दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
मुंबई येथे “सावंतवाडी गंजिफा कार्ड” या विशेष कार्डांचे अनावरण करत टपाल विभागातर्फे फिलाटली डे साजरा
प्रविष्टि तिथि:
09 OCT 2025 6:11PM by PIB Mumbai
मुंबई, 9 ऑक्टोबर 2025
सध्या सुरु असलेल्या राष्ट्रीय टपाल सप्ताह 2025 (06 ते 10 ऑक्टोबर 2025) चा भाग म्हणून दिनांक 08 ऑक्टोबर 2025 रोजी मुंबई जीपीओ वारसा इमारतीत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करत महाराष्ट्र टपाल मंडळाने फिलाटली डे म्हणजेच टपाल तिकीट संग्रह आणि अभ्यास दिन साजरा केला.

महाराष्ट्र मंडळाचे मुख्य पोस्टमास्तर जनरल अमिताभ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी मुख्य पोस्टमास्तर जनरल यांच्या हस्ते फिलाटली डे वर आधारित विशेष टपाल चिन्हाचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर, प्रख्यात टपाल तिकीट संग्राहक प्रतिसाद नुरगावकर यांनी लिहिलेल्या “इंडिया पोस्ट कार्ड्स 1949-2025” या शीर्षकाच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकात गेली अनेक दशके भारतीय पोस्टकार्डांमध्ये घडत आलेल्या उत्क्रांतीचे इतिवृत्त सांगण्यात आले असून हे पुस्तक टपाल तिकीट अभ्यासक आणि संग्राहक यांच्यासाठी एक अमूल्य संदर्भग्रंथ आहे.
यावेळी सावंतवाडी राजघराण्यातील राणीसाहेब शुभदादेवी भोसले यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी हाताने रंगवलेल्या तपशीलवार कलाकुसरीच्या रचना आणि पौराणिक कल्पनांसाठी सुप्रसिध्द असलेल्या सावंतवाडी गंजिफा कार्ड्सचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व त्यांनी विषद केले.
त्यानंतर, महाराष्ट्र मंडळाचे मुख्य पोस्टमास्तर जनरल यांनी विशेष टपाल चिन्हासह दशावताराच्या (भगवान विष्णू यांचे दहा अवतार) अत्युत्कृष्ट प्रतिमांचे चित्रण असलेल्या “सावंतवाडी गंजिफा कार्ड्स”च्या 10 चित्र पोस्टकार्ड्सच्या संचाचे औपचारिकरीत्या अनावरण केले.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना, महाराष्ट्र मंडळाचे मुख्य पोस्टमास्तर जनरल अमिताभ सिंग यांनी टपाल विभागाच्या साहित्याच्या माध्यमातून भारताच्या समृध्द आणि कलात्मक वारशाचे जतन तसेच प्रचार करण्याप्रती चिरस्थायी वचनबद्धतेला अधोरेखित केले. लोकांना जोडून ठेवण्यात, वारशाला प्रोत्साहन देण्यात आणि युवकांमध्ये सर्जनशीलतेची जोपासना करण्यात टपाल तिकिटे आणि इतर साहित्य सातत्याने महत्त्वाची भूमिका बजावत राहील यावर त्यांनी भर दिला.
या कार्यक्रमाला राजेसाहेब खेम सावंत भोसले, राणीसाहेब शुभदादेवी भोसले, युवराज लखम सावंत भोसले आणि युवराज्ञी श्रद्धा लखम सावंत भोसले यांच्यासह सावंतवाडीच्या राजघराण्यातील अनेक सदस्य या कार्यक्रमात उपस्थित होते.
व्यासपीठावर उपस्थित असलेल्या वरिष्ठ टपाल अधिकाऱ्यांमध्ये महाराष्ट्र परिमंडळाच्या महाव्यवस्थापक (वित्त) जयती समद्दार; टपाल सेवा संचालक (मेल आणि व्यवसाय विकास) मनोज कुमार, टपाल सेवा संचालक (मुंबई प्रदेश) कैया अरोरा; टपाल सेवा संचालक (मुख्यालय) सिमरन कौर आणि मुंबई जीपीओच्या संचालक रेखा क्यू. ए. रिझवी यांचा समावेश होता.
या कार्यक्रमाला सावंतवाडीच्या राजघराण्यातील मान्यवर सदस्य, प्रसिद्ध तिकिटसंग्राहक (फिलाटेलिस्ट) आणि सामान्य नागरिक उपस्थित होते. टपाल विभागाच्या पारंपरिक भारतीय कलांची जपणूक आणि पुनरुज्जीवन करण्याच्या प्रयत्नांचे उपस्थितांनी कौतुक केले.
गंजिफा कार्डविषयी अधिक माहिती
गंजिफा (ज्याला गंजापा, गंजप्पा किंवा गंजिफा असेही म्हटले जाते) हा भारतातील पारंपरिक पत्त्यांचा खेळ आहे. गंजिफा आपला समृद्ध इतिहास, कलात्मक तपशील आणि सांस्कृतिक प्रतीकांसाठी प्रसिद्ध आहे. प्राचीन भारतात उदय झालेल्या या हस्तचित्रित गोलाकार पत्त्यांवर प्रामुख्याने धार्मिक आणि पौराणिक विषय चित्रित केले जातात — विशेषतः दशावतार, म्हणजे भगवान विष्णूंच्या दहा अवतारांची चित्रणे केलेली असतात.
ही कला सावंतवाडी (महाराष्ट्र), ओडिशा आणि मैसूर यांसारख्या भागांमध्ये राजाश्रयाखाली फुलली आणि प्रत्येक प्रदेशाने आपली वेगळी शैली विकसित केली. पारंपरिकरित्या हे पत्ते कपडा, ताडपत्री किंवा हाताने तयार केलेल्या कागदाचा वापर करून तयार केले जातात. नैसर्गिक रंगद्रव्यांनी त्यांना काळजीपूर्वक रंगवले जाते आणि त्यावर लाखेचा थर दिला जातो.
आजच्या काळात गंजिफा ही अत्यंत दुर्मिळ आणि लुप्तप्राय अशी लोककला आहे, आणि फार थोडेच कलाकार ही परंपरा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.
या तिकिट प्रकाशनाद्वारे या मौल्यवान सांस्कृतिक वारशाबद्दल जनजागृती निर्माण करून त्याच्या पुनरुज्जीवनाला चालना देण्याचा टपाल विभागाचा उद्देश आहे.
निलीमा चितळे/संजना चिटणीस/श्रद्धा मुखेडकर /प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2176927)
आगंतुक पटल : 39
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English