नौवहन मंत्रालय
‘भारत सागरी सप्ताह 2025’ मध्ये मुरगाव बंदर प्राधिकरण करणार 3 हजार कोटी रुपयांचे 24 सामंजस्य करार
‘आयएमडब्ल्यू 2025’ मध्ये गोवा येथे 27 ऑक्टोबरला राज्य सत्राचे आयोजन
प्रविष्टि तिथि:
15 OCT 2025 8:00PM by PIB Mumbai
पणजी, 15 ऑक्टोबर 2025
एमपीए म्हणजेच मुरगाव बंदर प्राधिकरणाच्या वतीने 27 ते 31 ऑक्टोबर दरम्यान मुंबईतील नेस्को गोरेगाव येथील ‘बॉम्बे एक्झिबिशन सेंटर’ येथे होणाऱ्या भारत सागरी सप्ताह कार्यक्रमात 3 हजार कोटी रुपयांचे 24 सामंजस्य करार करण्यात येणार आहेत, अशी माहिती ‘एमपीए’ चे अध्यक्ष डॉ. एन. विनोदकुमार यांनी दिली. ते आज, 15 ऑक्टोबर रोजी पणजी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

भारत सागरी सप्ताहामध्ये 100 हून अधिक देशांमधून एक लाखांहून अधिक प्रतिनिधी येतील अशी अपेक्षा आहे; तसेच 500 पेक्षा जास्त प्रदर्शक सहभागी होणार आहेत. त्यामुळे हा सप्ताह गुंतवणूक, नवोन्मेषी उपक्रम आणि धोरणात्मक प्रगतीसाठी जागतिक उत्प्रेरक ठरेल, असे डॉ. विनोदकुमार यावेळी म्हणाले. "आयएमडब्ल्यू 2025 हा सप्ताह ‘मेरीटाईम इंडिया व्हिजन 2030’ आणि अमृतकाळ मेरीटाईम व्हिजन 2047 अंतर्गत राष्ट्रीय प्राधान्यांना पाठिंबा देणारा आहे. तसेच जागतिक सागरी परिसंस्थेत एक प्रमुख खेळाडू म्हणून भारताचे स्थान बळकट होईल, अशी अपेक्षा आहे," असे सांगून डॉ. विनोदकुमार पुढे म्हणाले की, या कार्यक्रमात जागतिक स्तरावरील 250 हून अधिक वक्ते वेगवेगळ्या देशांच्या आणि राज्यांच्या सत्रांमध्ये आणि परिषदांमध्ये, गुंतवणूकदारांच्या गोलमेज परिषदांमध्ये सहभागी होतील.

"या कार्यक्रमामुळे 10 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीच्या संधी निर्माण होतील, अशी अपेक्षा आहे. या कार्यक्रमात मुरगाव बंदर प्राधिकरणाच्या वतीने 3,000 कोटी रुपयांचे 24 सामंजस्य करार करण्यात येणार आहेत. ज्यामध्ये बंदरातील काही ‘बर्थ’चे नूतनीकरण आणि सौर प्रकल्पांचा समावेश असणार आहे. याशिवाय, गोवा येथे 27 तारखेला या कार्यक्रमात राज्य अधिवेशन आयोजित करण्यात येणार आहे. या अधिवेशनामध्ये राज्याच्या सागरी शक्यतांचा अंदाज येईल," असे ते म्हणाले.
VDJX.jpeg)
वर्ष 2047 पर्यंत सागरी क्षेत्रात महासत्ता बनण्यास भारत सज्ज आहे, असे सांगून अध्यक्ष म्हणाले की, येत्या काळात मुरगाव बंदरात अनेक विकास कामे करण्यात येतील. "देशातील सागरी क्षेत्राच्या एकूण विकासाचा एक भाग म्हणून, मुरगाव बंदरात आगामी एक किंवा दोन महिन्यांत कंटेनर जहाजे येण्यास प्रारंभ होईल, अशी अपेक्षा आहे. फीडर जहाजे मुंबईहून येतील आणि गुजरातमधील मुंद्रा बंदराशी जोडण्यात येतील.एमपीए आधीच एक हरित बंदर आहे कारण आम्ही आमच्या अंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्पाद्वारे 3 मेगावॅट वीज निर्मिती करत आहोत जे आमच्या वापराची शतप्रतिशत काळजी घेत आहे. "तथापि, नवीन क्रूझ टर्मिनल कार्यान्वित झाल्यानंतर आम्हाला अधिक वीज आवश्यक असेल, म्हणून आम्ही 2 मेगावॅट वीज निर्मितीसाठी आणखी एक सौर प्रकल्प राबवणार आहोत," असे त्यांनी नमूद केले.
हरित बंदर प्रमाणन कार्यक्रमांतर्गत एमपीएला देशातील पहिले हरित बंदर घोषित करण्यात आले आहे. सेंटर ऑफ एक्सलन्स ऑन एन्व्हायर्नमेंटल, सोशल अँड गव्हर्नन्स अँड सर्क्युलॅरिटी, मुंबई यांनी ही मान्यता दिली आहे. हे बंदर एक स्मार्ट बंदर बनण्याची तयारी करत आहे, ज्यामध्ये परिचालन आणि दूरसंवाद वाढविण्यासाठी 5G सारख्या तंत्रज्ञानाचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेत एमपीएचे उपाध्यक्ष विनायक राव देखील उपस्थित होते.
आयएमडब्ल्यू-2025 कार्यक्रम स्थळी असलेल्या एका समर्पित दालनात एमपीए आपला आधुनिकीकरणाचा प्रवास, कार्गो हाताळणी क्षमता, क्रूझ टर्मिनल विकास आणि शाश्वतता उपक्रम प्रदर्शित करेल. राज्याच्या विकसित होत असलेल्या सागरी पायाभूत सुविधा ठळकपणे सादर केल्या जातील, ज्यामुळे राष्ट्रीय सागरी विकासात गोव्याची भूमिका अधिक बळकट होईल.
भारत सागरी सप्ताह 2025 हा बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाचा पथदर्शी कार्यक्रम, सागरी तंत्रज्ञान, बंदर विकास, लॉजिस्टिक्स आणि शाश्वततेतील अत्याधुनिक प्रगती प्रदर्शित करण्यासाठी एक गतिमान मंच म्हणून काम करतो. भारताच्या सागरी क्षेत्राचे भवितव्य आणि जागतिक व्यापार आणि नील अर्थव्यवस्थेच्या वाढीमध्ये त्याच्या भूमिकेला आयाम देण्यासाठी सहकार्याला, नवोन्मेषाला प्रोत्साहन देऊन आंतरराष्ट्रीय भागीदारी मजबूत करण्याचे या शिखर परिषदेचे उद्दिष्ट आहे.

पाच दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात जागतिक नेते, धोरणकर्ते, गुंतवणूकदार आणि उद्योगातील हितधारकांना एकत्र आणून देशाच्या सागरी परिवर्तनावर केंद्रित संकल्पनाधारित सत्रे आणि उच्चस्तरीय परिसंवाद होतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आयएमडब्ल्यू 2025 ला उपस्थित राहण्याची अपेक्षा असून तिथे ते जागतिक सागरी सीईओ फोरममध्ये बीजभाषण करतील.
आगामी भव्य कार्यक्रमाविषयी सर्वसामान्यांना अवगत करण्यासाठी एमपीए संपूर्ण गोव्यात आयएमडब्ल्यू-2025 ला व्यापक प्रसिद्धी देत आहे. मुंबईतील भव्य कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी बंदर त्यांच्या हितधारकांना देखील प्रोत्साहित करत आहे. सप्टेंबर 2025 मध्ये, एमपीएने आयएमडब्ल्यू 2025 चा पूर्वावलोकन कार्यक्रम म्हणून पणजी येथे एका भव्य रोड शो चे आयोजन केले होते, ज्यामध्ये गोव्याचे माननीय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि गोव्याचे वाहतूक, उद्योग, व्यापार आणि वाणिज्य मंत्री मौविन गोडिन्हो उपस्थित होते.
शैलेश पाटील/सुवर्णा बेडेकर/वासंती जोशी/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2179608)
आगंतुक पटल : 45
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English