आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
एम्स नागपूरने रुग्ण सेवा, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीचा सातवा वर्धापन दिन साजरा केला
मध्य भारतात प्रगत आरोग्य सेवा प्रदान करण्याच्या नव्या वचनबद्धतेसह संस्थेचा सातवा स्थापना दिन संपन्न
Posted On:
02 DEC 2025 3:55PM by PIB Mumbai
नागपूर, 2 डिसेंबर 2025
एम्स (AIIMS) नागपूरने आज 1 डिसेंबर 2025 रोजी आपला 7 वा स्थापना दिन साजरा केला. संस्थेने गेल्या सात वर्षांमध्ये आरोग्य सेवा वितरण, वैद्यकीय शिक्षण, प्रगत संशोधन आणि सार्वजनिक आरोग्य सेवा या क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा यावेळी आढावा घेण्यात आला. संस्थेने आपल्या स्थापनेपासूनच मध्य भारतातील प्रमुख उत्कृष्टता केंद्र म्हणून आपली भूमिका बळकट केली आहे.

या कार्यक्रमाला एम्स नागपूरचे अध्यक्ष डॉ. अनंत पांढरे प्रमुख पाहुणे म्हणून, तर यूएई मधील राईट हेल्थ चे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय पैठणकर सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. मध्य भारतात तृतीयक सेवा आणि समुदाय-केंद्रित सेवांचा दर्जा उंचावण्यात एम्स नागपूरच्या वाढत्या योगदानावर दोन्ही मान्यवरांनी प्रकाश टाकला.
कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. (डॉ.) प्रशांत पी. जोशी यांनी स्वागतपर औपचारिक भाषण केले आणि संस्थेच्या स्थिर विकासाचा मार्ग सुकर करण्यासाठी प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी करत असलेल्या सामूहिक प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली. एम्स नागपूरने आपल्या स्थापनेपासून आतापर्यंत बाह्य रुग्ण विभागात (ओपीडी) 24 लाख रुग्णांवर उपचार केले असून, यात रोजच्या 3,500-4,000 ओपीडी रुग्णांचा समावेश आहे, तसेच 30 सप्टेंबर 2024 रोजी 4,405 रुग्णांचा विक्रमी उच्चांक गाठल्याचे त्यांनी अधोरेखित केले. त्यांनी पुढे नमूद केले की संस्थेने 98,000 हून अधिक आयपीडी रुग्णांना आरोग्य सेवा दिली असून, या ठिकाणी दररोज 100-120 रुग्णांना प्रवेश दिला जातो. यासाठी 940 फंक्शनल बेड, 105 आयसीयू बेड, 99% बेड ऑक्युपन्सी रेट आणि 100% आयसीयू ऑक्युपेंसी या सेवांचा आधार आहे.
त्यांनी असेही सांगितले की संस्थेकडे आता आता दोन कार्यान्वित अस्थिमज्जा प्रत्यारोपण युनिट्स आहेत, 12 बीएमटी पूर्ण झाली आहेत आणि सीएसआर सहाय्याद्वारे आणखी दोन बीएमटी युनिट्स स्थापन केली जातील. संस्थेने एनएटी रक्त चाचणी आणि रक्त विकिरण उपकरण देखील कार्यान्वित केले असून, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याचे उद्घाटन केले होते. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेल्या आणि सिकलसेल आजाराच्या रूग्णांसाठी रक्तसंक्रमणाच्या सुरक्षेत लक्षणीय सुधारणा झाली आहे, आणि मध्य भारतातील सरकारी आस्थापनेतील अशा प्रकारची ही पहिली सुविधा आहे, असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की एम्स , नागपूर ने 24,882 शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत, 52 मूत्रपिंड प्रत्यारोपणे, 1० अस्थिमज्जा प्रत्यारोपणे तसेच 29 कॉर्नियल प्रत्यारोपणे झाली असून संस्थेत 4,850 पेट स्कॅन्स करण्यात आलेले आहेत जे प्रगत तृतीयक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या संस्थेच्या विस्तारित क्षमतेचे दर्शन घडवते.
संचालकांनी 26 आयसीएमआर-एसटीएस शिष्यवृत्त्या, 11आयसीएमआर एमडी/एमएस थिसीस अनुदाने तसेच 29 एमडी/एमएस अभ्यासक्रम, 15 डीएम/एमसीएच सुपरस्पेशियालिटी कार्यक्रम आणि 46 कार्यात्मक विभाग यांच्यासह शैक्षणिक कार्यक्रमांमध्ये झालेली लक्षणीय वाढ यांच्या रूपाने संस्थेने केलेली शैक्षणिक कामगिरी देखील अधोरेखित केली. संस्थेमध्ये यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यासाठी नियामक परवानगी मिळवण्यात आली असून, हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यासाठीची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे अशी माहिती त्यांनी दिली. ते पुढे म्हणाले की प्रवेश-स्तरावरील एनएबीएच मान्यता मिळवणाऱ्या पहिल्या काही एम्स संस्थांमध्ये या संस्थेचा समावेश होत असून, यावर्षभरात संपूर्ण एनएबीएच मान्यता प्राप्त करण्याच्या दिशेने काम सुरु आहे असे ते म्हणाले. सहजगत्या उपलब्ध, किफायतशीर, दर्जेदार आणि रुग्ण-केंद्री वैद्यकीय सुविधा पुरवण्याच्या, विशेषतः आर्थिकदृष्ट्या वंचित वर्गांना लाभदायक ठरणाऱ्या आणि मध्य भारतातील कमी वैद्यकीय सोयी असणाऱ्या भागांमध्ये आरोग्य सेवा देण्याबाबतच्या संस्थेच्या कटिबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला.
एम्स नागपूर या संस्थेने विद्यार्थी स्वास्थ्य केंद्राची स्थापना तसेच अहोरात्र कार्यरत नियंत्रण कक्ष हेल्पलाईनची सुविधा उपलब्ध करून देण्यासह समर्पित मानसिक स्वास्थ्य उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थी आणि कर्मचारी वर्गाच्या कल्याणाप्रती देखील स्वतःची कटिबद्धता बळकट केली आहे.
सन्माननीय अतिथी डॉ.पैठणकर यांनी त्यांच्या भाषणात आरोग्य सुविधा क्षेत्रामध्ये रुपांतर घडवून आणणाऱ्या नवोन्मेष, डिजिटलीकरण आणि कृत्रिम बुद्धीमत्ता यांच्याद्वारे संचालित वेगवान प्रगतीचा उल्लेख केला. त्यांनी आभासी वैद्यकीय सेवेचा उदय आणि रोगनिदान तसेच व्यवस्थापन यामधील वैद्यकीय तंत्रांचे विकसित होत जाणारे स्वरूप अधोरेखित केले. एम्स नागपूर या संस्थेचे अध्यक्ष आणि सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ.अनंत पांढरे यांनी अध्यापकवर्ग, कर्मचारी वर्ग आणि विद्यार्थी यांना सर्वोत्कृष्ट कार्य करण्यासाठी प्रेरित करून जेव्हा गरज भासेल तेव्हा संस्थेतर्फे संपूर्ण पाठबळ देण्याची ग्वाही दिली.
या कार्यक्रमात, संस्थेचे अभिज्ञानम हे मुखपत्र अधिकृतपणे प्रकाशित करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांमधील शैक्षणिक उत्कृष्टतांचा सन्मान देखील करण्यात आला.पहिल्या आणि दुसऱ्या व्यावसायिक एमबीबीएस परीक्षा आणि बीएससी (ऑनर्स) नर्सिंग व्यावसायिक परीक्षांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या हुशार एमबीबीएस आणि नर्सिंग अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. संस्थेच्या शैक्षणिक विभागाच्या डीन डॉ.मृणाल फाटक यांनी आभारप्रदर्शन केले.
पीआयबी नागपूर | सुषमा काणे/ राजश्री आगाशे / संजना चिटणीस /प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2197579)
अभ्यागत कक्ष : 38