सहकार मंत्रालय
VAMNICOM किनारी सहकारी संस्थांचे सक्षमीकरण: मत्स्य संस्थांचे बहुउद्देशीय सहकारी संस्थांमध्ये रूपांतर करण्यासाठी ‘वाम्निकॉम’चा पुढाकार
प्रविष्टि तिथि:
19 NOV 2025 5:02PM by PIB Mumbai
मुंबई, 19 नोव्हेंबर 2025
पुढील पाच वर्षांत दोन लाख बहुउद्देशीय सहकारी संस्था स्थापन करण्याच्या भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी ध्येयाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. सहकार मंत्रालय देशभरात जनजागृती आणि प्रशिक्षण कार्यक्रमांच्या माध्यमातून तळागाळातील सहकारी व्यवस्था मजबूत करत आहे. या परिवर्तनवादी मोहिमेचा भाग म्हणून, सहकार मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या पुणे येथील वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेने (वाम्निकॉम) महाराष्ट्रातील किनारी जिल्ह्यांमध्ये 7 ते 13 नोव्हेंबर 2025 या कालावधीत बहुउद्देशीय मत्स्य सहकारी संस्थांवर एक दिवसीय जनजागृती आणि प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
विद्यमान प्राथमिक कृषी पतसंस्थांचे बहुउद्देशीय प्राथमिक कृषी पतसंस्थांमध्ये रूपांतर करण्याच्या भारत सरकारच्या प्रमुख कार्यक्रमाचा हा एक अविभाज्य भाग आहे. या व्यापक रूपांतरण धोरणामध्ये बहुउद्देशीय मत्स्य सहकारी संस्था मॉडेल एक विशेष घटक म्हणून काम करते. यामुळे मत्स्य सहकारी संस्थांना त्यांच्या कार्याचा विस्तार करणे, सदस्यांचे उत्पन्न वाढवणे आणि मासेमारी व्यवसायाला बहुउद्देशीय सहकारी चौकटीत इतर पूरक आणि मूल्यवर्धित उपक्रमांशी जोडणे शक्य होणार आहे.
महाराष्ट्रात विविध ठिकाणी प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. 7 नोव्हेंबर 2025 रोजी पालघर जिल्ह्यातील अर्नाळा, वसई येथील महाराष्ट्र जिल्हा एकवीरा फिशरीज अँड फार्मिंग सहकारी संस्थेमधून या कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर 8 नोव्हेंबर 2025 ला ठाणे जिल्हा मच्छिमार मध्यवर्ती सहकारी संघ लि., पालघर येथे, 9 नोव्हेंबर 2025 ला वसई मच्छिमार सहकारी संघ लि., वसई येथे, 10 नोव्हेंबर 2025 ला अजिंक्य मच्छिमार सहकारी संस्था मर्यादित, दिवाळे, कोळीवाडा, बेलापूर, नवी मुंबई येथे, 11 नोव्हेंबर 2025 ला भाटी मच्छिमार सर्वोदय विविध सहकारी संस्था मर्यादित, भाटी मढ, मुंबई येथे, 12 नोव्हेंबर 2025 रोजी सातपाटी मच्छिमार विविध सहकारी संस्था मर्यादित, पालघर येथे आणि 13 नोव्हेंबर 2025 रोजी महिकावती माहीम फिशरमेन सर्वोदय सहकारी सोसायटी लि., मुंबई येथे प्रशिक्षण पार पडले.
‘वाम्निकॉम’चे सहाय्यक प्राध्यापक डॉ. अमित एन. बोरकर यांनी सर्व कार्यक्रमांचे समन्वयन केले. प्रत्येक ठिकाणी विविध मत्स्य आणि बहुउद्देशीय सहकारी संस्थांच्या 50 हून अधिक प्रतिनिधींनी यात सक्रिय सहभाग नोंदवला.
सहकारी नेते, सदस्य आणि व्यवस्थापकांना गतिशील आणि स्वयंपूर्ण बहुउद्देशीय संस्था म्हणून काम करण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि साधने प्रदान करण्याच्या उद्देशाने हे प्रशिक्षण कार्यक्रम तयार करण्यात आले होते. यामध्ये बहुउद्देशीय सहकारी संस्थांचे तत्त्व आणि व्यवस्थापन, मासेमारी व्यवसायाला विपणन, प्रक्रिया आणि निविष्ठा पुरवठा यांसारख्या पूरक उपक्रमांशी जोडणे, आर्थिक साक्षरता, डिजिटल सक्षमीकरण आणि प्रशासकीय सुधारणा, बहुउद्देशीय मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था आणि बहुउद्देशीय प्राथमिक कृषी पतसंस्था साठी आदर्श पोट-नियम आणि कायदेशीर चौकट, शाश्वत मासेमारी पद्धती आणि पर्यावरण संवर्धन अशा विविध विषयांवर मंथन करण्यात आले.
या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य मच्छिमार संघाचे माजी प्रतिनिधी रामदास पी. संधे, ‘वाम्निकॉम’चे डॉ. अमित एन. बोरकर, महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभागाचे माजी सहआयुक्त आणि सातपाटी मच्छिमार विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष विनोद विठोबा नाईक, तसेच मुंबईच्या सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशनचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. शिवाजी अरगडे यांसारख्या मान्यवर वक्त्यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी भारताच्या सहकारी चळवळीच्या आधुनिकीकरणासाठी उद्योजकीय नवनिर्मिती, पारदर्शक प्रशासन आणि व्यावसायिक व्यवस्थापनाचे महत्त्व अधोरेखित केले.
या विविध सत्रांमधून सहभागींना व्यवसायात विविधता आणण्याच्या संधी शोधण्यासाठी आणि सहकारी तत्त्वांवर आधारित शाश्वत व्यवसाय मॉडेल्स स्वीकारण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. मत्स्य सहकारी संस्थांचे बहुउद्देशीय मत्स्य सहकारी संस्थांमध्ये रूपांतर करून, किनारी आणि मासेमारी समुदाय भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान देतील, याची हमी या उपक्रमाद्वारे दिली जात आहे. सहकार मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली ‘वाम्निकॉम’ अशा उपक्रमांमधून ‘सहकारातून समृद्धी’ हे राष्ट्रीय ध्येय पुढे नेत आहे. हे कार्यक्रम केवळ व्यवस्थापकीय आणि उद्योजकीय क्षमताच वाढवत नाहीत, तर सर्वसमावेशक विकासाला चालना देऊन भारताच्या शाश्वत ग्रामीण विकासाचा पाया मजबूत करत आहेत.
नितीन फुल्लुके/निखिलेश चित्रे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2191739)
आगंतुक पटल : 108
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English