अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मुंबई डीआरआयने कोकेन तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला,  मुंबई विमानतळावर 17.18 कोटी रुपयांचे कोकेन जप्त; एकाला अटक

प्रविष्टि तिथि: 14 NOV 2025 8:22PM by PIB Mumbai

 

अमली पदार्थांच्या तस्करीविरोधातील एका सुनियोजित कारवाईत, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) मुंबई विभागीय युनिटने, मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर  एन्टेबे (युगांडा) येथून आलेल्या एका टांझानियन महिला प्रवाशाकडून 1718 ग्रॅम कोकेन जप्त केले. या जप्त केलेल्या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारातील अंदाजे किंमत 17.18 कोटी रुपये आहे.

मिळालेल्या विशिष्ट माहितीच्या आधारे, डीआरआय अधिकार्‍यांनी या महिला प्रवाशाला आगमन होताच अडवले. तिच्या सामानाची सखोल तपासणी केली असता, पांढरी पावडर असलेली 2 अन्न पाकिटे, पांढरी पावडर असलेला 1 प्लास्टिकचा कंटेनर आणि पांढऱ्या पावडरच्या गोळ्या असलेली 1 छोटी पिशवी आढळून आली. अधिकार्‍यांनी या प्रवाशाने गिळलेल्या दोन कॅप्सूलदेखील जप्त केल्या. एनडीपीएस  फील्ड टेस्ट किट वापरून जप्त केलेल्या पदार्थांची चाचणी केली असता, ते कोकेन असल्याचे सिद्ध झाले.

हा प्रतिबंधित माल मादक द्रव्ये आणि मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 च्या तरतुदींनुसार जप्त करण्यात आला असून, प्रवाशाला अटक करून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

'नशा मुक्त भारत' निर्माण करण्याच्या आपल्या संकल्पावर डीआरआय ठाम आहे. अमली पदार्थांना रोखणे, आंतरराष्ट्रीय तस्करी सिंडिकेट्स उद्ध्वस्त करणे आणि नागरिकांचे, विशेषतः तरुणांचे, अमली पदार्थांच्या धोक्यापासून संरक्षण करण्यासाठी डीआरआय अथकपणे कार्यरत आहे.

  

***

सोनाली काकडे/निखिलेश चित्रे/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2190240) आगंतुक पटल : 35
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English