आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एम्स नागपुर येथे सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान (ART) केंद्र आणि अत्याधुनिक रक्तसुरक्षा सुविधा उद्घाटन

प्रविष्टि तिथि: 06 NOV 2025 9:31PM by PIB Mumbai

नागपूर, 6 नोव्हेंबर 2025 

 

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) नागपूरने आरोग्यसेवेतील आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान (Assisted Reproductive Technology ART) केंद्र, वैयक्तिक दाता न्यूक्लिक अॅसिड तपासणी (Individual Donor- Nucleic Acid Testing ID-NAT) प्रयोगशाळा आणि रक्त किरणोत्सारक युनिट यांचे उद्घाटन झाले. या प्रसंगी प्रा. (डॉ.) प्रशांत जोशी, कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, एम्स नागपूर उपस्थित होते.

नवीन सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान (ART) केंद्र हे मध्य भारतातील प्रजनन आरोग्य क्षेत्रातील एक परिवर्तनशील पाऊल ठरले आहे. सुमारे ५ कोटी रुपये खर्चातून उभारलेले हे अत्याधुनिक इन विट्रो फर्टिलायझेशन ( IVF) केंद्र आधुनिक ऑपरेशन थिएटर, जागतिक दर्जाच्या प्रयोगशाळा, प्रगत इनक्यूबेटर प्रणाली आणि क्रायोप्रिझर्वेशन युनिट्सने सुसज्ज आहे. हे केंद्र एकाच छताखाली वंध्यत्व उपचाराच्या सर्व सेवा उपलब्ध करून देईल आणि उच्च दर्जाची सुरक्षा व यशाचे मानदंड सुनिश्चित करेल. या स्थापनेमुळे एम्स नागपूर हे महाराष्ट्र आणि मध्य भारतातील पहिले शासकीय संस्थान ठरले आहे जे परवडणाऱ्या दरात वैज्ञानिक पुराव्यावर आधारित वंध्यत्व उपचार उपलब्ध करून देईल. 

हे केंद्र कमी आणि मध्यम उत्पन्न गटातील जोडप्यांना लाभदायी ठरेल तसेच प्रजनन औषधशास्त्रातील प्रशिक्षण, संशोधन आणि नवोन्मेषासाठी एक केंद्र म्हणून कार्य करेल. याशिवाय, एम्स नागपूरने ट्रान्सफ्युजन मेडिसिन आणि ब्लड सेंटर विभागांतर्गत दोन महत्त्वाच्या रक्तसुरक्षा सुविधा सुरू केल्या आहेत वैयक्तिक दाता न्यूक्लिक अॅसिड तपासणी ( ID- NAT) प्रयोगशाळा आणि रक्त किरणोत्सारक युनिट. 

ID-NAT प्रयोगशाळेत प्रत्येक रक्तदात्याचे नमुने HIV, हेपाटायटीस B आणि हेपाटायटीस C साठी आण्विक पातळीवर तपासले जातात. पारंपरिक सिरोलॉजिकल चाचण्यांपेक्षा ही तंत्रज्ञान "विंडो पिरियड' दरम्यान विषाणूंची लवकर ओळख करून देते, ज्यामुळे रक्ताद्वारे पसरणाऱ्या संसर्गाचा धोका कमी होतो. सुमारे 2.5 कोटी रुपये खर्चातून उभारलेली ही सुविधा महाराष्ट्र आणि मध्य भारतातील पहिले शासकीय संस्थान ठरते ज्याने ही प्रगत रक्त तपासणी तंत्रज्ञान स्वीकारले आहे.

ही सुविधा विशेषतः समाजातील दुर्बल, आदिवासी आणि सिकल सेल आजारग्रस्त रुग्णांसाठी उपयुक्त ठरेल.

सुमारे 50 लाख खर्चून आण्विक ऊर्जा विभागाअंतर्गत बोर्ड ऑफ रेडिएशन अँड आयसोटोप टेक्नॉलॉजीकडून खरेदी केलेले रक्त किरणोत्सारक युनिट मध्य भारतातील पहिले आणि महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयांमधील पहिले आहे. हे युनिट ट्रान्सफ्युजन असोसिएटेड ग्राफ्ट व्हर्सेस होस्ट डिसीज (TA-GVHD) या दुर्मिळ पण जीवघेण्या प्रतिक्रियेला प्रतिबंध करते. हे विशेषतः मूत्रपिंड किंवा अस्थिमज्जा प्रत्यारोपण घेत असलेल्या तसेच सिकल सेल रोगग्रस्त रुग्णांसाठी लाभदायी ठरेल.

आजपर्यंत एम्स नागपूर येथे एकूण ५२ मूत्रपिंड प्रत्यारोपण यशस्वीरीत्या करण्यात आले असून यकृत प्रत्यारोपण कार्यक्रम सुरू करण्याची तयारी सुरु आहे. विदर्भातील आदिवासी लोकसंख्या आणि सिकल सेल रोगाचे प्रमाण लक्षात घेता, या सुविधा या समुदायांसाठी जीवनदायी ठरतील आणि सुरक्षित रक्तपुरवठा व अत्याधुनिक प्रत्यारोपण सेवांपर्यंत त्यांचा सहज प्रवेश सुनिश्चित करतील.

प्रा. (डॉ.) प्रशांत जोशी यांच्या नेतृत्वाखाली या महत्वाच्या उपक्रमांना डॉ. मुंडले आणि त्यांच्या प्रसूती व स्त्रीरोग विभागातील टीम तसेच डॉ. सौम्य दास, ट्रान्सफ्युजन मेडिसिन आणि ब्लड सेंटर विभागातील प्राध्यापक यांनी मार्गदर्शन केले.

मुख्यमंत्री यांनी संस्थेच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि आरोग्यसेवा सर्व समाजघटकांपर्यंत परवडणाऱ्या आणि पुराव्यावर आधारित स्वरूपात पोहोचवण्याच्या या उपक्रमाचे अभिनंदन केले.

या तीन अत्याधुनिक सुविधांमुळे एम्स नागपूरने सुलभ, समतोल आणि जागतिक दर्जाची आरोग्यसेवा पुरविण्याच्या आपल्या ध्येयाकडे आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. "Passion for Excellence* या ब्रीदवाक्याने प्रेरित होऊन एम्स नागपूर नवोन्मेष, रुग्ण सुरक्षा आणि समावेशक आरोग्यसेवा पुरविण्याच्या बांधिलकीसह कार्य करत आहे.

 

* * *

(स्रोत : PRO AIIMS) | पीआयबी नागपूर | धनंजय वानखेडे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2187163) आगंतुक पटल : 29
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English