Posted On:
02 DEC 2025 9:39PM by PIB Mumbai
नागपूर, 2 डिसेंबर 2025
नागपूर येथील सीएसआयआर-राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेने (सीएसआयआर-नीरी) राष्ट्रीय हरित फटाक्यांचे उत्कृष्टता केंद्र (एनसीओई-जीएफ) म्हणून मान मिळवत एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.


सीएसआयआरच्या महासंचालक आणि विज्ञान आणि औद्योगिक संशोधन विभागाचे (डीएसआयआर) सचिव डॉ.एन. कलाईसेल्वी यांनी मंगळवारी नागपूरस्थित सीएसआयआर-नीरी येथील एनसीओई-जीएफ तसेच तामिळनाडूमधील कराईकुडी स्थित सीएसआयआर-केंद्रीय इलेक्ट्रोकेमिकल संशोधन संस्था (सीएसआयआर-सीईसीआरआय) यांचे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन केले.
यावेळी केलेल्या भाषणात डॉ. कलाईसेल्वी यांनी देशभरातील फटाक्यांशी संबंधित संस्था आणि उत्पादक यांच्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या अत्याधुनिक उत्कृष्टता केंद्रांच्या स्थापनेबद्दल सीएसआयआर-नीरी तसेच सीएसआयआर-सीईसीआरआय यांचे अभिनंदन केले. त्यांच्या स्वतःच्या सीएसआयआर-सीईसीआरआयच्या संचालक पदाच्या कार्यकाळात या केंद्रांची संकल्पना मांडण्यात आली होती अशी आठवण काढत त्यांनी सांगितले की फटाके हा देशातील पारंपरिक उत्सवांचा विशेषतः दिवाळी सणाचा अविभाज्य भाग आहे.




शिवकाशी या आकांक्षित जिल्ह्यात 80%हून अधिक रोजगार फटाके क्षेत्रावर अवलंबून असून या समर्पित केंद्रांमुळे त्यांना लक्षणीयरित्या लाभ होईल हे त्यांनी अधोरेखित केले. त्या पुढे म्हणाल्या की ही केंद्रे सुरक्षित, किफायतशीर आणि वैज्ञानिकदृष्ट्या प्रमाणित हरित फटाक्यांचे उत्पादन सुनिश्चित करेल आणि प्रमाणीकरणाला होणारा विलंब, विशेषतः सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच सीएसआयआर-नीरीकडून प्रमाणीकरण करून घेणे अनिवार्य केल्यानंतर होणारा उशीर टाळण्यात मदत होईल.
सीएसआयआर-नीरी या संस्थेच्या हरित फटाक्यांच्या क्षेत्रातील अग्रगण्य कार्याने सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशंसेला पात्र होण्यासह राष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळवली आहे हे डॉ.कलाईसेल्वी यांनी अधोरेखित केले. समाजाला उपकारक ठरत आणि पर्यावरणाचे रक्षण करत, हरित फटाक्यांचे तंत्रज्ञान देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचणे सुनिश्चित करून घेण्यासाठी सीएसआयआर-नीरी, सीएसआयआर-सीईसीआरआय तसेच इतर सीएसआयआर प्रयोगशाळांमध्ये दृढ सहकार्याच्या गरजेवर त्यांनी अधिक भर दिला.
शास्त्रज्ञांनी पुढील वर्षापर्यंत कमीतकमी सहा नवीन हरित फटाक्यांच्या संमिश्रणांचा विकास करण्याचे, प्रादेशिक सणांशी निगडित अनुरूप असे विविध प्रकार तयार करण्याचे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता/ मशीन लर्निंग तंत्रज्ञानाचा वापर करून प्रोग्राम करण्यायोग्य हरित फटाके विकसित करण्याच्या शक्यता शोधण्याचे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभाला सीएसआयआर--नीरी चे संचालक डॉ. एस. वेंकट मोहन, सीएसआयआर-सीएलआरआय चे संचालक डॉ. के. रमेश, सीएसआयआर-सीएलआरआय चे संचालक डॉ. पी. थनिकैवेलन, सीएसआयआर-सीएलआरआय चे माजी संचालक डॉ. के. जे. श्रीराम, T ANFAMA चे अध्यक्ष श्री गणेशन, सीएसआयआर- सीईसीआरआय चेन्नईचे वैज्ञानिक-प्रमुख डॉ. आलोक पॉल, सीएसआयआर-नीरीचे मुख्य वैज्ञानिक डॉ. आर. जे. कृपदम, आणि सीएसआयआर-नीरी चेन्नई चे वैज्ञानिक-प्रमुख,डॉ. आर. शिवकुमार उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना, डॉ. एस. वेंकट मोहन यांनी सीएसआयआर-नीरी हरित फटाक्यांच्या संदर्भात, पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय, उत्पादक आणि इतर भागधारकांच्या सहकार्याने करत असलेल्या व्यापक संशोधनाची रूपरेषा मांडली. हरित फटाके राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र आणि हरित फटाके उत्कृष्टता केंद्र हे संशोधन, तंत्रज्ञान प्रसार आणि उद्योग संपर्क मजबूत करण्यासाठी हब-अँड-स्पोक मॉडेलद्वारे कार्य करतील, असे त्यांनी सांगितले.
हरित फटाक्याच्या तंत्रज्ञानात प्रगत नवोन्मेष करण्यासाठी वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद – राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था, (सीएसआयआर—नीरी)सोबत कार्य करण्याच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद – केंद्रीय विद्युतरसायन संशोधन संस्था अर्थात (सीएसआयआर- सीईसीआरआय) च्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार डॉ के रमेश यांनी केला. डॉ. के. जे. श्रीराम यांनी विज्ञान, नवोन्मेष आणि सहयोगी प्रयत्न एकत्रित झाल्यास प्रभावी परिणाम साध्य होतात यावर भर दिला, तर डॉ. पी. थानिकावेलन यांनी हरित फटाके कार्यक्रमाचे राष्ट्रीय महत्त्व अधोरेखित केले.
या प्रसंगी, डॉ. कलैसेल्वी यांनी हरित फटाके राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र आणि हरित फटाके उत्कृष्टता केंद्राच्या कामकाजासाठी मानक कार्यप्रणाली जारी केली, ज्या अंतर्गत दोन्ही संस्था कार्यरत राहतील.
डॉ. आर. जे. कृपादम यांनी केंद्रांचा आढावा आणि हरित फटाक्यांच्या संशोधनाच्या उत्क्रांतीचा आढावा सादर केला, यात सीएसआयआर-नीरीच्या मूलभूत संमिश्रणांचा विकासाचा समावेश होता. कार्यक्रमाचे संचालन डॉ. आलोक पॉल यांनी केले आणि आभारप्रदर्शन डॉ. आर. शिवकुमार यांनी केले.
सुषमा काणे/संजना चिटणीस/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com