माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आशिष शेलार यांनी तंत्रज्ञान संचालित विकास आणि सर्जकांच्या पुढील पिढीच्या सक्षमीकरणासाठी केले आवाहन


संजय जाजू यांनी उद्योगांना नवोन्मेषाचे, गुंतवणूकदारांना विश्वासाचे आणि निर्मात्यांना जबाबदार कथाकथनाद्वारे प्रेरणा देण्याचे केले आवाहन

वेव्ह्ज, वेवएक्स आणि आयआयसीटी यांसारख्या सरकारी उपक्रमांचा उद्देश सर्जनशील उद्योगांमध्ये कौशल्ये, नवोन्मेष आणि जागतिक सहयोग बळकट करणे, हा आहे

भारताची सर्जनशील अर्थव्यवस्था जागतिक स्तरावर ओळख मिळवण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना फिक्की फ्रेम्स 25 चा रौप्य महोत्सव

प्रविष्टि तिथि: 07 OCT 2025 5:02PM by PIB Mumbai

मुंबई, 7 ऑक्टोबर 2025

भारतीय उद्योग आणि वाणिज्य महासंघाने (फिक्की ) ने आज मुंबईत 25 व्या फिक्की फ्रेम्स, या माध्यमे आणि मनोरंजन व्यवसायावरील वार्षिक जागतिक संमेलनाचे उद्घाटन केले. फिक्की फ्रेम्स या प्रमुख कार्यक्रमाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त, भारताच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेचे भविष्य आणि त्याचा वाढता जागतिक प्रभाव, यावर चर्चा करण्यासाठी धोरणकर्ते, उद्योग नेते, निर्माते आणि नवोन्मेषक एकत्र आले होते.

महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. फिक्कीचे वरिष्ठ उपाध्यक्ष अनंत गोएंका यांनी उद्घाटनपर भाषण केले, तर फिक्की माध्यमे आणि मनोरंजन समितीचे अध्यक्ष केविन वाझ यांनी भारताच्या सर्जनशील परिसंस्थेला आकार देण्यात फिक्कीच्या 25 वर्षांच्या प्रवासावर प्रकाश टाकला.

या कार्यक्रमाला संबोधित करताना, आशिष शेलार यांनी राष्ट्रीय आशयासोबत प्रादेशिक आणि स्थानिक आवाजांना प्रोत्साहन देण्यावर भर दिला. पुरस्कार विजेत्या मराठी चित्रपटांना आणि इतर स्थानिक कथांना वाव मिळण्याचा आग्रह त्यांनी व्यक्त केला. त्यांनी महाराष्ट्र चित्रपट धोरण, नव्या चित्रनगरी, कौशल्य विकासासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (IICT-भारतीय सर्जनशील तंत्रज्ञान संस्था) आणि वार्षिक जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद (वेव्हज) यासारख्या सरकारी उपक्रमांची माहिती दिली. या उपक्रमांचे एकत्रित उद्दिष्ट भारताला जागतिक सर्जनशील केंद्र म्हणून पुढे आणण्याचे असल्याचे त्यांनी सांगितले.

माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू यांनी, कल्पनाशक्ती,तंत्रज्ञान आणि युवा ऊर्जेने समर्थ, भारताचे माध्यम आणि मनोरंजन क्षेत्र जागतिक यशाच्या उंबरठ्यावर उभे असल्याचे सांगितले. उद्योगांना निर्भयपणे नवोन्मेष घडवून आणण्याचे आणि उन्नतीच्या कथा सांगण्याचे, गुंतवणूकदारांना भारतीय सर्जनशीलतेच्या आश्वासकतेवर विश्वास ठेवण्याचे आणि कलाकारांना धैर्याने आणि विवेकाने देशाच्या सांस्कृतिक कथेला आकार देण्याचे आवाहन करून, जाजू यांनी शाश्वत आणि समावेशक सर्जनशील भविष्यासाठी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले.

25 व्या फिक्की फ्रेम्सला भारताच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेसाठी मैलाचा टप्पा संबोधून जाजू म्हणाले,'' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोंदवलेल्या निरिक्षणाप्रमाणे भारताची केशरी अर्थव्यवस्था केवळ मनोरंजनापुरती मर्यादित नसून संकल्पना आणि कल्पनाशक्तीविषयी आहे, आपल्या सांस्कृतिक सामर्थ्याला जगाला प्रेरणा देणाऱ्या सर्जनशील उर्जेमध्ये परिवर्तित करण्याबद्दल आहे."

प्रसिद्ध अभिनेते आणि फिक्की फ्रेम्सचे दूत आयुष्मान खुराणा यांची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली. त्यांनी विकसित होणारे भारतीय कथाकथनाचे परिदृश्य आणि प्रेरणा व एकीला बळ देणाऱ्या आशय निर्मितीत कलाकारांची जबाबदारी, यावर आपले विचार मांडले. युवा प्रतिभेच्या संवर्धनात फिक्कीच्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले. भारताचा सर्जनशील समुदाय जागतिक स्तरावर आपले योग्य स्थान प्रस्थापित करण्यास सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.

भारताच्या माध्यम आणि मनोरंजन उद्योगाच्या प्रगतीचा मागोवा त्यांनी घेतला. 1999 मध्ये या क्षेत्राची बाजारपेठ 25,000 कोटी रुपये होती, मात्र आज ती 2 लाख 50 हजार कोटी रुपयांपेक्षा (30 अब्ज अमेरिकन डॉलर्स) पेक्षा अधिक वाढली आहे असे त्यांनी सांगितले. या दहापट वाढीतून भारतीय सर्जनशीलता, डिजिटल नवोन्मेष आणि युवा उद्योजकतेची ताकद दिसून येते असे त्यांनी नमूद केले. चित्रपट आणि दूरचित्रवाणी हे या क्षेत्राचा कणा राहिले आहेत, ही माध्यमे दररोज 800 दशलक्ष भारतीयांपर्यंत पोहोचतात, तर डिजिटल माध्यम दरवर्षी 15 टक्क्यांहून अधिक वाढीसह सर्वात वेगाने वाढणारा घटक आहे, असे त्यांनी सांगितले.

ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि विस्तारित वास्तवता या घटकांतून पुढच्या वाटचालीचे दर्शन होते असे त्यांनी सांगितले. या क्षेत्रांनी 30 टक्क्यांहून अधिक वार्षिक वाढ नोंदवली असल्याची माहिती त्यांनी दिली. थेट सादरीकरणाचे मनोरंजन क्षेत्रही 20,000 कोटी रुपये मूल्याच्या उद्योगाच्या स्वरुपात विकसित झाले आहे, यातून नवीन रोजगार आणि सांस्कृतिक संधीही निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.

आपल्या संबोधनातून जाजू यांनी भारताचा वाढता जागतिक प्रभावही अधोरेखित केला. भारतीय कथा आता 200 हून अधिक देशांपर्यंत पोहोचल्या आहेत आणि त्यांचे अनेक भाषांमध्ये अनुवाद केले जात आहेत, तसेच त्यांना उपशीर्षकही दिली जात असल्याची माहिती त्यांनी दिली. आपली आशय सामग्री ही भारताची सॉफ्ट पॉवर बनली असून, त्याद्वारे आपण कोण आहोत आणि आपण कशाचे प्रतिनिधित्व करतो, याबद्दलच्या जागतिक धारणांना नवा आयाम मिळत असल्याचे ते म्हणाले. यासोबतच भारतीय निर्माते डिस्ने, ड्रीमवर्क्स, नेटफ्लिक्स आणि सोनी यांच्यासोबत सहकार्यपूर्ण भागिदारीत काम करत असून, भारतीय संगीत आणि गेम्सनाही जगभर प्रेक्षकांचे पाठबळ मिळत असल्याचे ते म्हणाले.

यावेळी जाजू यांनी या उद्योग क्षेत्राने मिळवलेल्या यशासाठी या क्षेत्राचे अभिनंदन केले. या व्यापक यशानंतरही, भागधारकांनी जबाबदारीचे भान राखतच प्रगती साध्य केली पाहिजे, याची जाणिव त्यांनी करून दिली. मोठ्या प्रगतीसोबतच मोठी जबाबदारी येते, असे ते म्हणाले. आपण निष्पक्ष आणि पारदर्शक महसूल प्रारुपाची सुनिश्चिती केली पाहिजे, निर्मात्यांच्या अधिकारांचे संरक्षण केले पाहिजे, चुकीच्या माहितीला आळा घातला पाहिजे तसेच या क्षेत्रातील चोरी अर्थात पायरसीचा सामना केला पाहिजे ही बाब त्यांनी अधोरेखित केली. सामाजिक मूल्यांची पाठराखण करतानाच आपण आपल्या सर्जनशील वाटचालीत स्वातंत्र्याचेही संरक्षण केले पाहिजे या जबाबदारीची जाणीवही त्यांनी करून दिली.

या क्षेत्राला बळकट करण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या अनेक उपक्रमांचा उल्लेख त्यांनी केला. यानिमित्ताने जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषद, सर्जनशील स्टार्टअप्ससाठी वेव्हएक्सिलरेटर, क्रिएट इन इंडिया चॅलेंजेस, इंडिया सिने हब हे एक खिडकी सुविधा असलेले पोर्टल तसेच कौशल्य विकास आणि संशोधनासाठी भारतीय सर्जनशील तंतज्ञान संस्था अशा अनेक उपक्रमांबद्दल त्यांनी सांगितले.

भारताला 2030 पर्यंत थेट सादरीकरणासाठ्या मनोरंजनासाठीचे जगातील आघाडीच्या पाच ठिकाणांपैकी एक ठिकाण म्हणून स्थान मिळवून देण्यासाठी राज्य सरकारे आणि उद्योग क्षेत्रातील भागीदारांसोबतचा एक संयुक्त कार्यगट मार्गदर्शक आराखडा तयार करत असल्याची घोषणाही जाजू यांनी यावेळी केली.

आपल्या संबोधनाच्या समारोपात जाजू यांनी या उद्योग क्षेत्राला परस्पर सामायिक सर्जनशील भविष्यासाठी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले. आपण एकत्र येऊन भारतीय माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राच्या पुढील पंचवीस वर्षांना सर्जनशीलच्या बाबतीत धाडसी, निष्पक्ष आणि जागतिक प्रभाव असलेले स्वरुप मिळवून देऊ या असे आवाहन त्यांनी केले.

सुषमा काणे/सोनाली काकडे/तुषार पवार/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(रिलीज़ आईडी: 2175868) आगंतुक पटल : 34
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English