कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी, राष्ट्रीय सुशासन केंद्रात आज मालदीव प्रजासत्ताकचे गृह - स्थानिक प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अहमद सलीम यांच्या नेतृत्वातील 30 सदस्यांच्या शिष्टमंडळाशी संवाद साधला
प्रविष्टि तिथि:
13 NOV 2025 5:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर 2025
केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज मालदीव प्रजासत्ताकचे गृह - स्थानिक प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अहमद सलीम यांच्या नेतृत्वातील 30 सदस्यांच्या शिष्टमंडळाशी संवाद साधला. या शिष्टमंडळात मालदीव सरकारमधील 11 उपमंत्री आणि 18 वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश होता. हे शिष्टमंडळ मालदीवच्या मंत्री आणि अधिकाऱ्यांसाठी आयोजित केलेल्या स्मार्ट सिटी मिशनसंबंधी क्षमता निर्माण प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले आहे. राष्ट्रीय सुशासन केंद्राच्या (NCGG) वतीने या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले गेले असून, केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालय हे या प्रशिक्षण कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत.
केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी या कार्यक्रमाला संबोधित केले. दोन्ही देशांमधील परस्पर सामायिक वारसा आणि ऐतिहासिक संबंधांचा उल्लेख त्यांनी केला. मालदीवच्या अधिकाऱ्यांच्या क्षमता विकासाकरता आवश्यक सहकार्य करण्यासाठी, तसेच सार्वजनिक धोरण, सुशासन, नील अर्थव्यवस्था, सागरी संसाधनांचे व्यवस्थापन, महासागरीय तंत्रज्ञान, मत्स्योद्योग, स्टार्टअप विषयक धोरणे आणि पायाभूत सुविधांचा विकास, यांसारख्या विविध क्षेत्रांमधील ज्ञान आणि तज्ञता सामायिक करण्यासाठी तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मालदीवसोबत द्विपक्षीय संबंध दृढ करण्यासाठी भारताची वचनबद्धताही त्यांनी पुन्हा एकदा व्यक्त केली. दोन्ही देशांमधील आणि दोन्ही देशांच्या नागरिकांमधील परस्पर संबंध अधिक दृढ करण्यासाठी भारत सातत्यपूर्ण सहकार्य देत राहील असे आश्वासनही त्यांनी दिले.
मालदीव प्रजासत्ताकचे गृह - स्थानिक प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि भारत भेटीवर आलेल्या शिष्टमंडळाचे प्रमुख अहमद सलीम यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. प्रशिक्षणाची ही अनोखी संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी भारताचे आभार मानले. या प्रशिक्षण कार्यक्रमातून बरेच काही शिकता येईल, आणि मोठा अनुभव घेता येईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
दोन आठवड्यांचा हा प्रशिक्षण कार्यक्रम 3 नोव्हेंबर 2025 रोजी सुरु झाला असून, उद्या दि 14 नोव्हेंबर 2025 रोजी त्याची समाप्ती होईल. केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सहकार्याने या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले गेले आहे.

* * *
शैलेश पाटील/तुषार पवार/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2189759)
आगंतुक पटल : 24