विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
गोवा येथील राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्था आपल्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त 'जीवाष्म -वसुंधरेचे कालमापक' या विषयावरील राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करणार
प्रविष्टि तिथि:
24 OCT 2025 4:25PM by PIB Mumbai
वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद-सीएसआयआर -राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्था, गोवा 29 ते 31 ऑक्टोबर 2025 दरम्यान डोना पॉला येथील त्यांच्या संकुलात संस्थेच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त आणि पॅलेंटोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त "जीवाष्म : वसुंधरेचे कालमापक" या विषयावर राष्ट्रीय स्तरावरील परिषद आयोजित करणार आहे. या परिषदेमध्ये पुरातत्त्वशास्त्र आणि स्तरशास्त्राच्या (स्ट्रॅटिग्राफी) विविध शाखांमध्ये कार्यरत विद्वान, संशोधक आणि विद्यार्थी एकत्र येणार आहेत. यावेळी होणाऱ्या विविध चर्चासत्रांमध्ये प्रख्यात वैज्ञानिक सहभागी होणार असून या क्षेत्रातील अद्ययावत शोध, संशोधन आणि उल्लेखनीय प्रगतीबद्दल विचारांची देवाणघेवाण करणार आहेत. याशिवाय अगदी अलीकडील संशोधन आणि या क्षेत्रातली उदयोन्मुख दृष्टिकोनाविषयी माहिती देणारे सादरीकरण देखील केले जाणार आहे.
या परिषदेत देशाच्या विविध भागांतून 300 प्रतिनिधी सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे. परिषदेच्या उदघाटनपर कार्यक्रमाला भूगर्भ शास्त्र, तेल आणि नैसर्गिक वायू उद्योग क्षेत्रातील तज्ञ तसेच विद्यार्थी आणि संशोधक उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमामुळे पुरातत्त्वशास्त्राशी संबंधित काही लोकप्रिय विषयांवर वैज्ञानिक चर्चांसाठी एक व्यासपीठ उपलब्ध होईल, यामध्ये मान्सूनचा भूतकाळ आणि भविष्य, डायनासोर पुन्हा प्रकट होण्याची शक्यता, समुद्राच्या पातळीत होणाऱ्या बदलांमुळे किनारपट्टीवरील शहरांवर होणारा परिणाम, पाण्याखाली गेलेल्या द्वारका आणि रामसेतूविषयीचे मिथक आणि वास्तव, तसेच प्रदूषण निरीक्षणामध्ये पुरातत्त्वशास्त्राची उपयुक्तता यांसारख्या विषयांचा समावेश असेल. पॅलेंटोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया ही संस्था 26 जानेवारी 1950 रोजी स्थापन झालेली, देशातील सर्वात प्राचीन आणि कार्यरत असलेल्या वैज्ञानिक संस्थांपैकी एक आहे. व्याख्याने, पुरस्कार आणि पॅलेंटोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाच्या जर्नलच्या प्रकाशनांच्या माध्यमातून भारतात पुरातत्त्वशास्त्र आणि स्तरशास्त्राच्या संशोधनात उल्लेखनीय कामगिरी करण्यात ही संस्था अग्रगण्य आहे.
जीवाश्मांच्या माध्यमातून पृथ्वीच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी ही संस्था आपल्या उपक्रमांमधून सदैव प्रोत्साहन देत असते.
या परिषदेमुळे भूगर्भ शास्त्रज्ञांमध्ये ज्ञानाची देवाणघेवाण होऊन सहकार्य वृद्धिंगत होईल. ही परिषद म्हणजे जीवाश्मांच्या अभ्यासातून आपल्या ग्रहाची कथा शोधण्याच्या या संस्थेच्या 75 वर्षांच्या अविरत योगदानाला दिलेली मानवंदना आहे.
***
सुषमा काणे / भक्ती सोनटक्के / परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2182225)
आगंतुक पटल : 28
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English