खाण मंत्रालय
केंद्रीय कोळसा आणि खाण राज्यमंत्री सतीश चंद्र दुबे यांनी नागपूरच्या इंडियन ब्युरो ऑफ माईन्सच्या (आयबीएम) कामकाजाचा घेतला आढावा, महत्वाच्या खनिजांमध्ये आत्मनिर्भरता मिळवण्याची व्यक्त केली गरज
Posted On:
28 NOV 2025 8:36PM by PIB Mumbai
केंद्रीय कोळसा आणि खाण राज्यमंत्री, सतीश चंद्र दुबे यांनी 28.11.2025 रोजी नागपूर येथील इंडियन ब्युरो ऑफ माइन्सच्या ( आयबीएम) मुख्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सर्वसमावेशक आढावा बैठक घेतली, ज्यामध्ये महत्त्वाच्या खनिजांमध्येआत्मनिर्भरता मिळवण्यावर त्यांनी भर दिला.

“आपण महत्त्वाच्या खनिजांची देशांतर्गत मागणी स्वबळावर पूर्ण करू शकलेलो नाही. महत्त्वाच्या खनिजांच्या पुरवठ्यासाठी आपण अजूनही इतर देशांवर अवलंबून आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री जी. किशन रेड्डी यांचे उद्दिष्ट भारताला 'आत्मनिर्भर' बनवणे आहे. भारत कोळशाच्या आत्मनिर्भरतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण प्रगती करत असला तरी, महत्त्वाच्या खनिजांच्या बाबतीत ते खरे नाही. माझा विश्वास आहे की आम्ही त्या दिशेने पावले उचलत आहोत, पण अजून खूप काही करणे आवश्यक आहे,” असे दुबे म्हणाले, महत्त्वाच्या खनिजांशिवाय देशाचा टिकाव शक्य नाही, यावर त्यांनी भर दिला.

आढावा बैठकीदरम्यान, दुबे यांनी विविध कामकाजाच्या क्षेत्रांमध्ये आयबीएमच्या प्रमुख कार्यप्रदर्शन निकषांवर संस्थेचे स्थान तपासले. 1948 मध्ये स्थापनेपासून इंडियन ब्युरो ऑफ माइन्स अपेक्षा पूर्ण करत असल्याबद्दल मंत्र्यांनी संस्थेचे कौतुक केले. मात्र, अनेक खनिजांचे गौण वरून प्रमुख खनिजांमध्ये पुनर्वर्गीकरण होत असल्यामुळे वाढणारा कामाचा भार लक्षात घेऊन संस्थेतील रिक्त पदे भरण्यासाठी पावले उचलण्याचे निर्देश त्यांनी आयबीएमला दिले. आयबीएम मुख्यालयात आगमन झाल्यावर, कुलश्रेष्ठ, सीजी (प्रभारी) आणि आयबीएमच्या इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंत्र्यांचे उत्साहात स्वागत केले. आयबीएम मुख्यालयाच्या त्यांच्या पहिल्या भेटीत, दुबे यांनी खाण नियामक संस्थेची कार्यात्मक कार्यक्षमता आणि भविष्यातील वाढ मजबूत करण्यासाठी महत्त्वाचे निर्देश दिले आणि धोरणात्मक मार्गदर्शन केले. "आत्मनिर्भर भारत" निर्माण करण्यात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 2047 पर्यंत "विकसित भारत" च्या स्वप्नाची पूर्तता करण्यात खाण क्षेत्राची महत्त्वाची भूमिका असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पंकज कुलश्रेष्ठ, सीजी (प्रभारी) यांनी प्रमुख खनिजांसंबंधी नियमांमधील बदलांबद्दल उद्योग प्रतिनिधींना जागरूक करण्याच्या भूमिकेवर लक्ष केंद्रित करून, आयबीएमच्या कार्यात्मक बाबींची माहिती मंत्र्यांना दिली. केंद्रीय मंत्र्यांनी खाण क्षेत्रांचे निरीक्षण आणि खनिज संसाधनांच्या व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आयबीएमच्या भौगोलिक माहिती प्रणाली प्रयोगशाळेला भेट दिली. आयबीएमच्या एमटीएस प्रकल्पाला नुकताच "डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनसाठी तंत्रज्ञानाचा वापर करून शासकीय प्रक्रियेची पुनर्रचना या श्रेणीत सुवर्ण पुरस्कार मिळाला आहे, ज्यामुळे देशाच्या खाण नियामक संस्थेची डिजिटायझेशनप्रति असलेली बांधिलकी दृढ झाली आहे.

***
निलिमा चितळे/शैलश पाटील/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2196160)
अभ्यागत कक्ष : 36