रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोकण रेल्वेच्या सर्व प्रादेशिक विभागांमध्ये "वंदे मातरम" या राष्ट्रीय गीताचा 150 वा वर्षपूर्ती सोहळा सामूहिक गायनाने झाला साजरा

Posted On: 07 NOV 2025 9:52PM by PIB Mumbai

 

कोकण रेल्वेने 7 नोव्हेंबर 2025 रोजी "वंदे मातरम्" या राष्ट्रीय गीताच्या वर्षभर चालणार्‍या स्मरणोत्सवाच्या उद्घाटन समारंभात सहभाग घेतला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, राष्ट्रीय अभिमान आणि एकतेची भावना जागृत ठेवणाऱ्या "वंदे मातरम्" या रचनेच्या 150  व्या वर्षपूर्ती निमित्त नवी दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते वंदे मातरम या गीताच्या रचनेला 150 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल एक टपाल तिकीट आणि नाणेही प्रकाशित करण्यात आले. 1875 मध्ये बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेले वंदे मातरम् हे गीत त्यांच्या आनंदमठ या कादंबरीचा एक भाग म्हणून बंगदर्शन या साहित्यिक नियतकालिकात प्रथम प्रकाशित झाले. मातृभूमीला, शक्ती, समृद्धी आणि दिव्यतेचे मूर्त रूप म्हणून आवाहन करणाऱ्या वंदे मातरम या गीताने भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत महत्वाची भूमिका बजावली आणि राष्ट्रीय अभिमान आणि एकतेची भावना जागवली.

देशव्यापी कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, कोकण रेल्वेच्या देशभरातील सर्व विभागांमध्ये "वंदे मातरम" या गीताच्या पूर्ण आवृत्तीचे सामूहिक गायन आयोजित करण्यात आले होते. बेलापूर येथील कॉर्पोरेट कार्यालयात संचालक व विभागप्रमुख यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोठ्या उत्साहाने या गायनात सहभागी झाले. अशाच प्रकारचे कार्यक्रम ईडी (एसपी अँड बीडी) कार्यालय, मडगाव येथे आयोजित करण्यात आले होते. यामध्ये सर्व अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले. रत्नागिरी आणि कारवार येथील प्रादेशिक कार्यालयांमध्ये देखील यामध्ये अधिकारी, कर्मचारी आणि प्रवाशांचा मोठा सहभाग राहिला. कोकण रेल्वे मार्गावरील सर्व स्थानकांवर कर्मचारी आणि प्रवाशांनी देशभक्तीच्या भावनेने मोठ्या उत्साहात हे गीत गायले.

वंदे मातरमला 150 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, बेलापूर येथील कॉर्पोरेट कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणाचे थेट प्रक्षेपण आयोजित करण्यात आले होते.

विविध स्थानकांवर सुरु असलेल्या गीताच्या वाद्य आवृत्तीने वातावरणात वंदे मातरमचे प्रतिध्वनी निनादत होते, त्याने संपूर्ण कोकण रेल्वे मार्गावर एकतेचे आणि देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले.

वंदे मातरम या गीताच्या 150 व्या वर्षपूर्ती निमित्त साजऱ्या होत असलेल्या स्मरणोत्सवाची ही सुरुवात असून, 7 नोव्हेंबर 2025 ते 7 नोव्हेंबर 2026 या कालावधीत कोकण रेल्वे मार्गावर विविध सांस्कृतिक, शैक्षणिक आणि जागरूकता उपक्रम आयोजित केले जातील. वंदे मातरम् या गीतामधून उमटणारी मातृभूमीप्रति समर्पणाची भावना अनेक पिढ्यांना प्रेरणा देत आहे. आपणही 150 वर्षांच्या या स्मृती सोहळ्याचा एक भाग आहोत, याचा कोकण रेल्वेला अभिमान आहे, आणि ती हा राष्ट्रीय वारसा पुढे नेईल.

***

सुषमा काणे/राजश्री आगाशे/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2187796) अभ्यागत कक्ष : 24
Read this releasein: English