शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

विद्यार्थ्यांच्या हितासाठी भारतातील उच्च शिक्षण संस्था एकत्र आल्या


आयआयटी मुंबई येथे 22 आणि 23 नोव्हेंबर या कालावधीत दुसरी राष्ट्रीय स्वास्थ्य परिषद संपन्न

Posted On: 24 NOV 2025 9:46PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर 2025


किशोरवयीन मुलेमुली आणि युवा वर्ग भारताच्या लोकसंख्याशास्त्रीय लाभांशाचा कणा आहेत तरीही शैक्षणिक दबाव, सामाजिक विलगीकरण आणि डिजिटल प्रभाव यांमुळे त्यांच्या सहनशीलतेची दिवसेंदिवस वाढत्या प्रमाणात परीक्षा घेतली जात आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020, राष्ट्रीय आत्महत्या प्रतिबंध धोरण  2021 आणि विद्यापीठ अनुदान आयोग आणि केंद्रीय शिक्षण मंत्रालय यांनी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांनी सामुहिकपणे विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन सेवा, समावेशक संस्था परिसर आणि जबाबदारीसंबंधी यंत्रणांची तातडीची गरज अधोरेखित केली आहे.

मानसिक स्वास्थ्य ही केवळ सामाजिक निकड नव्हे तर ती आर्थिक गरज देखील आहे हे वर्ष 2023-24 आणि 2024-25 च्या आर्थिक सर्वेक्षणांमध्ये अधोरेखित झाले असून, त्यात राष्ट्रीय उत्पादकता टिकवून ठेवण्यासाठी निरोगी विद्यार्थी लोकसंख्या आवश्यक आहे यावर अधिक भर देण्यात आला आहे.

दुसरी राष्ट्रीय स्वास्थ्य परिषद

भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबई येथे 22 आणि 23 नोव्हेंबर 2025 या कालावधीत दुसरी राष्ट्रीय मानसिक स्वास्थ्य परिषद यशस्वीरीत्या संपन्न झाली. केंद्रीय शिक्षण मंत्रालयातील उच्च शिक्षण विभागाच्या सहकार्यासह आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेने देशभरातील 80 उच्च शिक्षण संस्था (एचईआयज), 115 शिक्षकगण सदस्य आणि 139 विद्यार्थ्यांना एकत्र आणले. वर्ष 2024 मध्ये आयआयटी हैदराबाद येथे झालेल्या पहिल्या स्वास्थ्य परिषदेतील घडामोडींच्या आधाराने यावर्षीच्या परिषदेने उच्च शिक्षण प्रणालींमध्ये मानसिक आरोग्य, लवचिकता आणि स्वास्थ्य यांचा अंतर्भाव करण्याच्या राष्ट्रीय कार्यक्रम पुढे नेला.

पदवीदान सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या उद्घाटनपर सत्रात माननीय व्यक्तींचा सत्कार आणि दीपप्रज्वलन करून या  दोन दिवसीय कार्यक्रमाची सुरुवात झाली. केंद्रीय शिक्षण मंत्रालयातील उच्च शिक्षण विभाग सचिव डॉ.विनीत जोशी यांनी उपस्थितांना संबोधित केल्यानंतर, आयआयटी मुंबईचे संचालक प्रा.शिरीष केदारे यांनी उद्घाटनपर भाषण केले.

परिषदेतील पहिल्या दिवशीच्या कार्यक्रमात, विद्यार्थ्यांच्या स्वास्थ्याला प्रोत्साहन देणारी समुपदेशन प्रणाली, समवयस्क मार्गदर्शक नेटवर्क्स, डिजिटल स्वास्थ्य साधने आणि संस्थात्मक भूमिका यांना अधोरेखित करणारे स्वास्थ्यविषयक प्रदर्शन, परिसंवाद तसेच गट चर्चांचा समावेश होता. “भारतीय उच्च शिक्षण क्षेत्रात स्वास्थ्याचे भविष्य” या विषयावर आधारित परिसंवादामध्ये उदयोन्मुख संस्थात्मक भूमिकेची चर्चा करण्यात आली तर “समृद्ध मने: शैक्षणिक विकासापासून आयुष्यभराच्या स्वास्थ्यापर्यंत” या विषयावर चर्चा करणाऱ्या गटातील सदस्यांनी शैक्षणिक आणि वैयक्तिक विकासात भावनिक लवचिकता कशा प्रकारे अंतर्भूत करता येईल याचा शोध घेतला.

शाश्वत परिणाम साधण्यासाठी, मदत यंत्रणा सशक्त करण्यासाठी आणि शैक्षणिक संस्कृतीमध्ये स्वास्थ्याचा समावेश करण्यासाठी सक्रीय संस्थात्मक यंत्रणा, जलद पाठबळ प्रणाली तसेच आंतर-संस्थात्मक भागीदारीची गरज उपस्थित तज्ञांनी अधोरेखित केली.

शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याच्या दरम्यानच्या दुव्यावर भर देणाऱ्या कॅम्पस वॉकेथॉनने परिषदेच्या दुसऱ्या दिवशीचे कार्यक्रम सुरु झाले. त्यानंतर, विद्यार्थी तसेच अध्यापक वर्गाच्या सहभागासह जीवन कौशल्ये, समवयस्कांकडून पाठींबा, समुपदेशन  क्षमता आणि डिजिटल स्वास्थ्य यांच्यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या कार्यशाळा पार पडल्या. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या गटांनी सादरीकरणांच्या माध्यमातून स्वास्थ्यविषय नाविन्यपूर्ण उपक्रमांचे दर्शन घडवले.

दुसऱ्या राष्ट्रीय स्वास्थ्य परिषदेने विद्यार्थी आणि अध्यापक वर्गाच्या स्वास्थ्यासाठी सुरु असलेल्या राष्ट्रीय पातळीवरील विविध प्रयत्नांना एक दिशा दिली आणि भारतीय उच्च शिक्षण संस्थांतील अध्यापकवर्गांमध्ये व्यावसायिक स्वास्थ्य समुदायाच्या निर्मितीसाठीचा पाया बळकट केला.वर्ष 2025-26 साठी व्यापक कृती योजना निश्चित करून या परिषदेने मानसिक स्वास्थ्याला भारतीय उच्च शिक्षण संस्थांच्या केंद्रस्थानी ठेवणाऱ्या लवचिक, समावेशक आणि जबाबदार शैक्षणिक परिसंस्था उभारण्याप्रती कटिबद्धतेला दुजोरा दिला.


निलीमा चितळे/संजना चिटणीस/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2193842) Visitor Counter : 5