आदिवासी विकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त मुंबईत "आदि चित्र - राष्ट्रीय आदिवासी चित्रकला प्रदर्शनाचे" उद्घाटन

प्रविष्टि तिथि: 07 NOV 2025 10:11PM by PIB Mumbai

 

भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त आदिवासी सर्जनशीलता आणि सांस्कृतिक अभिमानाला एकत्र आणणाऱ्या एका उत्साही समारंभात, आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांनी आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या संचालक दीपाली मासिरकर आणि महाराष्ट्र सरकारच्या आदिवासी विकास विभागाचे  सचिव आयएएस विजय वाघमारे यांच्यासमवेत, मुंबईतील प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे " आदि चित्र" - राष्ट्रीय आदिवासी चित्रकला प्रदर्शनाचे उद्घाटन केले.

केंद्र सरकारच्या आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली आणि आदिवासी सहकारी विपणन विकास फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ट्रायफेड) यांच्या सहकार्याने आयोजित या प्रदर्शनाचे उद्दिष्ट भारतातील आदिवासी समुदायांचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, विविधता आणि कलात्मक प्रतिभा प्रदर्शित करणे आहे.

या प्रदर्शनात 100 हून अधिक आकर्षक आदिवासी चित्रे आहेत, ज्यातून देशभरातील आदिवासी कलाकारांच्या परंपरा आणि सर्जनशील अभिव्यक्तींची झलक दिसते. प्रदर्शनात असलेल्या कला प्रकारांमध्ये समाविष्ट चित्रे:

महाराष्ट्रातील वारली चित्रे

ओडिशातील सौरा आणि पट्टाचित्र चित्रे

मध्य प्रदेशातील गोंड आणि भिल्ल चित्रे

गुजरातमधील पिथोरा चित्रे

यातील प्रत्येक कलाकृती एक वेगळी कहाणी सांगते. भारतीय आदिवासी परंपरा दर्शवणाऱ्या या कहाण्यांचे मूळ निसर्ग, संस्कृती आणि अध्यात्म यांच्यातील घनिष्ठ संबंधांमध्ये आहे.

या कार्यक्रमात बोलताना प्रो. अशोक उईके यांनी आदिवासी कलेला प्रोत्साहन देऊन त्यांचे  जतन करण्याबाबतची सरकारची वचनबद्धता अधोरेखित केली. 'आदि चित्र' सारखे उपक्रम केवळ भारताची स्वदेशी संस्कृती साजरी करत नाहीत तर आदिवासी कलाकारांना ओळख व रोजगाराच्या संधी मिळवून देऊन सक्षम बनविण्याचे काम करतात असे ते म्हणाले.

हे प्रदर्शन 10 ते 16 नोव्हेंबर 2025 या कालावधीत नागरिकांना पाहण्यासाठी खुले असेल. देशातल्या आदिवासी समुदायांच्या सर्जनशीलतेचा अनुभव यामध्ये घेता येईल तसेच त्यांचे निसर्ग आणि परंपरेशी असलेले अतूट नाते अनुभवता येईल. 

ट्रायफेड ही आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या अखत्यारितील संस्था बाजारपेठ उपलब्ध करुन देणे, कलेला प्रोत्साहन आणि सांस्कृतिक आदानप्रदान कार्यक्रम याद्वारे आदिवासी कलाकारांना पाठबळ देण्याचे काम सातत्याने करत आहे. या कार्यक्रमातून आदिवासी सक्षमीकरणाला बळ देणे व समावेशक सांस्कृतिक विकासाला चालना देणे  याबाबतचा सरकारचा दृष्टीकोन प्रतिबिंबित होतो.   

***

निलिमा चितळे / सुरेखा जोशी/ वासंती जोशी/ परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2187664) आगंतुक पटल : 12
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English