मध्ये हा प्रकल्प विशेष रेल्वे प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आला आणि त्याच महिन्यात जमीन अधिग्रहणासाठी सक्षम प्राधिकरणाची स्थापना आणि नियुक्तीही करण्यात आली. आता आवश्यक असलेल्या 262 हेक्टर जमिनीपैकी 240 हेक्टर जमीन अधिग्रहित झाली आहे, आणि उपलब्ध जमिनीवर बांधकाम सुरू झाले आहे.
या प्रकल्पांतर्गत आता नवी बारामती इथे एक मालधक्का उभारला जात असून, तो स्थानिक शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. या मालधक्क्यामुळे कृषी उत्पादनांची वाहतूक सुलभ होणार आहे. काटफळ इथेही बारामतीसाठी जोडणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक प्रवाशांच्या प्रवासाच्या अनुभवात सुधारणा घडून येणार आहे. तर पुणे–सातारा विभागावरील लोणंद जंक्शन इथेही जोडणी उपलब्ध करून दिली गेल्यामुळे पुणे आणि साताऱ्याच्या दिशेने होणारी प्रवासी आणि मालवाहतूक जोडणीही मजबूत होणार आहे. कोणत्याही महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पांच्या पूर्ततेची कालमर्यादा ही जमीन अधिग्रहण, वन विभागाची मंजुरी, सोयीसुविधा केंद्रांचे स्थानांतरण, वैधानिक मंजुरी, भूगर्भीय आणि भौगोलिक परिस्थिती, कायदा आणि सुव्यवस्था विषयक परिस्थिती, आणि प्रकल्पाच्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या कार्यरत महिन्यांची संख्या यासह अनेक घटकांवर अवलंबून असते.
पुणे जंक्शन रेल्वे स्थानकावर अलीकडेच अनेक सुधारणाविषयक कामे पूर्ण केली गेली आहेत. याअंतर्गत फलाट क्रमांक 2, 3 आणि 6 च्या पृष्ठभागांचे नूतनीकरण, दोन दिव्यांगजन शौचालयांचे बांधकाम, पार्सल कार्यालयातील सुधारणा आणि फलाटावरील अतिरिक्त विसावा सुविधा अशा कामांचा समावेश आहे. यासोबतच चार उद्वाहने, मुख्य आणि दुय्यम अशा दोन्ही प्रवेशद्वारांच्या परिसरातील सुधारणा आणि फलाटांचा विस्तार करण्याची कामेही सुरू आहेत. एका अतिरिक्त फलाटाची तरतूद आणि विद्यमान फलाटांचा विस्तार या कामांसह यार्ड पुनर्रचनेच्या कामालाही मंजुरी मिळाली आहे.
पुणे जंक्शन हे अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत पुनर्विकासासाठी निश्चित केलेल्या स्थानकांपैकी एक आहे. त्यादृष्टीने या स्थानकासाठीच्या बृहत् आराखड्याचे काम सध्या सुरू आहे, ही एक स्थानिक गरजांवर आधारित एक अत्यावश्यक आणि नियमित प्रक्रिया आहे. या योजनेअंतर्गत सहज उपलब्धता, परिसर, स्थानक इमारती, प्रतीक्षागृह, शौचालये, आसन व्यवस्था, पाण्याची केंद्रे, पादचारी पूल, सभागृह, उद्वहन, एस्केलेटर, रॅम्प, फलाटांचे पृष्ठभाग, प्रवासी माहिती प्रणाली, वाहनतळ, बहु-आयामी एकात्मता, दिव्यांगजनांसाठी सुविधा, आणि एक स्थानक एक उत्पादन अंतर्गत स्थानिक उत्पादनांसाठीच्या व्यावसायिक केंद्रांची तरतूद अशा सुधारणा केल्या जाणार आहेत. यामाध्यमातून रेल्वे स्थानकांचा दीर्घकालीन, टप्प्याटप्प्याने विकास होणे अभिप्रेत आहे. पर्यावरणपूरक उपाययोजना आणि शक्य असेल तिथे ‘बॅलस्टलेस’ मार्गिकेची तरतूद यासारख्या शाश्वत वैशिष्ट्यांचा देखील या दीर्घकालीन आराखड्यात समावेश आहे. देशभरात या योजनेअंतर्गत 1,337 स्थानके निश्चित करण्यात आली आहेत, त्यापैकी महाराष्ट्रातील 132 स्थानके आहेत. यात अहिल्यानगर , अजनी, अकोला, अंधेरी, वांद्रे टर्मिनस, भुसावळ, चंद्रपूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर (मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे), दौंड, देहू रोड, गोंदिया, जळगाव, कल्याण, कुर्ला, लोणावळा, मुंबई सेंट्रल, नाशिक रोड, पनवेल, पुणे जंक्शन, सोलापूर, ठाणे आणि वाठार यांसारख्या प्रमुख स्थानकांचा समावेश आहे.
महाराष्ट्रात या योजनेअंतर्गत आमगाव, चांदा किल्ला, चिंचपोकळी, देवळाली, धुळे, केडगाव, लासलगाव, लोणंद जंक्शन, माटुंगा, मूर्तिजापूर जंक्शन, नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी जंक्शन, परळ, सावदा, शहाड, वडाळा रोड, बारामती आणि नांदुरा या 17 स्थानकांवरील कामे पूर्ण झाली आहेत तर इतर स्थानकावरील कामांची चांगल्या गतीने प्रगती होत आहे.
पुणे परिसरात हडपसर, देहू रोड, चिंचवड आणि आकुर्डी स्थानकांवर लक्षणीय प्रगती नोंदवली गेली आहे. हडपसर येथे नवीन स्थानक इमारत, प्रतीक्षालय, 12 मीटर फूट उन्नत सेतू , भूमिगत टाकी, फलाटावर निवारा, संचरण क्षेत्र सुधारणा, रोषणाई आणि भूदृश्य रचनेची कामे पूर्ण झाली आहेत. देहू रोड येथे ‘डीजी’ कक्ष पूर्ण झाली आहे आणि फलाट स्वच्छतागृह, संचरण क्षेत्र , फलाट निवारा आणि तिकिट कार्यालयाची कामे सुरू आहेत.
चिंचवड येथे एक उद्वहन आणि एक सरकता जिना सुरू करण्यात आला आहे, आणि प्रतीक्षा क्षेत्रे, शौचालये, पार्किंग, फलाट निवारा आणि बुकिंग कार्यालयांमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. आकुर्डी येथे शौचालय ब्लॉक, भूमिगत पाण्याची टाकी आणि ‘डीजी’ कक्षाचे काम पूर्ण झाले आहे, आणि प्रतीक्षा क्षेत्रे, प्रवेश/निर्गमन दरवाजे, फलाट पृष्ठभाग, कुंपण भिंत, फूट ओव्हरब्रिज आणि निवारा यांचे बांधकाम सुरू आहे. स्थानक विकास कामांना योजना शीर्षक-53 (ग्राहक सुविधा) अंतर्गत निधी दिला जातो आणि विभागीय रेल्वेनुसार वाटप केले जाते. पुणे जंक्शन मध्ये रेल्वे अंतर्गत येते, ज्याला या शीर्षकाखाली 2025-26 साठी ₹1,292 कोटींचे वाटप मिळाले आहे.
स्थानक पुनर्विकासासाठी अग्निशमन, वारसा, वृक्षतोड आणि विमानतळाशी संबंधित परवानग्यांसह वैधानिक परवानग्या आवश्यक असतात तसेच पाणी आणि सांडपाणी वाहिन्या, ऑप्टिकल फायबर केबल्स, वीज वाहिन्या, गॅस पाइपलाइन आणि रेल्वे सिग्नलिंग पायाभूत सुविधांचे स्थलांतर यासारख्या तपकिरी क्षेत्राच्या आव्हानांमुळे प्रगतीवर परिणाम होऊ शकतो. रेल्वे परिचालन आणि प्रवाशांच्या हालचालींना अडथळा न आणता तसेच उच्च-व्होल्टेज वाहिन्यांच्या जाळ्याचे काम करण्याची गरज असून इथे वेगाचे निर्बंध लागू होऊ शकतात. हे घटक एकूण वेळेवर परिणाम करतात.
भारतीय रेल्वेकडे खासदार, निवडून आलेले प्रतिनिधी, संघटना आणि रेल्वे वापरकर्त्यांकडून वंदे भारत सेवांसह नवीन गाड्या सुरू करण्याबाबत नियमितपणे विनंत्या आणि निवेदने मिळतात. व्यवहार्यता, ‘रोलिंग स्टॉक’ची उपलब्धता आणि परिचालन क्षमता या आधारे त्यांची तपासणी केली जाते.
पुण्यासाठी सध्या 269 नियमित रेल्वे सेवा सुरू आहेत, ज्यामध्ये 2024-25 आणि 2025-26 (नोव्हेंबर 2025 पर्यंत) दरम्यान सुरू केलेल्या 12 सेवांचा समावेश आहे. यामध्ये मुझफ्फरपूर-हडपसर एक्सप्रेस, पुणे-अजनी वंदे भारत एक्सप्रेस, रेवा-हडपसर एक्सप्रेस, जोधपूर-हडपसर एक्सप्रेस, कोल्हापूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेस आणि हुबळी-पुणे वंदे भारत एक्सप्रेस. तसेच 164 वंदे भारत खुर्ची वाहन सेवा कार्यरत आहेत.
हजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावर फलाट 1 वरील रेल्वेगाडी जल आपूर्ती प्रणाली आणि प्रतीक्षालयातील सुधारणा पूर्ण झाल्या आहेत. महाराष्ट्रातील अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत निवडल्या गेलेल्या 132 स्थानकांमध्ये हजूर साहिब नांदेडचाही समावेश आहे, ज्याचे मोठे नियोजन सध्या सुरू आहे.
योजनेची उद्दिष्टे आणि निवडल्या जाणाऱ्या स्थानकांची यादी सर्व प्रदेशांमध्ये सुसंगत आहे. नांदेड जंक्शन दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत येते, ज्याला 2025-26 साठी योजना शीर्षक-53 अंतर्गत 863 कोटी रुपयांचे वाटप झाले आहे. इतर प्रमुख स्थानकांप्रमाणे नांदेड येथील पुनर्विकास हा मंजुरी, तांत्रिक व्यवहार्यता आणि निधीची उपलब्धता यावर अवलंबून असून त्यानुसार टप्प्याटप्प्याने होईल.
यासंबंधी सविस्तर माहिती केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात दिली.
***
सुवर्णा बेडेकर/नंदिनी मथुरे/तुषार पवार/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2203323)
आगंतुक पटल : 71
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English