संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

दक्षिणी कमांडने ASCEND 2025 परिसंवादाच्या माध्यमातून धोरणात्मक संप्रेषणावरील राष्ट्रीय संवादाचे केले नेतृत्व

Posted On: 11 OCT 2025 8:31PM by PIB Mumbai

पुणे, 11 ऑक्टोबर 2025

 

दक्षिणी कमांड मुख्यालयाने 10 आणि 11 ऑक्टोबर 2025 रोजी पुण्यातील राजेंद्र सिंहजी आर्मी मेस अँड इन्स्टिट्यूट (RSAMI) येथे असेन्ड (ASCEND) 2025 - ‘अलाइनिंग स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन फॉर एन्ड्युरिंग नरेटिव्ह डॉमिनन्स’ या शीर्षकाखाली धोरणात्मक संप्रेषणावरील दोन दिवसीय परिसंवादाचे आयोजन केले होते. माहितीच्या युगात कथन वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सातत्यपूर्ण राष्ट्रीय प्रयत्न संस्थात्मक करण्याच्या उद्देशाने या उपक्रमाची संकल्पना करण्यात आली होती. हा परिसंवाद या क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण उपक्रम ठरला.

या परिसंवादात वरिष्ठ संरक्षण अधिकारी, धोरणकर्ते, माजी सैनिक, माध्यम क्षेत्रातील तज्ञ, शिक्षण क्षेत्रातील तज्ञ आणि उद्योग क्षेत्रातील तज्ञ सहभागी झाले होते. सहभागींनी माहितीच्या युगात राष्ट्रीय शक्तीचे एक महत्त्वाचे साधन म्हणून धोरणात्मक संप्रेषणाच्या भूमिकेवर चर्चा केली. 

दक्षिण कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ लेफ्टनंट जनरल धीरज सेठ, पीव्हीएसएम, एव्हीएसएम, यांनी या परिसंवादात मुख्य भाषण केले. धोरणात्मक संप्रेषण हे राष्ट्रीय सुरक्षेचे मुख्य कार्य म्हणून उदयास आले आहे, असे सेठ यांनी सांगितले. भारताची कहाणी सत्यावर आधारित, आपल्या मूल्यांमध्ये रुजलेली आणि ठाम कृती संलग्न असली पाहिजे तेव्हाच दीर्घकालीन कथन वर्चस्व साध्य होईल, असेही ते म्हणाले.  

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे अध्यक्ष आलोक जोशी हे या चर्चासत्राला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी आलोक जोशी आणि वरिष्ठ पत्रकार तसेच संरक्षण रणनीतीकार नितीन गोखले यांच्या “फायरसाईड चॅट” हा विशेष आगळावेगळा गप्पांचा कार्यक्रम झाला. या चर्चेत भारतात विकसित होत असलेल्या माहिती विषयक वातावरणावर आणि समन्वित राष्ट्रीय दृष्टिकोनाची आवश्यकता याबाबत सखोल चर्चा झाली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे अध्यक्ष अलोक जोशी यांनी समन्वित    शासन  दृष्टिकोनाची आणि धोरणात्मक संप्रेषणात राष्ट्रीय क्षमता बळकट करण्यासाठी स्पष्ट मार्गदर्शक आराखडा तयार करण्याची गरज यावर भर दिला.

या चर्चासत्रात – धोरणात्मक संप्रेषणाचे संस्थात्मकीकरण; राष्ट्रीय सुरक्षेचा घटक म्हणून धोरणात्मक संप्रेषण; दिशाभूल, चुकीची माहिती आणि शत्रुत्वपूर्ण प्रचाराला भारतीय दृष्टीकोनातून प्रत्त्युत्तर देणे; आणि कथन घडवण्यात तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण – यासारख्या प्रमुख मुद्द्यांवर विचारविनिमय झाला.

या चर्चेत एकात्मिक राष्ट्रीय धोरणात्मक संप्रेषण आराखड्याच्या गरजेची दखल घेण्यात आली. व्यापक पोहोच आणि प्रभाव साध्य करण्यासाठी तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण महत्त्वाचे ठरेल, यावर सहभागींनी सहमती दर्शवली.

पुणे इंटरनॅशनल सेंटर आणि सेंटर फॉर ॲडव्हान्स्ड स्टडीज इन करंट अँड स्ट्रॅटेजिक अफेयर्स यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या चर्चासत्राचा समारोप राष्ट्रीय शक्तीचा मुख्य घटक म्हणून धोरणात्मक संप्रेषणाला संस्थात्मक करण्याची गरज सर्वानुमते मान्य करण्याने झाला.

असेन्ड 2025 हा भारताच्या धोरणात्मक संप्रेषण संरचनेच्या घडणीतील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. हा उपक्रम विकसित भारत @2047 च्या दृष्टिकोनाशी सुसंगत असून भारतीय सैन्याची कथनात्मक मजबूती, संज्ञानात्मक तयारी आणि राष्ट्रीय एकात्मतेबद्दलची वचनबद्धता दर्शवतो.

 

* * *

पीआयबी मुंबई | निलिमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2177909) Visitor Counter : 22
Read this release in: English