माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

महाराष्ट्रातील माध्यम प्रतिनिधींचा राजस्थानातील केंद्र सरकारच्या विकास उपक्रमांचा अभ्यास दौरा

प्रविष्टि तिथि: 03 NOV 2025 10:00PM by PIB Mumbai

जयपूर, 3 नोव्हेंबर 2025

पत्र सूचना कार्यालय, मुंबई तर्फे महाराष्ट्रातील वरिष्ठ संपादक आणि पत्रकारांचा समावेश असलेले एक माध्यम शिष्टमंडळ 2 ते 8 नोव्हेंबर 2025 दरम्यान राजस्थानच्या माध्यम दौऱ्यावर असून या दौऱ्याचा उद्देश राजस्थान राज्यात राबवण्यात येणाऱ्या केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीचा अभ्यास करणे, हा आहे. 

3 नोव्हेंबर रोजी जोधपूर भेटीदरम्यान, या प्रतिनिधी मंडळाने सेंट्रल अ‍ॅरिड झोन रिसर्च इन्स्टिट्यूट (सीएझेडआरआय), अ‍ॅरिड फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट (AFRI) आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हँडलूम टेक्नॉलॉजी (IIHT) यासह अनेक केंद्रीय संस्थांची कामगिरी आणि कामकाजाचे निरीक्षण केले. दिवसाचा समारोप जोधपूर शहराच्या ऐतिहासिक गल्ल्यांमधून हेरिटेज वॉकने झाला.

सीएझेडआरआय: वाळवंटातील शेतीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम

सीएझेडआरआयचे संचालक डॉ. एस.पी.एस. तन्वर यांनी पत्रकारांना थर उष्ण वाळवंट तसेच लेह सारख्या शुष्क आणि शित वाळवंट प्रदेशांसाठी शाश्वत कृषी मॉडेल विकसित करण्याच्या संस्थेच्या अग्रगण्य कार्याबद्दल माहिती दिली. त्यांनी सीएझेडआरआय च्या वाळूच्या टेकड्यांचे स्थिरीकरण, पाणी आणि नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन, फळबाग आणि पशुधन विकासावरील संशोधनावर प्रकाश टाकला. या संशोधनामुळे शुष्क क्षेत्रात कृषी उत्पादकता आणि हिरवाई लक्षणीयरीत्या सुधारली आहे.

संशोधकांनी कमी पाण्यात, कमी खर्चात होणाऱ्या पीक जाती, एकात्मिक शेती मॉडेल आणि सौरऊर्जेला शेतीशी जोडणाऱ्या ‘ॲग्रो-व्होल्टेइक’ प्रणाली यावरील प्रगती देखील सामायिक केली. प्रतिनिधीमंडळाने चारा उत्पादन, माती व्यवस्थापन आणि भरड धान्याच्या मूल्यवर्धनातील नवोन्मेष प्रदर्शित करणाऱ्या शास्त्रज्ञांशी संवाद साधला.

AFRI: शुष्क प्रदेशात शाश्वत वनीकरण

शुष्क वन संशोधन संस्थेत (AFRI) प्रभारी  संचालक डॉ. तरुण कांत यांनी संस्थेच्या प्रमुख संशोधन आणि विकास उपक्रमांची ओळख करून दिली. या उपक्रमात झाडांच्या प्रजातींची सुधारणा कार्यक्रम, दर्जाहीन जमिनींचे पुनर्वसन आणि मृदा संवर्धन प्रयत्नांचा समावेश आहे.

प्रतिनिधीमंडळाला शुष्क वन संशोधन संस्थेच्या वन मृदा आरोग्य कार्ड, पर्यावरण जागरूकता मोहिमा आणि वृक्ष वाढ विषयक  मेळावे यासारख्या कार्याबद्दल देखील माहिती देण्यात आली. या उपक्रमांचा उद्देश शेतकरी, शाळा आणि स्थानिक समुदायांमध्ये पर्यावरणासंबंधी शाश्वतता वाढवणे, हा आहे.

IIHT: हातमाग उद्योगाचे सक्षमीकरण

प्रतिनिधीमंडळाने जोधपूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हँडलूम टेक्नॉलॉजी (IIHT) ला देखील भेट दिली. संस्थेचे संचालक के. जे. शिवज्ञानम यांनी कौशल्य-आधारित अभ्यासक्रम, तंत्रज्ञान समावेश आणि उद्योजकता विकास कार्यक्रमांद्वारे हातमाग क्षेत्राचे आधुनिकीकरण करण्याच्या संस्थेच्या चालू प्रयत्नांबद्दल माहिती दिली.

हातमाग उद्योगाच्या गरजांशी अभ्यासक्रमांचे संरेखन करून तसेच प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना (PMKVY) सारख्या सरकार-समर्थित योजनांची अंमलबजावणी करून 100% रोजगारक्षमता मिळवण्याचे या संस्थेचे उद्दिष्ट असल्याचे शिवज्ञानम् यांनी सांगितले. हातमाग उद्योगात नवोन्मेषाला चालना देण्यात आणि तरुणांना सक्षम करण्यात ही संस्था महत्त्वाची भूमिका बजावते, असे ते म्हणाले.

एका वेगळ्या सत्रात, विकास आयुक्त (हस्तकला) कार्यालयाचे सहाय्यक संचालक रवीवीर चौधरी यांनी हस्तकला क्षेत्रातील उपजीविका वाढविण्यासाठी तांत्रिक प्रशिक्षण, बाजारपेठ उपलब्धता आणि आर्थिक सहाय्य योजनांच्या माध्यमातून कारागिरांना पाठबळ देण्यासाठी हाती घेतलेल्या विविध उपक्रमांबद्दल या मंडळाला माहिती दिली.

सांस्कृतिक अनुभव: जोधपूरमधील हेरिटेज वॉक

पत्रकारांच्या पथकाने जोधपूर हेरिटेज वॉकमध्येही भाग घेतला आणि ब्लू सिटी अशी ओळख असलेल्या जोधपूरचा समृद्ध इतिहास, संस्कृती आणि वास्तुकला यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.

दौऱ्याचा पुढचा टप्पा

पत्र सूचना कार्यालय मुंबईचे प्रतिनिधिमंडळ जैसलमेरला (4-5 नोव्हेंबर) भेट देईल आणि सीमा सुरक्षा दलाच्या नेतृत्वाखालील प्रकल्प आणि नवीकरणीय ऊर्जा (सौर आणि पवन) उपक्रमांचा अभ्यास करेल. त्यानंतर बाडमेरला (6 नोव्हेंबर) भेट देऊन रिफायनरी संचलन आणि सर्वोत्तम पद्धतींचा अभ्यास करेल.

हा प्रतिनिधीमंडळ दौरा जयपूरमध्ये (7-8 नोव्हेंबर) संपेल. पत्रकार या शहरातील रेल्वे प्रकल्प आणि प्रमुख वारसा स्थळांना भेट देतील.

हा पत्रकार दौरा महाराष्ट्रातील पत्रकारांना केंद्र सरकारच्या योजनांच्या अंमलबजावणीचे प्रत्यक्ष निरीक्षण करण्याची आणि राजस्थानमधील विकासकथा आपल्या वाचकांसोबत सामायिक करण्याची एक अनोखी संधी प्रदान करतो.

 

निलीमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2186103) आगंतुक पटल : 33
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English