सांस्कृतिक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या ‘ऑक्टेव्ह’मधून पूर्वोत्तर संस्कृतीचा मिलाफ - नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ.रवींद्र सिंगल यांचे प्रतिपादन


‘नॉर्थ इस्ट ऑक्टेव्ह’ सांस्कृतिक महोत्सवाला प्रारंभ

Posted On: 09 OCT 2025 9:40PM by PIB Mumbai

नागपूर, 9 ऑक्टोबर 2025

केंद्रीय संस्कृती मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या माध्यमातून यापूर्वी अनेक महोत्सव आयोजित झाले. नागपूरकरांनी त्यांना उदंड प्रतिसाद दिला. अनेक वर्षांनंतर होणार्‍या ‘ऑक्टेव्ह-2025’ महोत्सव होत असून यात खर्‍या अर्थाने पूर्वोत्तर राज्यांच्या संस्कृतींचा मिलाफ नागपूरवासियांना अनुभवता येणार आहे, असे प्रतिपादन नागपूर पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी केले.
पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, उदयपूर आणि दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने नॉर्थ-ईस्ट फेस्टिवल "ऑक्टेव्‍ह" चे उद्घाटन डॉ. रवींद्र सिंगल यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. डॉ. सिंघल यांनी प्रथम कार्यक्रमस्थळी लागलेल्या पूर्वांचल वस्तूच्या प्रदर्शनाचे फीत कापून उद्घाटन केले. याप्रसंगी दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या संचालिका आस्था कार्लेकर, उपसंचालक दीपक कुळकर्णी, लेखाधिकारी दीपक पाटील, पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र संचालक फुरकान खान व कार्यक्रम अधिकारी हेमंत मेहता उपस्थित होते. 

डॉ.सिंगल यांनी, हा महोत्सव देशभरात विविध ठिकाणी होणार आहे. यानंतर ही संधी पुन्हा कधी मिळेल याची शाश्वती नाही. त्यामुळे पूर्वोत्तर संस्कृतीचे रंग, त्यातील भाव आणि दृढता अनुभवण्यासाठी नागरिकांनी अधिक संख्येने महोत्सवाचा लाभ घ्यावा,असे आवाहनही त्यांनी केले.

सुरुवातीला नागपूरचे पोलिस आयुक्त रवींद्रकुमार. सिंगल यांनी या स्टॉल्सची पाहणी करून स्टॉलधारकांना प्रोत्साहित केले. तसेच स्टॉलधारकांनी संबंधित राज्यातील वस्तूंची त्यांना भेट दिली.  

याप्रसंगी बोलताना केंद्राच्या संचालिका आस्था कार्लेकर यांनी, ईशान्य भारतातील संस्कृतीची ओळख देशातील इतर राज्यांना करून देण्याचा भारत सरकारचा मुख्य हेतू आहे. या ठिकाणी संबंधित आठही राज्यांतील हस्तशिल्प, हस्त कारागिरीच्या वस्तू आदी साहित्य विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे सांगितले.

  

कार्यक्रमाचे संचालन विवेक अलोणी आणि मोहिता दीक्षित यांनी केले.आभारप्रदर्शन फुरकान खान यांनी केले.

पूर्वोत्तर संस्कृती परिचयाचे नृत्य

मणिपूर राज्याचा पुंग ढोल चोलम, आसामचा बारडाई सिकला आणि बिहू, मेघालयचा वांगला डान्स, कशद मस्ती, त्रिपुराचा होजागिरी आणि संग्राई मोग, मिझोरमचा चेरवू डान्स, नागालॅण्डचा नागा वॉर डान्स, अरुणाचल प्रदेशचा जूजू झाझा, सिक्कीमचा सिंगी चाम आदी नृत्यप्रकार यावेळी कलाकारांनी सादर केले. यात पूर्वोत्तर राज्यातील 200 हून अधिक कलाकारांचा सहभाग आहे.  

ईशान्येतील राज्यांचा फॅशन शो

महोत्सवाच्या उद्घाटनानंतर लगेच प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मेघालय, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा आणि सिक्कीम या पूर्वोत्तर राज्यांची परंपरा, संस्कृती, वेशभूषा याबाबत प्रचार-प्रसार व्हावा, या उद्देशाने संबंधित राज्यातील मॉडेल्सच्या माध्यमातून वेशभूषा, शस्त्रसंस्कृती आणि आपसातील दृढबंधन आदींचे दर्शन या फॅशन शोच्या माध्यमातून रसिकांना घडविण्यात आले.

पीआयबी नागपूर | धनंजय वानखेडे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2177089) अभ्यागत कक्ष : 19