संरक्षण मंत्रालय
'भविष्यातील युद्धसज्जतेच्या दृष्टीने संरक्षण उद्योग परिसंस्थेचा लाभ' या विषयावर एकात्मिक संरक्षण कर्मचारी मुख्यालय आणि भारतीय संरक्षण उत्पादक सोसायटी करणार विचारमंथन सत्र 2.0 चे आयोजन
प्रविष्टि तिथि:
13 NOV 2025 5:02PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर 2025
एकात्मिक संरक्षण कर्मचारी मुख्यालय आणि भारतीय संरक्षण उत्पादक सोसायटी यांनी नवी दिल्ली येथील माणेकशॉ केंद्र येथे 14 नोव्हेंबर 2025 रोजी विचारमंथन सत्र 2.0 आयोजित केले आहे. 'भविष्यातील युद्धसज्जतेच्या दृष्टीने संरक्षण उद्योग परिसंस्थेचा लाभ' अशी संकल्पना असलेल्या या विचारमंथन सत्राला संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान, संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह आणि सचिव (संरक्षण उत्पादन) संजीव कुमार संबोधित करतील. दिवसभर चालणाऱ्या या सत्रात संरक्षण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली अनेक उच्चस्तरीय सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे. या सत्रांमध्ये एकत्रित संरक्षण कर्मचारी मुख्यालय, तिन्ही सेवा मुख्यालये, संरक्षण उत्पादन विभाग, डीआरडीओ, शैक्षणिक संस्था आणि प्रमुख उत्पादन उद्योगांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत.
या चर्चासत्रांमध्ये भविष्यातील युद्ध, दारूगोळा आणि स्फोटके, स्वायत्त प्रणाली आणि भविष्यकालीन तंत्रज्ञानातील संशोधन आणि विकास अशा युद्धासाठी आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या क्षेत्रांवर चर्चा होईल. यामुळे राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षण क्षेत्राशी निगडित देशभरातील प्रमुख भागधारकांना एकत्र आणून एक व्यासपीठ उपलब्ध होईल, ज्यामुळे प्राधान्य क्षेत्रातीलआव्हाने, विकासाच्या संधींना ओळखणे आणि स्पष्ट कृतीयोग्य योजना शक्य होईल.
या सत्राच्या फलनिष्पत्तीमुळे आत्मनिर्भरतेला चालना मिळेल, भविष्यातील युद्धक्षेत्रातील भारताचे नेतृत्त्व सक्षम होईल आणि संरक्षण क्षेत्रातील कार्यसिद्धता आणि औद्योगिक क्षमताही अधिक मजबूत होतील.
* * *
शैलेश पाटील/भक्ती सोनटक्के/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2189707)
आगंतुक पटल : 25