अणुऊर्जा विभाग
भाभा अणुसंशोधन केंद्राने विकसित केले 'कावेरी वामन' हे भारतातील पहिले उत्परिवर्तित केळीचे वाण
मूळ वाणापेक्षा दीड महिने लवकर होते परिपक्व
व्यावसायिक आणि घरगुती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर
Posted On:
26 NOV 2025 7:50PM by PIB Mumbai
मुंबई, 26 नोव्हेंबर 2025
भाभा अणुसंशोधन केंद्राने देशातील पहिली उत्परिवर्तित केळीचे वाण ट्रॉम्बे बनाना म्युटंट-9 विकसित केले आहे. केंद्र सरकारने ' कावेरी वामन' हे अधिकृत नाव या वाणाला दिले आहे. भारताच्या कृषी क्षेत्रासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे. या महत्त्वाच्या शोधानंतर, भाभा अणुसंशोधन केंद्राने विकसित करून, प्रत्यक्षात जारी केलेले हे पहिले फळ पीक ठरले असून, आता संस्थेकडील सुधारित पिकांच्या एकूण वाणांची संख्या 72 झाली आहे.
आयनकारी किरणोत्सर्गाचा वापर करून बागायती पिकांच्या सुधारणेत क्रांती घडवण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरले असल्याचे अणुऊर्जा विभागाचे सचिव आणि अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. अजित कुमार मोहंती यांनी म्हटले आहे.
भाभा अणुसंशोधन केंद्राच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी मत मांडले. यावेळी भाभा अणुसंशोधन केंद्राचे संचालक विवेक भसीन यांनी उपस्थितांशी संवाद साधला. पिकांच्या जातींमध्ये शाश्वत सुधारणा करण्यासाठी गॅमा-किरण-प्रेरित उत्परिवर्तन प्रक्रियेचे महत्व त्यांनी अधोरेखित केले. 'कावेरी वामन' या जातीमुळे जास्त प्रमाणात लागवड केल्या जाणाऱ्या ग्रांडे नैन केळीची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल, असे त्यांनी नमूद केले. तसेच, ही जात विकसित होण्याच्या घडामोडीमधून, भाभा अणुसंशोधन केंद्राने आपल्या उत्परिवर्तन प्रजनन कार्यक्रमांना, पारंपरिक पिकांकडून आता फळ आणि इतर अलैंगिक प्रजननाद्वारे तयार होणाऱ्या वनस्पतींपर्यंत विस्तारित केल्याचे दिसून येते असेही त्यांनी सांगितले.
भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या अखत्यारीतील तिरुचिरापल्ली इथल्या राष्ट्रीय केळी संशोधन केंद्राच्या सहकार्याने 'कावेरी वामन' ही जात विकसित केली आहे. या वाणाचे उत्पादन ग्रांडे नैन या लोकप्रिय प्रकाराअंतर्गत घेतले गेले आहे. याअंतर्गत उपयुक्त उत्परिवर्तन घडवून आणण्यासाठी गॅमा किरणोत्सर्गाचा वापर करण्यात आला होता. अनेक वर्षांच्या चाचणी आणि विस्तृत क्षेत्रीय चाचण्यांनंतर टीबीएम-9 हा घटक, उत्कृष्ट कृषी-वैज्ञानिक गुणतत्वांसाठी निवडला गेला होता.
'कावेरी वामन' हे वाण आखूड उंचीचे असून, यामुळे ते जमिनीवर लोळण घेत नाही हा याचा मोठा फायदा आहे. केळीचे झाड उंच असल्यास, विशेषत: वादळी किनारपट्टीच्या प्रदेशात असल्यास ते जमीनीवर लोळण घेणे ही एक सामान्य समस्या बनते. मात्र हे वाण आखूड उंचीचे असल्याने त्याला लाकडी किंवा बांबूच्या आधाराची गरज उरत नाही, परिणामी लागवडीचा खर्चही लक्षणीयरित्या कमी होतो. हे नवीन वाण मूळ वाणापेक्षा 1.5 महिने लवकर परिपक्व होते, ज्यामुळे कापणीचे चक्र जलदगतीने पूर्ण होते. इतक्या सुधारणा केल्यानंतरही, या वाणाच्या फळामध्ये ग्रांडे नैननची चव आणि गुणवत्ता विषयक वैशिष्ट्ये कायम आहेत.
हे वाण जास्त घनतेच्या लागवडीसाठी आणि टेरेस गार्डनिंगसाठीही उपयुक्त आहे. यामुळे व्यावसायिक तसेच घरगुती अशा दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी हे वाण जात आधार देणारे ठरणार आहे.
सामाजिक हितासाठी अणुविज्ञानाचा उपयोग करणे हे संस्थेचे उद्दिष्ट असून, या पिकांमधील सुधारणा हा त्याच उद्दिष्टाचा महत्त्वाचा भाग असल्याचे डॉ. मोहंती यांनी सांगितले. भाभा अणुसंशोधन केंद्राने विकसित केलेल्या पिकांच्या जातींचे मूल्यांकन करणे आणि नंतर ती जारी करण्यात, भारतीय कृषी संशोधन संस्था आणि राज्य कृषी विद्यापीठांनी महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे नमूद करून मोहंती यांनी याबद्दल या सर्व संस्थांची प्रशंसाही केली.
'कावेरी वामन' हे वाण प्रत्यक्षात जारी केल्यामुळे अणु आधारीत शेतीमधील भारताची वाढती क्षमता अधोरेखित झाली असून, शेतकऱ्यांसाठी शाश्वत लागवडीकरता एक शाश्वत, किफायतशीर आणि उच्च-उत्पादन देणारी केळीचे वाण जात उपलब्ध झाले आहे.

नितीन फुल्लुके / तुषार पवार/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2194939)
अभ्यागत कक्ष : 121