आदिवासी विकास मंत्रालय
भगवान बिरसा मुंडा यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त मुंबईत आजपासून आदि चित्र हे राष्ट्रीय आदिवासी चित्रप्रदर्शन
Posted On:
10 NOV 2025 8:29PM by PIB Mumbai
मुंबई , 10 नोव्हेंबर 2025
भारताचा चैतन्यशील आदिवासी वारसा आणि सर्जनशीलतेचा सोहळा साजरा करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारच्या आदिवासी व्यवहार मंत्रालयाने, आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ लिमिटेड (ट्रायफेड) च्या सहकार्याने " आदि चित्र" - राष्ट्रीय आदिवासी चित्रप्रदर्शनाचे आयोजन केले आहे.

मुंबईतील पु. ल. देशपांडे कला अकादमी येथे आज दुपारी दोन वाजता या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके; महाराष्ट्र सरकारच्या आदिवासी विकास विभागाचे सचिव आयएएस विजय वाघमारे आणि आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या संचालक दीपाली मासिरकर उपस्थित होत्या.
आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली आणि ट्रायफेडच्या महाराष्ट्र शाखेच्या उपमहाव्यवस्थापक आणि प्रादेशिक व्यवस्थापक डॉ. तारुल डी. भावसार, आयआरएस यांच्या समन्वयाने आयोजित केलेले हे आठवडाभर चालणारे प्रदर्शन 10 ते 16 नोव्हेंबर 2025 या कालावधीत सकाळी 11:00 ते संध्याकाळी 7:00 वाजेपर्यंत जनतेसाठी खुले असेल.
"आदि चित्र" या प्रदर्शनात मांडलेल्या 100 हुन अधिक अप्रतिम आदिवासी चित्रांमधून भारतातील वैविध्यपूर्ण आदिवासी जमातींच्या कलात्मक अभिव्यक्ती आणि सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडते. या प्रदर्शनातून रसिक प्रेक्षकांना पारंपरिक कलाशैलींचा अद्भुत अनुभव मिळतो. यामध्ये
वारली चित्रकला – महाराष्ट्र
सौरा आणि पट्टचित्र – ओडिशा
गोंड आणि भिल्ल कला – मध्य प्रदेश
पिठोरा चित्रे – गुजरात
यांचा समावेश आहे.
यातील प्रत्येक चित्र एक कालातीत कथा मांडणारे असून आदिवासी जीवनाची ओळख असलेल्या निसर्ग, समुदाय आणि अध्यात्म यांच्यातील गाढ नात्याचे प्रतिबिंब दर्शवणारे आहे.

ट्रायफेडने आदी चित्र सारख्या उपक्रमांच्या माध्यमातून आदिवासी कारागिरांना सक्षम करण्याची, त्याच्या कलेला राष्ट्रीय मान्यता मिळवून देण्याची आणि देशांतर्गत सर्जनशीलतेला व्यापक जनाधार उपलब्ध करुन त्यांची शाश्वत उपजीविका सुनिश्चित करण्याची आपली वचनबद्धता कायम राखली आहे.

निलीमा चितळे/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2188550)
अभ्यागत कक्ष : 38