सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंती समारोहानिमित्ताने राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन

प्रविष्टि तिथि: 06 DEC 2025 6:46PM by PIB Mumbai

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आणि सरदार वल्लभभाई पटेल यांचा 150 वा जयंती समारोह याचे औचित्य साधून नवी दिल्ली येथील पंतप्रधान राष्ट्रीय संग्रहालयात एका राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या वतीने हा परिसंवाद आयोजित केला गेला होता. सरदार पटेल एकता संचलनाने या परिसंवादाची सांगता झाली.

राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष किशोर मकवाना हे या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी होते. आयोगाचे सदस्यही या परिसंवादाला उपस्थित होते. या सोबतच केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार हे देखील प्रमुख पाहुणे म्हणून या परिसंवादात सहभागी झाले.

प्रधानमंत्री राष्ट्रीय संग्रहालयाचे सदस्य आणि प्रसिद्ध इतिहासकार प्राध्यापक रिझवान काद्री यांनी या परिसंवादात बीज भाषण केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारताच्या सामाजिक न्याय चौकटीला आकार देण्यात, राष्ट्रीय एकता वृद्धींगत करण्यात आणि घटनात्मक प्रशासनाला बळकटी देण्यात दिलेले ऐतिहासिक योगदान त्यांनी आपल्या बीज भाषणातून मांडले. अस्पृश्यता निवारण, सामाजिक सुधारणा, शैक्षणिक प्रगती आणि वंचित समाजाचे सक्षमीकरण याबद्दल या दोन्ही व्यक्तिमत्वांची परस्पर सामायिक वचनबद्धताही त्यांनी अधोरेखीत केली.

राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष किशोर मकवाना यांनी देखील उपस्थितांना संबोधित केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्यामधील महत्त्वाच्या ऐतिहासिक संवादांचे संदर्भ त्यांनी आपल्या संबोधनातून मांडले. सामाजिक अशांततेच्या काळात अस्पृश्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी पटेल यांनी केलेल्या प्रयत्नांचे डॉ. आंबेडकरांनी कौतुक केले होते, याचा त्यांनी विशेषत्वाने उल्लेख केला. देश कायमच कोणत्याही व्यक्ती अथवा संस्थेपेक्षा मोठा असला पाहिजे, हे तत्व डॉ. आंबेडकरांनी कायम जपल्याचे त्यांनी सांगितले. या तत्वातून राष्ट्रीय एकता आणि राष्ट्रीय हिताची जपणूक करण्याचे महत्त्व अधोरेखीत होत असल्याचे ते म्हणाले.

केंद्रीय मंत्री आणि या परिसंवादाचे प्रमुख पाहुणे डॉ. वीरेंद्र कुमार यांनी समारोपीय भाषण दिले. या परिसंवादाचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी आयोगाची प्रशंसा केली. आपल्या भाषणातून त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सरदार वल्लभभाई पटेल या दोन्ही राष्ट्रीय महापुरुषांना आदरांजली वाहिली. या दोन्ही व्यक्तिमत्वांनी देशाच्या जडणघडणीत दिलेल्या असामान्य योगदानाचे स्मरणही त्यांनी केले. सामाजिक न्याय, एकता आणि कल्याण याविषयीचा या दोन्ही महापुरुषांचा परस्पर सामायिक दृष्टीकोन आजही देशाला मार्गदर्शन करत असल्याची बाब त्यांनी अधोरेखीत केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरदार वल्लभभाई पटेल यांचे राष्ट्र उभारणीसाठीचे प्रयत्न दृढ वचनबद्धतेने पुढे नेले जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.

***

माधुरी पांगे/तुषार पवार/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2199895) आगंतुक पटल : 6
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , हिन्दी