परराष्ट्र व्यवहार मंत्रालय
पुण्यातील प्रादेशिक पारपत्र कार्यालयाच्या वतीने नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी ओपन हाऊस अर्थात एका खुल्या सत्राचे आयोजन
Posted On:
14 NOV 2025 4:37PM by PIB Mumbai
- पुण्यातील प्रादेशिक पारपत्र कार्यालयाच्या वतीने, दि. 12 नोव्हेंबर 2025 रोजी, पुणे इथल्या त्यांच्या कार्यालयाच्या आवारात नागरिकांसाठी ओपन हाऊस अर्थात एका खुल्या सत्राचे आयोजन करण्यात आले होते. पारपत्र अर्जदारांच्या तक्रारींचे निवारण करणे तसेच नागरिक आणि पारपत्र प्राधिकरण यांच्यात थेट संवादाची संधी उपलब्ध करून देणे, हा या आयोजनामागचा उद्देश होता.
- या खुल्या सत्राच्या माध्यमातून अर्जदारांना त्यांच्या समस्या मांडण्यासाठी, त्यावर स्पष्टीकरण मिळवण्यासाठी आणि पारपत्र सेवांशी संबंधित प्रकरणांचे त्वरीत निवारण करून घेण्यासाठीचे एक महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
- या सत्रात अनेक अर्जदार सहभागी झाले, त्यांनी पोलीस पडताळणीतील विलंब, पारपत्र पुन्हा जारी करण्याशी संबंधित प्रकरणांच्या बाबतीत दस्तऐवजांसंबंधी स्पष्टीकरण, जन्मतारीख बदलण्यासंबंधीची प्रकरणे आणि ऑनलाईन भेटींचे वेळापत्रक अशा विविध मुद्यांशी संबंधित अनेकविध समस्या मांडल्या. यावेळी प्रादेशिक पारपत्र अधिकाऱ्यांसह, इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही अर्जदारांशी संवाद साधला, आणि त्यांच्या बहुतांश समस्या तिथल्या तिथेच सोडवल्या जातील याची सुनिश्चितीही केली. त्याचवेळी पोलीस पडताळणीशी संबंधित प्रलंबित प्रकरणे, तातडीच्या कार्यवाहीसाठी संबंधित पोलीस संपर्क केंद्राकडे पाठवली गेली.
- ऑक्टोबर 2025 मध्ये, पुण्यातील पारपत्र कार्यालयाला एकूण 46,960 पारपत्र अर्ज प्राप्त झाले होते. यांपैकी 7,316 अर्ज तत्काळ , तर 39,644 अर्ज सामान्य प्रक्रियेअंतर्गत दाखल केले होते. या अर्जांवरील कार्यवाहीनंतर एकूण 42,883 पारपत्र जारी करण्यात आले असून, पारपत्र जारी करण्याचा दर 92% इतका राहिला आहे. तात्काळ वितरणासाठी आलेल्या अर्जांवरील प्रक्रिया पूर्ण करण्याकरता सरासरी 2 दिवसांचा कालावधी लागला, तर सामान्य प्रक्रियेअंतर्गत आलेल्या अर्जांवरील कार्यवाहीनंतर, सरासरी 16 दिवसांत ते जारी करण्यात आले. याव्यतिरिक्त, ऑक्टोबर 2025 मध्ये पोलीस पडताळणी प्रमाणपत्रासाठीचे (PCCs) 976 आणि ग्लोबल एन्ट्री प्रोग्राम (GEP) अंतर्गतचे 94 अर्जांवरची प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली.
- नागरिकांपर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून, पुण्यातील प्रादेशिक पारपत्र कार्यालयाने ऑक्टोबर 2025 मध्ये पारपत्र तुमच्या दारी हा उपक्रमही राबवला होता. या उपक्रमांतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, सिम्बायसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ आणि भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेत (FTII) फिरते पारपत्र वाहन देखील तैनात केले होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना त्यांच्या शैक्षणिक संस्थेच्या आवारातच, सुलभतेने पारपत्रसाठीचे अर्ज दाखल करता आले. या उपक्रमातून नागरिकांची सुलभता आणि नागरिक केंद्रित सेवा वितरणाप्रती पुण्यातील प्रादेशिक पारपत्र कार्यालयाची वचनबद्धता दिसून येते.
- तक्रार निवारणाची व्यवस्था अधिक सुरळीत करण्याच्या उद्देशाने पुण्यातील प्रादेशिक पारपत्र कार्यालयाने आपल्या, अधिकारक्षेत्राअंतर्गतच्या पुण्यातील पारपत्र सेवा केंद्रात (PSK), तसेच सर्व टपाल कार्यालयांतील पारपत्र सेवा केंद्रांमधील (POPSKs) अभिप्राय यंत्रणेचे सक्षमीकरण करायला घेतले आहे. त्याअनुषंगानेच तक्रारींवर वेळेत आणि प्रभावी तोडगा निघेल याची सुनिश्चिती करण्यासाठी केंद्रीय सार्वजनिक तक्रार निवारण आणि देखरेख प्रणाली(CPGRAMS), सार्वजनिक तक्रार निवारण पोर्टल आणि समाजमाध्यमे (Twitter/X) यांसारख्या व्यासपीठांच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या तक्रारी नियमितपणे पाहिल्या जात आहेत.
- यासोबतच अर्जदारांच्या सुविधेसाठी आणि प्रक्रियेतील विलंब कमी करण्यासाठी, सर्व पारपत्र सेवा केंद्र / टपाल कार्यालयांतील पारपत्र सेवा केंद्र आणि प्रादेशिक पारपत्र कार्यालयातील सूचना फलकांवर दस्तऐवजांची अद्ययावत सूची देखील लावण्यात आली आहे.
- भारतीय परराष्ट्र सेवेअंतर्गतचे (IFS) प्रादेशिक पारपत्र अधिकारी, विनोद गायकवाड यांनी सत्रात सहाभागी झालेल्या अर्जदारांशी संवाद साधला. सेवा वितरणात सुधारणा घडवून आण्याच्या दृष्टीने पारदर्शकता, सुलभता आणि नागरिकांसोबत सक्रिय संवादाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. अशा प्रकारच्या संवादांमुळे सार्वजनिक विश्वासार्हतेला बळकटी मिळते, तसेच पारपत्र जारी करण्याच्या प्रक्रियेची एकंदर कार्यक्षमताही सुधारते, असे त्यांनी नमूद केले.
- या ओपन हाऊस अर्थात खुल्या सत्राच्या उपक्रमामुळे नागरिकांच्या समाधानाचे प्रमाणही सुधारले, प्रलंबित कामांची संख्या घटली, तसेच प्रादेशिक पारपत्र कार्यालय आणि पोलीस प्राधिकरणामधील समन्वयही अधिक वाढला. नागरिक केंद्रित शासन-प्रशासन आणि पारदर्शक सेवा वितरणाप्रती आपली वचनबद्धता अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने, पुण्यातील प्रादेशिक पारपत्र कार्यालयच्या वतीने दि. 10 डिसेंबर 2025 रोजी, पुढील खुल्या सत्राचे आयोजन केले जाणार आहे.
***
सुषमा काणे/तुषार पवार/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2190125)
अभ्यागत कक्ष : 32